Rain : रेन रेन गो अवे...

या वर्षीचा पाऊस फक्त आपल्याकडे कोसळला असं नाहीये. पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला ग्रीनलॅंडमध्येही तो पडला. पण त्याचं इथलं पडणं जगावेगळं होतं. ग्रीनलॅंड हा उत्तर ध्रुवाजवळील देश. आर्क्टिक आणि अटलांटिक महासागरांमध्ये बसलेलं हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे. या वर्षी ग्रीनलॅंडमध्ये पाऊस झाला खरा पण संपूर्ण जगाने त्याची दखल घेतली. हा पाऊस एवढा खास का आहे, की जगाने त्याची दाखल घ्यावी? कारण ग्रीनलँडच्या इतिहासात इथं पहिल्यांदा पाऊस पडला. या देशाचा बहुतांश पृष्ठभाग वर्षभर बर्फाखाली असतो. ग्रीनलँडची बर्फाची ढाल सुमारे साडेसहा लाख मैल पसरलीय. म्हणून इथलं तापमान कायम शून्य अंशाखाली असतं. त्यामुळे इथं पाऊस पडत नाही, तर डायरेक्ट बर्फवृष्टी होते.
Rain
RainAgrowon

अंगकोरवाट म्हणजेच कंबोडियाच्या सांस्कृतिक राजधानीतून सायकलिंग करत आम्ही थायलंडमध्ये प्रवेश केला होता. उत्तर थायलंडच्या रॅनॉन्ग या शहरात आम्ही पोहोचलो. दिवसभरच्या पायडलपिटीने जरा दमछाक झाली होती. संध्याकाळची वेळ होती. शॉवर घेतला आणि खाण्यासाठी एखादं चांगलं हॉटेल मिळतं का हे शोधायला बाहेर पडलो. थोड्या शोधाअंती लहानसं, स्वच्छ असं रेस्टारंट मिळालं.

छोट्याशा हिरव्यागार टेकडीवजा उंचवट्यावर ते दिमाखात बसलं होत. आजूबाजूची झाडी आणि हिरवळ त्याच्या सौंदर्यात भर टाकत होती. ‘सवादी साऽऽर अशी मंजुळ साद घालत ती थाई ललना मेनूकार्ड घेऊन आली. दोन-तीन पदार्थांवर बोट ठेवत ऑर्डर पक्की केली. ‘खामखुन खाऽऽआ!’ असं म्युझिकल धन्यवाद देत ती आली तशी किणकिणत किचनच्या दिशेने निघून गेली.

जेवण येईपर्यंत येथील परिसराचा अंदाज घेऊ लागलो. या हॉटेलमध्ये सगळीकडे आकाशकंदिलासारख्या पताका लावल्या होत्या. इथं उत्सव वगैरे आहे का? म्हणून विचारलं. यावर, ‘त्या पावसाला पळवण्यासाठी लावल्या आहेत’ असं उत्तर मिळालं. काय? पावसाला पळवायला? मी उडालोच.

आपल्याकडे ‘येरे! येरे! पावसा’ म्हणतात, पण इकडे मात्र ‘जारे! जारे ! पावसा’ म्हणत पताका बांधतात. कुतूहल चाळवलं आणि अजून माहिती काढायला सुरुवात केली. इकडे भरमसाट पाऊस कोसळतो. कधी कधी तो चिकट पाहुण्यासारखा लांबचा मुक्काम ठोकतो. मग नद्यानाल्यांना पूर येतात. शेतीचं नुकसान होतं, लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प होतात. त्यामुळे पाऊस थांबवा म्हणून असे तोटके केले जातात.

अशीच अजून एक धारणा पाऊस थांबवण्यासाठी थायलंडमध्ये वापरली जाते. एखाद्या कुमारिकेला गवती चहा द्यायचा आणि तिला तो मातीत खोचायला सांगायचा. त्यामुळे पाऊस येणार नाही आणि दिवसभर सूर्य तळपत राहील, असा समज थाई समाजात आहे. या प्रथेला ‘बपाक क्ता क्राई’ असं म्हणतात. याच वर्षी बँकॉकमधील पेपरातल्या बातमीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पावसाने वैतागलेल्या भाजीपाल्याच्या दुकानदाराने एक किलो गवती चहा बायकांना फुकट वाटला होता म्हणे.

याच आशेवर, की त्यातल्या कुमारिका तो मातीत लावतील आणि हा पाऊस थांबेल. या उपायामुळे पाऊस थांबेल की नाही ते माहीत नाही, पण ओल्या दुष्काळात कुमारिकांना जोडधंदा म्हणून पाऊस पळवायची कामं मिळू शकतील, अशी ओली आशावादी कोटी मात्र मनात तरळून गेली.

