मोबाईलवर हवामान अंदाज,वीज धोक्याची माहिती

योग्यवेळी हवामान अंदाजाची माहिती आणि वीज पडण्याची पूर्वसूचना मिळाल्यास संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकते.
Indian Meteorological Department
Indian Meteorological DepartmentIMD

सध्याच्या सततच्या बदलत्या हवामान स्थितीमुळे शेतीमध्ये मोठे नुकसान होते. तसेच बऱ्याच वेळा वीज पडण्यामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी होते. योग्यवेळी हवामान अंदाजाची माहिती आणि वीज पडण्याची पूर्वसूचना मिळाल्यास संभाव्य नुकसान टाळले जाऊ शकते. तसेच विविध शेतीकामांचे नियोजन करणे सोयीचे होईल. त्यासाठी भारतीय हवामान विभागाद्वारे मेघदूत(Meghdoot) आणि दामिनी(Damini) हे दोन मोबाईल ॲप विकसित केले आहेत. मेघदूत या ॲपद्वारे मोबाईमध्ये स्थानिक हवामान अंदाजाची माहिती, हवामान आधारित ठराविक जिल्ह्यासाठीचा कृषी सल्ला मिळतो. तर दामिनी या ॲपमध्ये वीज पडण्याच्या १५ मिनिटे आधी मोबाईलमध्ये मेसेजद्वारे पूर्वसूचना मिळते.
------------------
मेघदूत मोबाईल ॲप ः
- अत्यंत साधे आणि वापरण्यास सोपे असे मोबाईल ॲप आहे.
- या ॲपमधून शेतकऱ्यांना स्थानिक हवामान स्थिती आणि त्यावर आधारित कृषी सल्ला मिळतो.
- भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), पुणे, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) आणि कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
- ॲपमधील माहिती ही स्थानिक भाषा (उदा. मराठी, इंग्रजी आणि हिंदी इ.) भाषांमध्ये उपलब्ध आहे.

फायदे ः
- ॲपमध्ये ॲग्रोमेट फील्ड युनिट्स (AMFU) द्वारे दर मंगळवार आणि शुक्रवारी हवामान आधारित पीक आणि पशुधन व्यवस्थापनाविषयी जिल्हानिहाय सल्ला दिला जातो.
- पीक पेरणी, कीटकनाशके, सिंचन आणि खतांचा वापर तसेच जनावरांचे लसीकरण या सारखे हवामान-संवेदनशील निर्णय घेण्यास शेतकऱ्यांना मदत होईल.
- ॲपमध्ये सध्याच्या हवामानाची माहिती, पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि दिशा या संबंधी मागील ५ दिवसांतील आणि अंदाजित हवामानाची माहिती दिली जाते.
- ॲपच्या माध्यमातून दैनंदिन हवामानाची माहिती मिळाल्यामुळे बदलत्या हवामानानुसार शेती कामांचे योग्य नियोजन करून संभाव्य नुकसान कमी करता येते.
(संदर्भ : प्रेस नोट ः केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालय)


असे करा डाऊनलोड ः

- गुगल प्ले स्टोअरमध्ये Meghdoot असे इंग्रजी मध्ये टाइप करावे.
- त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या इंस्टॉल या पर्यायावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करावे.
- डाऊनलोड केलेल्या ॲपमध्ये संबंधित वापरकर्त्याने स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकून पसंतीची भाषा निवडून साइन इन करावे. त्यानंतर प्राथमिक नोंदणी करून ॲप वापरता येते.

दामिनी मोबाईल ॲप ः

भारतामध्ये वीज पडण्यामुळे दरवर्षी शेकडो नागरिक आणि जनावरे आपले प्राण गमावतात. विजेचा धोका अनपेक्षित असल्यामुळे या पासून बचाव करणे तसे अशक्य आहे. मात्र, वीज पडण्याच्या काही काळ आधी पूर्वसूचना मिळाल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास पुरेसा वेळ मिळून संभाव्य जीवितहानी टाळता येईल. या अनुषंगाने भारत सरकारच्या भू-विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (पुणे) यांनी ‘दामिनी’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. हे ॲप वीज पडण्याच्या १५ मिनिटे आधी पूर्वसूचना देते. त्यामुळे सुरक्षित स्थळी जाऊन संभाव्य नुकसान टाळता येईल.

फायदे ः

- वीज पडण्याच्या १५ मिनिटे आधी ॲपमधून पूर्वसूचना मिळते. त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.
- साधारण २० ते ४० किमी अंतरामध्ये कुठे वीज पडू शकते याची पूर्वसूचना मोबाईलमध्ये संदेशाद्वारे मिळते.
- विशेषतः गावातील लोक, शेतकरी आणि मेंढपाळ, गुराखी वर्गाला मोठा फायदा होईल.
------------
असे करा डाऊनलोडः
- गुगल प्ले स्टोअरमध्ये इंग्रजी अक्षरात Damini असे टाइप करावे.
- त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या इंस्टॉल या पर्यायावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करावे.
- ॲपमध्ये आपले नाव, संपर्क क्रमांक आणि स्थान (लोकेशन), भाषा निवड इत्यादी प्राथमिक माहिती भरून घ्यावी. त्यानंतर ॲपचा वापर करता येतो.
-------------------

संपर्क ः डॉ. बस्वराज पिसुरे, ९९७५१४४२३२
(विषय विशेषज्ञ(विस्तार शिक्षण), कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, औरंगाबाद)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com