
Nashik Onion Protest News : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याच्या दरात (Onion Rate) सातत्याने घसरण होत असून उत्पादन (Onion Production Cost) खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे.
शासनाने खते, कीटकनाशकांच्या किमतीमध्ये नियंत्रण आणून कांद्याची निर्यातबंदी खुली करावी.
कांद्याला कमीतकमी १५०० रुपये हमीभाव मिळवून द्यावा, या मागण्यांसाठी सटाणा तालुका महाविकास आघाडीतर्फे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मालेगाव रस्त्यावर कांदा ओतून तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक दुतर्फा ठप्प होती.
सटाणा बाजार समितीसमोर माजी आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. प्रशांत सोनवणे, शहरप्रमुख रवींद्र सोनवणे, काँग्रेसचे प्रा. अनिल पाटील, शहराध्यक्ष किशोर कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील संतप्त कांदा उत्पादक शेतकरी बाजार समितीसमोर एकत्रित आले होते.
या वेळी माजी आमदार चव्हाण म्हणाल्या, मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्यास कवडीमोल दरात विकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आल्याने बळीराजा उद्ध्वस्त होत आहे.
मात्र, सध्या राजकारण आणि आमदारांना फोडण्यात व्यस्त असलेल्या कृषीप्रधान महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांना बळीराजाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे मोठे दुर्दैव आहे.
शासनाने कांद्याला तत्काळ हमीभाव मिळवून देताना त्यांना अनुदानाऐवजी हक्काचे बाजारभाव मिळवून द्यावे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त इशारा दिला.
माजी आमदार चव्हाण म्हणाले, की कांदा पिकविण्यासाठी एकरी ८० हजार रुपये खर्च येत असताना आज विक्रीद्वारे उत्पादन खर्चही वसूल होत नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. मात्र शेतमालाच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे हा फक्त ‘चुनावी जुमलाच’ होता असे दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.