शासनाच्या आश्‍वासनांवर पुणतांबेकर समाधानी

सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलन मागे
शासनाच्या आश्‍वासनांवर पुणतांबेकर समाधानी
Puntamba Farmer ProtestAgrowon

नगर ः पुणतांबा (ता. राहाता) येथील गावकऱ्यांनी स्थगित केलेले आंदोलन (Farmer Protest) आता मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. शासनाकडे केलेल्या १४ मागण्यांबाबत मुंबईत झालेल्या बैठकीत समाधान झाले. त्यामुळे हे आंदोलन (Agitation) मागे घेत असल्याचे गुरुवारी (ता.९) पुणतांबेकरांच्या कोअर कमिटीतील सदस्यांनी जाहीर केले. राज्य सरकारशी शेतकऱ्यांच्या १४ विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य सरकारने वेळ मागितला आहे. आमचे नऊ प्रश्‍नांच्या तोडग्यावर समाधान झाले आहे, असे सदस्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी किसान क्रांतीच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले होते. शेतकऱ्यांनी चार दिवस धरणे आंदोलन केले. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांशी चर्चा करून, सात जून रोजी मंत्रालयात बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दुग्धविकासमंत्री सुनील केदार, प्रधान सचिवांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या १४ प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली.

शिल्लक उसाला अनुदान, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक जुलैपर्यंत ५० हजार रुपयांचे अनुदान, दुधाला एफआरपी देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणे, कृषिमूल्य आयोग नेमणे, पंचाहत्तर टक्के वीजबिल माफी, आदी प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन बैठकीत देण्यात आल्याचे कोअर समितीने सांगितले.

कांदाप्रश्‍नी तोडगा नाही

बैठकीत कांदानिर्यातीबाबतही चर्चा करण्यात आली. मात्र या प्रश्‍नावर ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांचे समाधान झाले नाही. सर्व प्रश्‍नांबाबत शासन लवकरच आपली भूमिका जाहीर करील. प्रश्‍न सुटले नाहीत, तर पुन्हा आंदोलन केले जाईल, असे या वेळी कोअर कमिटीने सांगितले. दरम्यान, पाच वर्षांपूर्वी पुणतांब्यातून शेतकरी संपाला सुरुवात झाली होती. यंदा मात्र केलेल्या आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com