
Buldana News : नांदुरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agriculture Produce Market Committee) १८ संचालकपदासाठी छाननीनंतर ९८ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत किती उमेदवारांचे अर्ज कायम राहतात यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या बाजार समितीवर कधी भाजप, काँग्रेस तर कधी संमिश्र आघाडीने सत्ता मिळवली आहे.
यावेळी पहिल्यांदाच काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी, तर माजी आमदार चैनसुख संचेती आणि बलदेवराव चोपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सत्ता आणण्यासाठी समोरासमोर आहेत.
ही लढत सरळ दिसत असली तरी वेळेवर अनेक उमेदवारांना तिकीट न मिळाल्यास तिसऱ्या आघाडीचा पर्याय तयार होऊ शकतो. हे सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच स्पष्ट होईल.
यावेळेस अनेक तरुण उमेदवारांनी अर्ज दाखल करून बाजार समितीमध्ये प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. आजवर बाजार समितीत त्याच त्या चेहऱ्यांभोवती बाजार समितीचे सत्ताकारण फिरत आल्याने नवीन चेहऱ्यात उमेदवारीसाठी उत्साह निर्माण झाला आहे.
महाविकास आघाडी व भाजप-शिवसेना(शिंदे गट)यांचे अधिकृत असे पॅनेल अजूनही तयार झाले नसून एक दोन दिवसांत त्याचे चित्र स्पष्ट होईल असे दावे दोन्ही बाजूने केले जात आहेत.
तिसऱ्या आघाडीला अंधारात ठेवण्यासाठी कदाचित उमेदवारी मागे घेण्याच्या एक-दोन दिवसांत अधिकृत पॅनेल तयार करून ‘जोर का धक्का’ देण्याचे तंत्र अवलंबविले जाऊ शकते.
सर्वांना विश्वासात घेत जुन्या नेत्यांची नाराजी न ओढवता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची कसरत पॅनेल प्रमुखांना यावेळेस करावी लागणार आहे. सर्व समावेशक पॅनेल करण्यावर भर असेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.