
शेतकरी : अरुण भगवान नागणे-पाटील
गाव : महुद ब्रुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर
एकूण क्षेत्र : २१ एकर
डाळिंब लागवड : ५ एकर
एकूण झाडे : १७००
सोलापूर जिल्ह्यातील महुद बुद्रूक (ता. सांगोला) येथे अरुण नागणे-पाटील यांची २१ एकर शेती आहे. त्यात ५ एकर क्षेत्रावर डाळिंब बाग असून, उर्वरित क्षेत्रावर आंबा, ऊस, चारा पिकांची लागवड आहे.
डाळिंब लागवड ७ ते ८ वर्षे जुनी असून, बागेत प्रामुख्याने हस्त बहर धरला जातो. लागवड १० बाय १२ फूट अंतरावर आहे. सांगोला भागात उन्हाची तीव्रता अधिक असते. त्यामुळे बागेत क्रॉपकव्हर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे डाळिंब फळांचे संरक्षण होते.
शिवाय, डाळिंब फळांना दर्जेदार रंग आणि चमक मिळते. दरवर्षी बागेतून साधारण एकरी ९ टनांपर्यंत उत्पादन मिळते. फळांची गुणवत्ता चांगली असल्यामुळे दरवर्षी व्यापारी थेट बागेत येऊन डाळिंब खरेदी करतात. या वर्षी सरासरी १२७ रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळाला आहे.
हस्त बहराचे नियोजन
- संपूर्ण लागवडीत हस्त बहर धरला जातो.
- बहर धरल्यानंतर प्रत्येकी दहा दिवसांनी नियमितपणे स्लरीचा वापर केला जातो. तसेच ठिबकद्वारे पीएसबी, केसबी यांच्या मात्रा दर महिन्याला सोडल्या जातात.
- पहिल्या दोन महिन्यांत दर आठवड्याला १२ः६१ः० आणि ०ः५२ः३४ एकरी पाच किलो प्रमाणे दिले जाते.
- त्यानंतरच्या दोन महिन्यांत १३ः४०ः१३ आणि ६०ः२०ः० यांचा आलटून-पालटून दर आठवड्याला पाच किलो प्रमाणे वापर केला जातो.
- दर आठवड्याला सूक्ष्म अन्नद्रव्य पाच लिटरपर्यंत सोडली जातात.
- हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात फळांच्या आकारमानासाठी एसओपी, ०ः०ः ५० एकरी पाच किलोप्रमाणे सोडले जाते.
सिंचन व्यवस्थापन
- डाळिंब लागवडीत ठिबक सिंचन पद्धतीच्या वापरावर भर दिला आहे. त्यामुळे सिंचनासह अन्नद्रव्ये व्यवस्थापन सोयीचे होते.
- बहर धरल्यानंतर पहिल्या महिन्यात एक दिवसाआड एक तास प्रमाणे पाणी दिले जाते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात २ तास पाणी दिले जाते.
- चौथ्या आणि पाचव्या महिन्यात बाग चांगल्या सेटिंग अवस्थेत असते. त्या वेळी बागेस पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घेतली जाते. या काळात तीन तासांपर्यंत सिंचन केले जाते. त्यानंतर शेवटच्या सहाव्या महिन्यात पाच तासांपर्यंत सिंचन केले जाते.
मागील १० दिवसांतील कामकाज
- एप्रिल महिन्याच्या शेवटी बाग ताणावर सोडली आहे. हा ताण दीड ते दोन महिने देण्याचे नियोजन असते.
- बागेतील मुख्य खोडावरील व काडीवरील वॉटरशूट काढून घेतले. त्यानंतर बोर्डो मिश्रणाची फवारणी, तसेच ०ः५२ः३४ ची फवारणी करून घेतली आहे.
- सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रतिलिटर दोन ग्रॅम प्रमाणे फवारणी केली आहे.
- पिनहोल बोरर आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून झाडाची खोडे धुऊन घेतली. तसेच कीटकनाशकांचा वापर केला.
पुढील २० दिवसांतील कामे
- सध्या बाग ताणावर असून साधारण जून महिन्याच्या मध्यात बागेचा ताण तोडला जाईल. ताण तोडताना प्रत्येक झाडाच्या परिघात पुरेशी ओल निर्माण होईल इतके सिंचन केले जाते.
- बागेची हलकी छाटणी करू बोर्डो फवारणी घेतली जाईल.
- प्रति झाड ३० ते ४० किलो प्रमाणे शेणखत दिले जाईल. याशिवाय, १०ः२६ः२६, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या १ किलो प्रति झाड प्रमाणे मात्रा दिली जाईल.
संपर्क - अरुण नागणे- पाटील, ९६२३४९४९१५, (शब्दांकन - सुदर्शन सुतार)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.