राजकारण नेमकं कोणाच्या फायद्यासाठी?

नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला नुकतेच लाभले आहेत. मात्र सामान्य जनतेच्या अपेक्षांचं ओझं ते कसं पेलतात, हे पाहणं आवश्यक आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

भारतात एकूण २३३४ राजकीय पक्ष आहेत. त्यांपैकी सात पक्ष हे राष्ट्रीय आणि २६ हे राज्यस्तरीय आणि इतर नोंदणीकृत पक्ष आहेत. महाराष्ट्र राज्यात १४५ पक्षांची अधिकृत नोंदणी असून दोन पक्ष प्रादेशिक आहेत. प्रत्येक पक्षाची निर्मिती काही विशिष्ट कारणांमुळे, विशिष्ट परिस्थितीमुळे, तसेच स्वार्थामुळे देखील झाली आहे. असे असले तरी अनेक पक्षांच्या विचारधारा आणि तत्त्व काही प्रमाणात सारखेच असतात. अशा पक्षांची युती, आघाडी होताना आपल्याला दिसते. आपल्या देशात आणि राज्यात राजकारण आणि राजकीय परिस्थिती यावर जेवढे चिंतन मनन होते तेवढी चर्चा विकासाच्या मुद्द्यावर होताना आढळत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. आपला देश किंवा राज्य कोणत्या तत्त्वावर चालले पाहिजे ते तत्त्व, तो विचार लागू करण्यासाठी सत्तेत येणे आणि सत्तेत येण्यासाठी आपले विचार लोकांना पटवून निवडणुकीच्या माध्यमातून जाणे म्हणजे राजकारण. प्रत्येक राष्ट्रांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी राजकारण चालते मात्र ते फक्त निवडणुकीपुरते नसून खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू किंवा उद्देश खूप चांगला आहे. मात्र दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याकडे पाहत नाही.

Eknath Shinde
Maharashtra Farmer: महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू: मुख्यमंत्री

आपल्याकडील गाव पातळीपासून ते दिल्लीपर्यंत बहुतेक राजकारण हे धार्मिक, सांप्रदायिक, जातीय मुद्द्यांवर चालते. भारतातील अनेक महापुरुषांनी राजकारणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चांगल्या आचरणाची, चांगल्या तत्त्वाची आणि समाजसेवा करणाऱ्या तरुणांची पिढी राजकारणात आली पाहिजे असे सर्वच सांगतात. मात्र सद्यःस्थितीत राजकारणात खूप मोठी उलथापालथ होताना दिसत आहे ती अनेकांना अस्वस्थ करणारी असून समाजकारणाचा आणि विकासाचा उद्देश सफल करणारी नाहीत. देशातील तसेच राज्यातील राजकीय उलथापालथ, पक्षांतर, बंडखोरी, समर्थन या सर्व बाबींमध्ये सामान्य जनता तसेच राजकीय पक्षांचा सामान्य कार्यकर्ता यांचे मात्र खूप हाल होताना दिसतात. या सर्व परिस्थितीत देशासमोर उभे असणाऱ्या किंवा राज्यासमोर उभे ठाकलेले संकट आणि त्याचा होणारा परिणाम याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. राजकारणाचा नेमका फायदा कुणाला होत आहे, हा खरा चिंतनीय आणि चिंतेचा विषय आहे.

नुकत्याच आपल्या राज्यात खूप मोठी राजकीय उलथापालथ झाली, अचानक सरकार कोसळले. एका पक्षातील आमदारांचा समूह हा दुसऱ्या एका पक्षासोबत गेला आणि सत्ता स्थापन झाली. ही सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याबरोबरच नव्याने धमकी आणि ब्लॅक मेलिंगचा देखील वापर झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जी कदाचित रास्त असू शकते. मात्र यामुळे पक्षाची तत्त्वे, विचारधारा या सर्व बाबी संपुष्टात आल्या ज्याचा परिणाम या देशातील लोकशाही संपण्याकडे होऊ शकतो. राजकारणातील खुर्चीची लालसा आणि पदाचा मोह नेत्यांना कुठल्याही स्तरावर घेऊन जातो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ई.डी. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एवढेच नाही तर राज्यपाल आणि कोर्टदेखील सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करते असा सूर समाजातून निघताना दिसतो. मागे एका पक्षांतर केलेल्या नेत्यांनी याबाबतचे वक्तव्य जाहीर भाषणात बोलून दाखवले होते. राजकारणासाठी वापरण्यात येणारा पैसा, घोडेबाजार इतर खर्च, आमदार खासदार विकत घेणे इत्यादी सर्व पैसा हा जनतेचा आहे हे अगोदर लक्षात घेतले पाहिजे. हा पैसा जनतेसाठी खर्च झाला तर कदाचित गावाचा, राज्याचा, देशाचा विकास होण्यास फार काळ लागणार नाही.

