Farmer Suicide : युवा शेतकऱ्याचे कसं असतं मानसशास्त्र?

युवा शेतकऱ्याला लहान (कोवळ्या) वयापासूनच कुटुंब प्रमुखाची भूमिका घ्यावी लागते. अकाली आलेले हे प्रौढत्व युवकाच्या मनात नात्यांचे नकारात्मक चित्रण उभे करते. अनेकदा वडील गेल्यानंतर अगोदर जवळ असलेले नातेवाईकसुद्धा पाठ फिरवून जातात.
Farmer Suicided
Farmer SuicidedAgrowon

रेश्मा कचरे

Rural Story : जेव्हा एक शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करतो, तेव्हा तो त्याच्या कुटुंबाला शेतीचा आणि आत्महत्येने मागे सोडलेल्या अस्थैर्याचा वारसा देऊन जातो. या कुटुंबातील मुले अजाण वयापासूनच मानसिक तणावात वाढतात. अशा अस्वस्थ वातावरणातून आणि निराशेच्या काळभोरातून युवा शेतकऱ्याचा जगात प्रवेश होतो.

युवा शेतकऱ्याला लहान (कोवळ्या) वयापासूनच कुटुंब प्रमुखाची भूमिका घ्यावी लागते. अकाली आलेले हे प्रौढत्व युवकाच्या मनात नात्यांचे नकारात्मक चित्रण उभे करते. अनेकदा वडील गेल्यानंतर अगोदर जवळ असलेले नातेवाईकसुद्धा पाठ फिरवून जातात.

दुःखाच्या काळात हव्या असलेल्या सांत्वनापासून तर हा युवक वंचित राहतो, परंतु भविष्यातही कौटुंबिक प्रेम ही एक काल्पनिक गोष्ट बनून राहते.

मानसिकरीत्या स्वस्थ प्रौढाचा पाया हा बालपणीच साकारला जातो. निःस्वार्थ प्रेम व समर्थन बालपणात अत्यंत गरजेचे असते. शेतकरी मूल (लेकरू) यापासून तर वंचित राहतेच, पण अकाली मरणाचा आघात सुद्धा त्यांच्या मनावर होतो.

आत्महत्या केलेला निघून गेल्यावर, शेतकरी कुटुंबाला अनेक मानसिक आणि आर्थिक तणावांना सामोरे जावे लागते. या समस्यांना तोंड देण्यासाठी अनेकदा शेतकरी युवकांना कुटुंबाचा आधार नसतो. कुटुंबातील सदस्य दुःखाने दुबळे झालेले असतात.

Farmer Suicided
Farmer Suicide : उपाययोजनानंतरही वाढल्या शेतकरी आत्महत्या

कुटुंबाला आधार देण्यासाठी, किशोर वयातच या मुलांना शिक्षण सोडावे लागते. आपल्या समवयस्क मित्रांना शाळेत जाताना पाहून कुटुंब आणि परिस्थितीबद्दल मनात तिरस्कार निर्माण होतो.

कसेबसे दहावीपर्यंत जरी शिक्षण पूर्ण झाले, तरी या युवकांना आपल्या स्वप्नांचा त्याग करून शेवटी शेतीकडेच वळावे लागते.

शेतीच्या मार्गात अनेक युवक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती करतात, परंतु काहींना परिस्थितीमुळे आपल्या वडिलांचा मार्ग स्वीकारावा लागतो. नवीन कुटुंब साकार व्हायच्या आधीच अंत पावते. अशा परिस्थितीत प्रचंड निराशा आणि अवास्तव राग हे सामान्य घटना होऊन जातात.

ताणलेली कौटुंबिक नाते आणखी ताणली जातात. अनेक युवक जबाबदारी आणि तणावाला त्रासून व्यसनांकडे वळतात आणि अशाने कुटुंब आणखी खोळंबून जाते. ग्रामीण भागात अतिशय तरुण वयात लग्न होणे हे सामान्य बाब आहे.

पण आत्महत्याग्रस्त परिवारात नवीन व्यक्तीची भर ही कितीदा अपायकारक ठरते. व्यसनाच्या भरात अनेक तरुण घरगुती हिंसाचाराकडे वळतात. घरात भीतीदायक वातावरण निर्माण होते आणि याचा परिणाम इतर कुटुंबीय सदस्यांवर सुद्धा होतो.

घरामध्ये पुढची पिढी आल्यावर शेतकरी युवकाला आणखी नवीन प्रश्‍नांना सामोरे जावे लागते. या शेतकरी युवकाने वडिलांचे छत्रछाया हे लहानपणीच हरवलेले असते. म्हणून तरुण वयात आलेले हे पितृत्व कठीण प्रश्‍न म्हणून उभे राहते.

Farmer Suicided
Farmer Suicide : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी साहित्याची निर्मिती व्हावी

अनेक तरुण समंजसपणे आपली मुले वाढवायचा प्रयत्न करतात पण भूतकाळातील निराशेचे डोंगर पुढच्या पिढीच्याही आयुष्यात आपली सावली टाकतात. परिस्थिती आणि भूतकाळात झालेला आघात वर्तमानातील प्रयत्नांना मात देतो. असा हा निराशेचा वारसा पुढे चालत राहतो.

दोन दशकांनंतर शेतकरी कुटुंब रचना आणि संबंध यांच्यात बदल व्हायला सुरुवात झाली आहे. अनेक संस्थानांच्या कार्यामुळे शेतकरी कुटुंबातील तरुण शिक्षित होऊन वेगवेगळ्या मार्गांवर चालू लागला आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि मानसिक स्वास्थ्यात होणाऱ्या नकारात्मक बदलामुळे अजूनही कुटुंबे उध्वस्त होत आहेत.

लोकसंख्या आणि भारतात असलेली सामूहिक संस्कृती लक्षात घेता, सामुदायिक हस्तक्षेप हा एक उपाय म्हणून उजेडास येतो. शासन व समाज यांनी एकत्रित येऊन शेतकरी युवकांसाठी एक समर्थक समुदाय तयार करणे गरजेचे आहे.

विकासात्मक मानसशास्त्रज्ञ आणि शासनाकडून शेतकरी बालकांवर होणारा मानसिक व भावनिक तणाव रोखण्यासाठी उपचारिक पुढाकार आला पाहिजे. शिक्षकांना तणावात असलेली मुले ओळखणे व त्यांना योग्य ते समुपदेशन देण्याचे प्रशिक्षण मिळाले पाहिजे.

तरुण वयातच जर व्यक्तिमत्त्वात होणारे नकारात्मक बदल रोखल्या गेले तर भविष्यात होणारा कौटुंबिक तणावसुद्धा कितीतरी टप्प्याने कमी होईल. ग्रामीण भागात मानसिक स्वास्थ्याबद्दल अजूनही जागरूकता नाही, अशावेळेस ग्रामीण भागातील लोकसंख्या विचारात घेऊन कौटुंबिक मानसोपचार केंद्रे उभारण्याला प्रोत्साहन हवे.

या काळातही शेतकरी कुटुंबाला अनेक समस्या भेडसावत आहेत पण सामुदायिक प्रेम आणि समर्थन या सर्वांवर मात करू शकेल एवढीच आशा आहे.

मनोबल आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन ७४१२०४०३००, (लेखिका परिवर्तन संस्था, पुणे येथे कार्यरत आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com