
राज्यातील भूजल पातळीत होणारी घट लक्षात घेऊन पंजाब सरकारने दीर्घकाळासाठी शाश्वत शेतीचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. भातपिकाची पारंपरिक पद्धत सोडून थेट बियाणे पेरणी करणाऱ्या (DSR) शेतकऱ्यांना पंजाब सरकार एकरी १५०० रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. याशिवाय आता राज्य सरकार पाण्याची बचत करणाऱ्या शेतकऱ्यांना रोख बक्षीस देणार आहे.
संगरूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही पाणीबचत योजना प्रायोगिक स्वरूपात राबवण्यात येत आहे. खरिप हंगामात शेतकऱ्यांना प्रति १ हजार लिटर पाणी बचतीमागे २ रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. संगरूर जिल्हा कृषी मुख्यालयाकडून सुनम आणि धुरी या गटातील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
या प्रायोगिक योजने अंतर्गत कृषी विभाग कमी काळात हाती येणाऱ्या पिकाचे वाण शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देणार आहे. तसेच पाणी बचतीचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.
शेतकऱ्यांकडून या खरिपात सिंचनासाठी किती पाणी वापरण्यात आले, हे पाहण्यासाठी ट्यूबवेलमध्ये पायझोमीटर बसवण्यात येत आहेत. या मीटरमुळे भातपिकाच्या पारंपारिक वाणांना किती पाणी लागत होते आणि अल्पकाळात हाती येणाऱ्या संशोधित वाणामुळे पाण्याची किती बचत झाली हे समजणार असल्याचे संगरूरचे जिल्हा कृषी अधिकारी जसविंदर सिंग ग्रेवाल म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांना प्रति १ हजार लिटर पाणी बचतीसाठी २ रुपये अशा हिशोबाने रोख बक्षीस दिले जाणार आहे. या दोन्ही गटात ३४ क्लस्टर्सची निवड करण्यात आली आहे. एका क्लस्टरमध्ये ५० एकर शेतजमिनीचा समावेश असणार आहे. या सर्व शेतकऱ्यांना आम्ही पीआर१२६ हे अल्प काळात परिपक्व होणारे भातपिकाचे बियाणे मोफत देणार आहोत. हे वाण पारंपारिक वाणापेक्षा कमी काळात अधिक उत्पादन देते, त्यासाठी पाणीही कमी लागत असल्याचे ग्रेवाल म्हणाले आहेत.
सर्वाधिक पाणी लागणाऱ्या भातपिकाच्या 'पुसा ४४'ला पर्याय म्हणून 'पीआर १२६' या वाणाचा पर्याय समोर आणण्यात आला आहे. कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या या वाणाचा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभरात त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे कृषी संचालक गुरविंदर सिंग म्हणाले आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.