Eknath Shinde
राज्यातील राजकारण वीट आणणारे ः तुपकर

एकीकडे श्रीलंका या आपल्या जवळच्या देशाची आर्थिक स्थिती आपण डोळ्यांनी बघत आहोत. अशी अवस्था आपल्या देशाची होणार नाही मात्र ती होऊ नये अशी अनेकांच्या मनात भीती आहे. आपल्या देशात महागाईने चरमसीमा गाठली आहे. केंद्र सरकारकडून खाजगीकरणाचा सपाटा सुरू आहे. सरकारी शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या कंपन्या आज देशोधडीला लागल्या आहेत. लाखो सरकारी कर्मचारी आज विविध कारणांनी चिंताग्रस्त झाले आहे. नवीन शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना काम मिळण्याची शक्यता खूप कमी झाली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांच्या मनात भविष्याबद्दल अस्वस्थता पाहायला मिळत आहे. ज्या देशात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जगन्नाथ शंकरशेठ आणि अनेक महापुरुषांनी शिक्षणाची दार उघडली मात्र आज तिथे शिक्षणाचा बाजार भरला जात आहे. इंधनाचे दर आणि सामान्य जनतेचा खूप जवळचा संबंध असतो. अनेकांना प्रपंच चालवण्यासाठी फिरावे लागते मात्र सध्याचा इंधनाचा खर्च त्यांना परवडण्याजोगा वाटत नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने खेड्यापाड्यात परत जंगलतोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इंधन, बियाणे, औषधे, खते, मजुरी यांचे भरमसाट वाढलेले दर आणि दुसरीकडे अवर्षण, अतिवृष्टी, बाजारभाव कोसळण्याची समस्या शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. अशा विचित्र अवस्थेतून आपला देश जात असताना खरोखरच आपल्या देशाला इतक्या राजकीय पक्षांची, नेत्यांची, मंत्र्यांची गरज आहे का, हा प्रश्‍न पडतो. देशातील सामान्य जनतेच्या समस्या सुटत नसतील तर या सत्ताकारणाला काय अर्थ आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थिती याहून भिन्न नाही. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याला नुकतेच लाभले आहेत. मात्र सामान्य जनतेच्या अपेक्षांचे ओझे ते कसं पेलतात, हे पाहणं आवश्यक आहे. आज राज्यातील शेतकरी अनंत अडचणीत आहे. उसाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. राज्यात काही भागात जून महिना उघडा गेल्याने दुबार पेरणीचे संकट आहे, काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, या सर्वांचे पंचनामे करून त्यांना मदत कशी करता येईल, हे पाहणे आवश्यक आहे. पीकविमा पॉलिसी फक्त प्रस्तुत करून काही उपयोग नाही, त्यातून शेतकऱ्यांना खरोखर संरक्षण मिळवून देण्याची गरज आहे. राज्यातील जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. शेती कर्जाच्या वसुलीसाठी शेतजमिनीचे लिलाव होत आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाची गरज आहे. राज्यात रासायनिक खतांचा तुटवडा आणि काळाबाजार सुरू आहे, खतांचे दर खूप वाढले आहेत. या सर्व परिस्थितीत कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची आवश्यकता निर्माण झाली आहे. याकरिता केंद्र सरकारने देखील मदत केली पाहिजे.

ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजना, रस्त्यांच्या योजना रखडल्या आहेत, त्या सर्व मार्गी लावून सामान्य जनतेला दिलासा देण्यात हे सरकार यशस्वी होणे आवश्यक आहे. राजकारणासाठी आणि सत्तेसाठी बंडखोरी, गटबाजी खूप झाली मात्र विकासासाठी या प्रकारचा उठाव झाला पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचे येवो, सामान्य जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तरुणांनी राजकीय नेत्यांसाठी आणि पक्षासाठी आपला अमूल्य वेळ, बुद्धी खर्च न करता तो स्वतःच्या आणि गावाच्या विकासासाठी वापरावा. राजकारणापायी विनाकारण वैमनस्य, वाद निर्माण करून घेणे योग्य ठरत नाही. त्यापेक्षा आपल्या समस्या संघटित होऊन सोडवणे गरजेचे आहे. राजकीय नेते स्वतःच्या विकासासाठी सत्तेत येत आहे की समाजाच्या विकासासाठी हे लक्षात घ्यावे लागेल कारण फक्त सत्ता परिवर्तनाने विकास होईल का, हा खरा मूलभूत प्रश्‍न आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com