
Nashik Onion Price : ‘‘नाफेडमार्फत लेट खरीप कांदा व्यापाऱ्यांपेक्षा दुप्पट भावाने खरेदी करावा तरच त्याचा उपयोग आहे. चांगला मोंढ्याचा माल तुम्ही खरेदी करायचा आणि त्याला व्यापाऱ्यांपेक्षाही कमी दर (onion rate) द्यायचे ही सर्रास लूट आहे.
ही बाब शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे,’’ अशा शब्दांत निफाडचे आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar)यांनी नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीवर टीका केली.
कांदा बाजार भाव (kanda bajarbhav), शासनाकडे कांदा अनुदान मागणी (Onion Subsidy Demand), नाफेडची कांदा खरेदी आदी विविध विषयांवर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आमदार बनकर यांनी बैठक घेतली.
याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, बाजार समितीचे माजी संचालक नारायण पोटे, कांदा व्यापारी शंकरलाल ठक्कर, दिनेश बागरेचा, अतुल शहा, संकेत पारख, महावीर भंडारी, सुरेश पारख, लक्ष्मण आहेर, दीपक मोरे यांसह कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी, मापारी, हमाल, गुमस्ते आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना बनकर म्हणाले, ‘‘ज्या वेळेस शेतकरी अडचणीत येतात. त्या वेळी शेतकऱ्यांचा कांदा नाफेडने बाजार समित्यांमध्ये खरेदी करावा. त्यामुळे स्पर्धा वाढेल व भाव टिकून राहतील. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
ज्या वेळेस कांद्याचे भाव वाढतात, त्या वेळेस सरकार निर्यातबंदी करते. शेती प्रश्नावर लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रकार होतो, काही भूमिका मांडली, तर त्याची चौकशी लावली जाते.
लाल कांद्याची ही परिस्थिती आहे, उन्हाळा कांदा बाजारात आला तर आणखी बिकट परिस्थिती होईल,’’ असे बनकर म्हणाले.
आंदोलन केल्यास निधी न देण्याची धमकी
कांदा खाणाऱ्यांसाठी केंद्र सरकार भूमिका घेत आहे. कांदाप्रश्नी विधान भवनात आंदोलन करणार होतो, त्या वेळी आम्हाला दमदाटी झाली. अडवण्यात आले; मात्र कायदा आम्हालाही कळतो.
त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना मांडण्यासाठी विधान भवनाबाहेर आंदोलन केले.
आंदोलन केल्यावर ज्यांनी आंदोलनात पुढाकार घेतला, त्यांना निधी द्यायचा नाही, असा या सरकारने आम्हाला इशारा दिल्याचा गौप्यस्फोट आमदार बनकर यांनी केला.
आम्हाला निधी जरी मिळाला नाही तरी चालेल; मात्र शेतीमालाला रास्त भाव द्या, ही भूमिका आम्ही घेतली असल्याचे बनकर यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.