
MPSC Exam Update : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Agricultural University) कृषी पदवीधर संघटनेमार्फत ३०० विद्यार्थी व १२१ विद्यार्थिनींनी मंगळवारी (ता. ७) विद्यापीठातील क्रीडांगणापासून ते पदव्युत्तर महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता कार्यालयापर्यंत आणि जैवतंत्रज्ञान इमारतीपासून व्हीआयपी गेस्ट हाउसपर्यंत मूक मोर्चा (Student March) काढला.
या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) केलेल्या नवीन अभ्यासक्रमाचे समर्थन केले आहे. या वेळी पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व विद्यापीठाचे कुलसचिव यांना निवेदन दिले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तयार केलेला नवीन अभ्यासक्रम हा सर्व कृषी पदवीधरांचे हीत लक्षात घेऊन तयार केला आहे. तो आम्हा सर्व कृषी पदवीधरांना मान्य आहे.
मात्र काही विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव एक ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या कृषी मुख्य परीक्षेला आयोगाकडून स्थगिती दिली गेली, तर द्वितीय वर्ष, कृषी पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
तसेच १७ डिसेंबर २०२२ रोजी झालेली राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षादेखील धोक्यामध्ये येऊन, ही परीक्षा दिलेल्या जवळपास ३५ ते ४० हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार केला, वनस्पतिरोगशास्त्र, तर उद्यानविद्या, कीटकशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, कृषी अर्थशास्त्र, पशुविज्ञान दुग्धशास्त्र आणि कृषी विस्तार शिक्षण या सर्व विषयांचे सखोल ज्ञान असणे अत्यावश्यक आहे.
सर्व शाखांतील परीक्षार्थींना समान न्याय देणारा, भेदभावविरहित व विविध शाखांतील मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन करणारा आहे.
तसेच दोन्ही विषय अनिवार्य केल्यामुळे एक जबाबदार, सक्षम, ज्ञानसंपन्न अधिकारी निवडला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे.
‘तर भविष्याशी खेळण्यासारखे’
‘‘सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे परीक्षा रद्द झाली तर पात्र विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
तसेच पात्र उमेदवाराच्या भविष्याशी खेळ होईल असे आंदोलन केलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शासनापर्यंत ही माहिती पोहोचवावी,’’ अशी विनंती कृषी पदवीधर संघटनेने विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.