कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्यात पूर्वमोसमी (Pre-Season Rain) पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. यातच विदर्भात उन्हाची ताप (Temperature) वाढत आहे. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Rain Prediction) असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा (Heat Wave) हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने उष्णतेची लाट आली अनुभवायला मिळाली. चंद्रपूर, गोंदिया, वर्धा येथे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही कमाल तापमान ४० पार पोचले आहे. तर पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने मध्य महाराष्ट्रात तापमान ३७ अंशांच्या खाली आहे.

बुधवारी (ता. १) दुपारनंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील अकोले येथे ५० मिलिमीटर, श्रीरामपूर येथे २० मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर मराठवाड्यातील लातूरच्या उदगीर, औसा, परभणीतील धालेगाव, बीड मधील आंबेजोगाई येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आग्नेय उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून नागालॅण्ड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्चिम सक्रिय आहे. बंगालपासून आंध्रप्रदेश पर्यंत हवेचा कमी दाहाचा पट्टा तयार झाला आहे. तर अंदमान समुद्र आणि लगतच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

गुरुवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.६, नगर ३५.१, धुळे ४०.५, जळगाव ४१.२, कोल्हापूर ३४.२, महाबळेश्वर २४.६, नाशिक ३६.२, निफाड ३६.८, सांगली ३५.८, सातारा ३३.८, सोलापूर ३७.२, सांताक्रूझ ३४.०, डहाणू ३४.२, रत्नागिरी ३३.२, औरंगाबाद ३९.०, परभणी ४०.७, नांदेड ४०.८, अकोला ४३.७, अमरावती ४०.२, बुलडाणा ३९.५, ब्रह्मपुरी ४५.२, चंद्रपूर ४४.८, गोंदिया ४४.८, नागपूर ४३.८, वर्धा ४४.०.

मॉन्सून आगमनासाठी वाट पहावी लागणार

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुजरातच्या उंबरठ्यावर पोचले आहेत. मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची वाटचाल काहीशी थबकण्याची चिन्हे असून, महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी वाट पहावी लागणार आहे. मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, तमिळनाडूतील मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कायम असून, ईशान्य भारतातील मणिपूर, नागालॅण्ड, मिझोराम राज्यात मॉन्सून दाखल झाला असून, बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने प्रगती केली असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com