कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता

पुणे : राज्यात पूर्वमोसमी (Pre Season Rain) पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. आज (ता.२) कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये वर्धा येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून पूर्व बांगलादेशपर्यंत पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता. २) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.२, धुळे ४०.८, कोल्हापूर ३४.१, महाबळेश्‍वर २८.०, नाशिक ३३.८, निफाड ३६.४, सांगली ३६.१, सातारा ३६.८, सोलापूर ३८.०, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३४.५, रत्नागिरी ३४.७, औरंगाबाद ४०.५, परभणी ४०.६, नांदेड ३९.२, अकोला ४२.४, अमरावती ४२.२, बुलडाणा ३९.२, चंद्रपूर ४२, गोंदिया ४२.५, नागपूर ४२.६, वर्धा ४३.

मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुजरातच्या उंबरठ्यावर पोचले आहेत. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने उद्यापर्यंत (ता. ३) मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तमिळनाडूचा आणखी काही भागासह कोकण, गोव्याच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम मध्य बंगालच्या उपसागरासह, ईशान्य भारतातील राज्ये, सिक्कीम तसेच पश्‍चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मॉन्सून दाखल होण्याचे संकेतही हवामान विभागाने दिले आहेत.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com