Rain
Monsoon IMD: मॉन्सून आणि राजकारण यांचा संबंध काय ?

आपल्याकडे देखील वेगवेगळ्या आदिवासी जमातींमध्ये पाऊस पाडण्यासाठी आणि पळवण्यासाठी काही उपाय रूढ झाले आहेत. माझ्या लहानपणी, धनगर लोकांच्या बाबतीत एक गोष्ट ऐकलेली होती. हे लोक गारपीट रोखण्यासाठी करंगळी कापून देवाला आवाहन करायचे आणि त्यामुळे गारा थांबायच्या असं मोठे सांगायचे. गावाबाहेरच्या शेतात आपला पाल टाकून बसलेले धनगर त्यामुळे नेहमी कुतूहलाचे विषय असायचे. यावर्षी तर पावसाने वैतागलेल्या नेटकऱ्यांनी बेडकांचा घटस्फोट करायचा मिश्किल सल्लादेखील दिला.

पावसाच्या पळवापळवीचे संदर्भ जगभरात आढळतात. अगदी सध्याच्या आधुनिक काळात देखील. मंत्रोपचाराने पाऊस पळवायचा व्यवसाय इंडोनेशियामध्ये तेजीत आहे. इथे मोकळ्या मैदानात कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर आयोजक ‘रेन मास्टर’ म्हणजे पाऊस थांबवणाऱ्याला पाचारण करतात. कार्यक्रमाआधी हा ‘पाऊस मास्तर’ पाली भाषेतील मंत्रोच्चार करतो.

Rain
Nanded Rain : नांदेडला सरासरीच्या १३० टक्के पाऊस

पर्जन्यदेवाला फळं, अंडी आणि पेयपानाचा नैवेद्य दिला जातो. एका कार्यक्रमासाठी पाऊसबंदी करायची त्याची फी असते फक्त तीस लाख रुपये! दचकू नका, हे इंडोनेशियन रुपये आहेत. भारतीय रुपयात ते होतात साधारणतः पंधरा हजार. बालीमधील एक कंपनी तर ‘पाऊस पळवून मिळेल होऽऽ !’ अशी इंटरनेटवर जाहिरातदेखील करते. या पाऊसबंदीला तसा शास्त्रीय आधार नाहीये, पण तरीही इंडोनेशियामध्ये लग्नसमारंभ, संगीताचे कार्यक्रम आणि क्रीडास्पर्धांमध्ये पाऊस मास्तरांची सेवा न चुकता घेतली जाते, हे मात्र खरं.

Rain
Climate Change : वातावरण बदलामुळे उष्णतेचा चटका तीव्र

दक्षिण आफ्रिकेतील काही जमातींमध्येही पाऊस पळवणारे लोक आहेत. पण मलेशियन लोकांचा पाऊस पळवण्याचा कार्यक्रम मात्र अगदी स्वस्त आहे. त्यासाठी ते कांदा आणि मिरची एका काठीला टोचतात आणि जमिनीत उभी खोचतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील पाऊस पळवायची प्रथा आहे. येथील ‘सांता क्लारा’मध्ये पाऊस थांबवण्यासाठी चर्चमध्ये अंडी वाहतात. आयरिश कॅथॉलिक प्रथेनुसार ‘चाइल्ड ऑफ प्राग’ या देवाचा पुतळा अंगणात ठेवायचा म्हणजे तो पावसाला थांबवतो.

या वर्षीचा पाऊस फक्त आपल्याकडे कोसळला असं नाहीये. पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाला ग्रीनलॅंडमध्येही तो पडला. पण त्याचं इथलं पडणं जगावेगळं होतं. ग्रीनलॅंड हा उत्तर ध्रुवाजवळील देश. आर्क्टिक आणि अटलांटिक महासागरांमध्ये बसलेलं हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे. या वर्षी ग्रीनलॅंडमध्ये पाऊस झाला खरा, पण संपूर्ण जगाने त्याची दखल घेतली. हा पाऊस एवढा खास का आहे, की जगाने त्याची दाखल घ्यावी? कारण ग्रीनलँडच्या इतिहासात इथं पहिल्यांदा पाऊस पडला. या देशाचा बहुतांश पृष्ठभाग वर्षभर बर्फाखाली असतो. ग्रीनलँडची बर्फाची ढाल सुमारे साडेसहा लाख मैल पसरलीय. म्हणून इथलं तापमान कायम शून्य अंशाखाली असतं. त्यामुळे इथं पाऊस पडत नाही, तर डायरेक्ट बर्फवृष्टी होते. ‘लै पावसाळे बघितलेत!’ असा मात्र डायलॉग इथल्या लोकांना मारता येत नाही.

