सोशल मीडियाचा सकारात्मक वापर

प्रवासात असताना आपल्याला रस्त्यात कित्येकदा गर्दी दिसते. नक्कीच छोटा मोठा अपघात घडलेला असतो. प्रत्येक जण अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीची जखमी अवस्था बघून हळहळत असतो.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर
Mashagat ArticleAgrowon

शंकर बहिरट

प्रवासात असताना आपल्याला रस्त्यात कित्येकदा गर्दी दिसते. नक्कीच छोटा मोठा अपघात घडलेला असतो. प्रत्येक जण अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीची जखमी अवस्था बघून हळहळत असतो. काही जण आपापल्या मोबाईलने अपघातग्रस्त वाहनांचे आणि त्या अपघातात सापडलेल्या जखमी व्यक्तीचे व्हिडिओ आणि फोटो घेत असतात. पुढच्या क्षणी व्हॉट्सॲपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर पाठवत असतात. काही क्षणांतच ते फोटो हजारो लोकापर्यंत व्हायरल होतात. अशा वेळी अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीची नितांत आवश्यकता असते. पण त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी मोबाईलने शूट करून व्हायरल करणे ही विकृती आहे.

रस्त्यावर अपघात होतात म्हणून रस्त्यावर जायचे टाळता येत नाही. किंवा औद्योगिक क्षेत्रात अनेक भयानक अपघात होतात म्हणून नोकऱ्या सोडून चालत नाही. शेतीत यंत्रांचा वापर वाढत आहे. यांत्रिक शेती ही आधुनिक काळाची गरज आहे. नवीन यंत्र वापरण्याआधी त्याचा काळजीपूर्वक वापर कसा करावा याची माहिती प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकाला यांत्रिक शेतीचे महत्त्व पटवून सांगत होतो. त्याने त्याच्या मोबाईलमधले अनेक अपघातग्रस्त व्यक्तींचे फोटो मला दाखवले. ज्यातून कोणताही चांगला बोध होत नव्हता. उलट यंत्राबद्दल भीती निर्माण होत होती. अनेक जण अपघातग्रस्त व्यक्तींचे किळसवाणे फोटो पाठवतात. इतके भयानक फोटो की एखादा होतकरू तरुण ते फोटो पाहून ती यंत्रे चालवायला कधीही धजावणार नाही. असे फोटो जरी तुम्हाला कुणी पाठवले तरी ते अजिबात फॉरवर्ड करू नयेत.

व्हॉट्सॲप फेसबुकसारख्या प्रभावी सोशल मीडियाच्या साधनांचा वापर सकारात्मकच व्हायला हवा. अपघात झाल्यानंतरचे व्हिडीओ काढण्यापेक्षा अपघात होऊ नये म्हणून कोणकोणती सुरक्षा आणि काळजी घ्यावी. तसेच वेगवेगळी यंत्रे कशी हाताळावीत यावर लघुपट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणे गरजेचे आहे. तरुण वर्गात यू-ट्यूब, इन्स्टाग्रामसारख्या माध्यमात सध्या एक मिनिटाचे रील्स लोकप्रिय आहेत. ज्यातून अपघात सुरक्षा विषयी घोषवाक्ये, मनोरंजनातून केलेली अपघाताबद्दलची जागरूकता परिणाम कारक ठरू शकते. प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर सकारात्मक पद्धतीने केला, तर अपघात टाळता येतील. अपघातग्रस्त व्यक्तीला योग्य प्रकारे मदत करता येईल. सोशल मीडियावरच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आर्थिक मदतीचे अनेक हात पुढे येतात. अपघातग्रस्ताला तातडीने रक्ताची आवश्यकता असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदात्यांना आवाहन करता येते आणि प्रतिसाद ही चांगला मिळतो. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला तर अपघातग्रस्त व्यक्तीला नक्कीच जीवदान मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com