
Nanded News : हवामानातील बदल (Climate Change) आणि पर्जन्यमानाबाबत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले अंदाज लक्षात घेता पावसाची उपलब्धता व पेरणीसाठी अत्यावश्यक असलेला पाऊस झाल्याशिवाय पेरणी केली जाऊ नये, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी कृषी विभागाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. २७) आयोजित खरीप हंगाम-२०२३ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अनिल गवळी, विक्रेत्या संघटनांचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत जिल्ह्यातील स्वयंपूर्णता महत्त्वाची आहे. या बियाण्यांची ७० टक्क्यांपेक्षा अधिक उगवणक्षमता असेल तरच त्याची लागवड शेतकऱ्यांच्या हिताची राहील. यादृष्टीने कृषी विभागामार्फत गावपातळीवर सोयाबीनच्या उगवण क्षमतेची चाचणी व प्रात्यक्षिक कसे करून दाखविता येईल याचे नियोजन झाले पाहिजे, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
घरचे बियाणे असेल तर बीज प्रक्रियाही आवश्यक आहे. बाजारात इतर बियाण्यांबाबत कृत्रीम टंचाई कोणी निर्माण करत असेल तर संबंधितांविरुद्ध कारवाईसाठी तालुकापातळीवरील कृषी अधिकाऱ्यांनी दक्षता घेतली पाहिजे.
याचबरोबर बियाणे व खतांच्या ठरवून दिलेल्या मूल्यापेक्षा अधिक दराने जर कोणी विक्री करत असेल, तर त्यांच्याविरुद्धही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
जिल्ह्यात खरीप ज्वारीची गतवर्षी १८ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. या वर्षी सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. मका पिकाची गतवर्षी ५३७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती.
या वर्षी ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. तूर या वर्षी ७० हजार हेक्टर क्षेत्र, मूग २७ हजार हेक्टर क्षेत्र, उडीद २७ हजार हेक्टर क्षेत्र, सोयाबीन ४ लाख हेक्टर क्षेत्र, कापूस १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र, असे एकूण ७ लाख ७४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे.
यासमवेत ऊस ३२ हजार हेक्टर क्षेत्र, हळद २० हजार हेक्टर, केळी ६ हजार हेक्टर, इतर भाजीपाला व फळपिके ६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असून, २०२३ मध्ये हे एकूण क्षेत्र ८ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर एवढे राहील. या वर्षी सर्वाधिक प्रस्तावित क्षेत्र हे सोयाबीनचे असून याची टक्केवारी १२६.६३ एवढी आहे.
शेतकऱ्यांना अर्जासाठी मदत करा
कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. यात विशेषत: मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत शेततळे योजना महत्त्वाची आहे. वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज महत्त्वाची आहेत. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.