ग्रीनलॅंडचा हा पाऊस कोसळला तो तब्ब्ल ३३७००० मैलांवर. म्हणजे संपूर्ण देशातील बर्फाच्या निम्म्या भागावर. तीन दिवस पाऊस कोसळत होता. आपल्याकडे पाऊस आला की थंडी वाढते. पण अगोदरच थंड असलेल्या ग्रीनलँडमध्ये गोठणबिंदूच्या खाली तापमान असल्याने पाऊस आला, की तापमान गोठणबिंदूच्या वर येते आणि बर्फ वितळायला लागतो. या तीन दिवसांत ७०० कोटी लिटर पाणी या बर्फावर बदाबदा कोसळलं. त्यामुळे वातावरण उबदार झालं. त्यांचं उबदार म्हणजे शून्याच्या वर. त्यामुळे बर्फ वितळण्याला सुरुवात झाली.

अमेरिकेच्या ‘यूएस नॅशनल स्नो अँड आईस डेटा सेन्टर’मध्ये १९५० पासून बर्फाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. या केंद्राच्या म्हणण्यानुसार सध्या बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढलंय. ज्या दिवशी हा पहिला पाऊस झाला त्या दिवशी बर्फ वितळण्याचा वेग नेहमीपेक्षा सात पटीने जास्त होता. ग्रीनलॅंडने या वर्षी दशकातला सर्वांत मोठा बर्फ वितळण्याचा सोहळा अनुभवला होता. एका दिवसात तब्ब्ल ८५० कोटी टन बर्फ वितळला होता.

युनाइटेड नेशन्सच्या ‘कोड रेड’ अहवालानुसार जीवाष्म इंधनाच्या ज्वलनामुळे गेल्या २० वर्षांत ग्रीनलँडमधील बर्फ वितळतोय. एका आकडेवारीनुसार २०१९ मध्ये ५३२० कोटी टन बर्फ वितळून समुद्रात स्वाहा झाला होता. त्यामुळे जगभरातल्या समुद्राची पातळी १.५ मिलिमीटरने वाढली. हवामान शास्रज्ञ म्हणताहेत, की बारमाही बर्फाच्या दुलईत लपलेल्या आर्क्टिक महासागरात २०५० पर्यंत बिनबर्फाचा उन्हाळा पाहायला मिळेल. त्यामुळे मुंबई, न्यू यॉर्क आणि ॲमस्टरडॅमसारखी शहरं पाण्याखाली जातील. ग्रीनलॅंडवासीयांसाठी हा पहिला पाऊस मात्र जगबुडीची नांदी देणारा पाऊस ठरतोय हे नक्की.

जागतिक तापमानवाढीमुळे पर्जन्यचक्राचं पोट बिघडलंय. भारतात जेव्हा पाऊस कोसळत होता, पाकिस्तानला पुराचा जबर दणका बसला होता, त्याच वेळी हिरव्यागार युरोप, अमेरिका आणि चीनमध्ये नद्या-नाले कोरडे पडत होते. हा विरोधाभास या वर्षी जरा जास्त जाणवला. मानवाच्या पावलागणिक निसर्गाचा ऱ्हास होतोय. पर्यावरणाचा लचका तोडत आपण या खेळातला नियम अगोदर मोडला आणि रडीचा डाव खेळलाय. त्यामुळे निसर्गचक्रांनी देखील बेतालपणे, नियम मोडत हा खेळ खेळायला सुरुवात केलीय. आता आपल्याला नियम नसलेल्या खेळात भाग घ्यावा लागतोय.

या पुढे बहुतांश भागांत पाऊस पडला, तर एकदम जोरात, एकाच ठिकाणी कोसळेल किंवा गुपचूप दडी मारून बसेल. कधी आठवडे, महिने मुक्काम करेल तर कधी फिरकणारसुद्धा नाही. दुष्काळी भागात सुकाळ येईल आणि सुकाळी पट्ट्यात ‘ड्राय डे’ची पाळी येईल. आपल्याला पावसाचा लहरीपणा लक्षात घेऊन शेतीची कामं, दैनंदिन व्यवहाराचं नियोजन करायला लागेल. वेळेनुसार ‘येरे येरे पावसा’ बरोबर ‘रेन रेन गो अवे’ म्हणायची मानसिक तयारी ठेवावी लागेल.

(लेखक ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा.लि.चे संचालक आणि ड्रीमर अॅंड डुअर्स या पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com