जीवनाला आकार देणारा रंधा

आपल्या वाट्याला आलेल्या संकटांवर मात करताना घरातला प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार लढला व जिंकला. आणि हे सगळं जगणं अनेक मराठी आत्मकथनं कादंबऱ्या ह्यामधून आपण वाचतो.
रंधा कादंबरी
रंधा कादंबरीAgrowon

देवा झिंजाड

आपल्या वाट्याला आलेल्या संकटांवर मात करताना घरातला प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार लढला व जिंकला. आणि हे सगळं जगणं अनेक मराठी आत्मकथनं कादंबऱ्या ह्यामधून आपण वाचतो. काल्पनिक लिखाणापेक्षा सत्याची किनार असलेलं लिखाण काळजाला भिडतं. अशीच 'रंधा' नावाची एक धगधगतं जीवनवास्तव मांडणारी कादंबरी माझ्या वाचनात आली. ह्या कादंबरीचा लेखक डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या संघर्षपूर्ण पट आपल्यासमोर ठेवलाय त्याला तोड नाही. खरं तर जिथं एखाद्या मुलाला शिकवणं मुश्कील होतं तिथं सात मुलांना शिकवून त्यांच्या जीवनाची गाडी रुळावर आणणारे लेखकाचे वडील वाल्मीक अण्णा मला खऱ्या अर्थानं मोठे वाटतात. गरिबीच्या चिखलात रुतलेल्या संसाराच्या चाकाला जर गती द्यायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अन् त्याचसाठी कष्टाचा रंधा खडबडीत आयुष्यावर फिरवून जीवन सुकर करतो. संकटांचे अनेक अडथळे पार करत असताना त्यांनी वेळोवेळी धाडसाचं वाकस वापरून परिस्थितीला त्यांच्यासमोर झुकायला लावलं.

एवढं करूनही पोरं मोठाली झाल्यावर, ती हाताखाली आल्यावर अन् वय झाल्यावर स्वतःच्या पोरांकडून काडीची अपेक्षा न करता त्यांना घरट्यातून मुक्तपणे उडून जाण्याची मुभा देणारा बाप अतिशय सुंदर पद्धतीने ह्या कादंबरीत रेखाटला गेलाय. बापानं पाहिलेल्या स्वप्नात स्वतःला झोकून देणारी लेखकाची आई कुसुम सुद्धा फार मोठी त्यागमूर्ती म्हणून आपल्यासमोर पानोपानी येत राहते. तिचं मन मारून जगणं, सात पोरांची बाळंतपणे, संसारासाठी चिमूट चिमूट साचवून मिठापीठासाठी कुणापुढेही हात न पसरता स्वाभिमानाने जगणारी व स्वतःच्या लेकरांनाही स्वाभिमानाने उभी करणारी माउली खूप मोठी प्रेरणा देते.

एकूणच अशा अस्सल जगण्यातून लिहिल्या गेलेल्या सेंद्रिय भाषेतील कादंबऱ्या मरगळ आलेल्या मनाला खूप मोठी उभारी देतात. नव्यानं लढण्याचं बळ देतात. कुठलंही अरिष्ट आलं तरी त्याच्यासमोर दंड थोपटून दोन हात करण्याची प्रेरणा देतात. असं लिखाण जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या जगण्याच्या संघर्षात कष्टाचा, आयुष्याचा मार्ग सुखकर कसा करायचा ह्याचा वस्तुपाठ हा ' रंधा' ठेवतो. मी दहा अकरा तास नोकरी करून स्वतःचं लिखाण करून आणि आगामी कादंबरीचं लिखाण करूनही महिन्याला किमान सहा पुस्तके तरी वाचतोच पण सगळीच पुस्तकं काळजात घर करतात असं नाही. ह्या पुस्तकाच्या निमित्तानं माझ्या काळजावर 'रंधा' मारण्याचं काम केलं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com