
Mango Kolhapur News : आंब्याचे मार्केटिंग करताना आंबा उत्पादक क्यूआर कोडचा वापर करत असल्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आंबा खरेदी करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
उत्पादकालाही चांगला दर मिळत आहे. यासाठी सर्वच आंबा उत्पादकांनी ‘क्यूआर कोड’चा वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व २०२३ स्मृती शताब्दी वर्ष सांगता कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शाहू मिल येथे आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते व श्री. केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले उपस्थित होते.
पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. घुले म्हणाले, की करवीरवासीयांनी नैसर्गिकरीत्या पिकविलेला अस्सल कोकणातील हापूस आंबा व केसर आंबा उपलब्ध व्हावा, तसेच आंबा उत्पादकांना सुद्धा योग्य दर मिळावा, यासाठी हा महोत्सव १४ मेपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत आयोजित केला आहे.
प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या ५२ जाती
आंबा प्रदर्शनामध्ये आंब्यांच्या विविध ५२ जाती पाहण्यासाठी व माहिती होण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये जहांगीर पसंत, गोवा मानकूर, हापूस, सुपर केसर, करण जिओ, मबाराम, तोतापुरी, वनराज, बनारसी हापूस, दूध पेढा, वेलाई कोलंबन, रुमानी, सब्जा, केसर, करेल, मुशराद, बाटली, बबेंगलोर गोवा, मलीका, बदाई गोवा, बदामी, उस्टीन, लिली, सिंधू, आम्रपाली, माया, केंट, नीलम, रायवळ, लंगडा, पायरी, टॉम ऑटकीन, बारमाही, जम्बो केसर, बारमासी, बनेशान, इस्रायली, पामर, किट, फर्नांडिस, बिटक्या, दशहरी, कोकण सम्राट, रत्ना, सोनपरी, सिंधू, फ्रान्सिस आदी दुर्मीळ आंब्यांच्या जाती आहेत. केसर व हापूस आंबा रोपे या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.