राज्यात पावसाची कमतरता

महाराष्ट्रावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब कायम राहिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पाऊस कमी झाला.
राज्यात पावसाची कमतरता
Rain UpdateAgrowon

महाराष्ट्रावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब (Air Pressure) कायम राहिला. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत जून महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पाऊस (Rainfall) कमी झाला. जूनच्या पहिल्या आठवड्यात अजिबात पाऊस (Rain) न झालेले (१०० टक्के कमतरता) जिल्हे नंदूरबार, धुळे, जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, नांदेड, भंडारा हे असून, ९० ते ९९ टक्के कमतरता असलेल्या जिल्ह्यामध्ये रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशीम, परभणी, बीड असे १६ जिल्हे आहेत. ८० ते ९० टक्के पाऊस कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर, नगर, हिंगोली, यवतमाळ, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे नऊ जिल्हे असून, ३६ ते ५३ टक्के कमी पावसाचे सांगली व उस्मानाबाद हे २ जिल्हे आहेत.

१ जून रोजी लांब पल्ल्याचा, स्थानिक ठिकाणांचा पावसाचा अंदाज दिला होता, तेव्हाच जून महिन्यात पावसात खंड राहण्याचा दिलेला अंदाज खरा ठरला. त्याच वेळी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचा धोका कमी झाला.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी पुन्हा उघडीप झाली. बाष्पिभवनाने शेतातील पाणी गेले आणि पेरण्या लांबल्या. या आठवड्यात क्वचित ठिकाणी अल्पसा पाऊस होणे शक्य दिसते. मात्र पेरणीसाठी तो पुरेसा नसेल. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस अपुरा राहील. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मध्यम पल्ल्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील हवामान खालीलप्रमाणे राहील.

कोकण

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांत रविवारी ३० मि. मी. व सोमवारी ३० ते ७५ मि. मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ७ ते ९ कि. मी. व रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत तो १२ ते १४ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ते ३३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ ते २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत पूर्णतः ढगाळ राहील, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५९ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत रविवारी १२ ते २४ मि. मी. व सोमवारी ११ ते ३१ मि. मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २० कि. मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७७ टक्के तर दुपारची ४२ ते ४४ टक्के राहील.

मराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात पावसात रविवारी उघडीप राहील. तर बीड जिल्ह्यात पावसात सोमवारी उघडीप राहील. लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत रविवारी व सोमवारी मध्यम ते अल्पशा पावसाची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात सोमवारी ३७ मि. मी. पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. तर औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते २१ कि. मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७२ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४० टक्के राहील. याही आठवड्यात पावसाची कमतरता असेल.

पश्‍चिम विदर्भ

बुलडाणा जिल्ह्यात रविवारी २४ मि. मी. पावसाची शक्यता असून अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३ ते ९ मि. मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी वाशीम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत १७ ते ३० मि. मी. पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात मात्र सोमवारी ५३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते १८ कि. मी. राहील. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६८ टक्के, तर दुपारची ४० टक्के राहील.

मध्य विदर्भ

रविवारी नागपूर व वर्धा जिल्ह्यात ४ ते ९ मि. मी, तर यवतमाळ जिल्ह्यात २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी वर्धा व नागपूर जिल्ह्यात ११ मि.मी. व यवतमाळ जिल्ह्यात ६४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून व वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस व किमान तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४१ टक्के राहील.

पूर्व विदर्भ

भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांत रविवारी १२ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता असून, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४६ ते ६९ मि. मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सोमवारी २० ते २७ मि.मी. पावसाची शक्यता असून, गडचिरोली जिल्ह्यात ७० मि.मी. व चंद्रपूर जिल्ह्यात ११६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस व चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सापेक्ष आर्द्रता सकाळी ७७ ते ८८ टक्के, तर दुपारी ४५ ते ४१ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत रविवारी ६ मि.मी. व तर सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात ३६ मि. मी. व इतर जिल्ह्यांत ३ ते ६ मि. मी. अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १२ ते २२ कि. मी. राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत ३३ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्‍ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सापेक्ष आर्द्रता सकाळी ७० ते ८० टक्के व दुपारी ३६ ते ५३ टक्के राहील. याही आठवड्यात पावसात कमतरता राहील.

कृषी सल्ला

१) जमिनीत ६५ मि.मी. अथवा त्याहून अधिक (दोन ते अडीच फुटापर्यंत) ओल असेल, तरच मूग, उडीद, चवळी, मटकी, तूर, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या पिकांच्या पेरण्या कराव्यात.

२) धूळवाफ पेरणी करू नका.

३) भात रोपवाटिकेस गरज वाटल्यास झारीने पाणी द्यावे.

४) टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची, मिरची यांचे रोपवाटिकेस आवश्यकतेनुसार झारीने पाणी द्यावे.

डॉ. रामचंद्र साबळे,

ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ,

संस्थापक सदस्य, ॲग्रिकल्चर मेटेरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com