सरकारी मदतीपेक्षा बाजारपेठेचे स्वातंत्र्य द्या

शेती व्यवसायामध्ये अडचणीत भर पडण्यामध्ये सरकारही तितकेच जबाबदार आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे. मात्र शेतकऱ्यांना पिकविलेल्या शेतमालाला दर ठरविण्याचा अधिकार नाही.
Indian Farmer
Indian FarmerAgrowon

सांगली : शेतकऱ्यांना बाजारपेठ व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांची मक्तेदारी वाढली आहे. व्यापारी धोरणांमुळे शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही मिळत नसल्याने कर्जबाजारी होत असल्याचे स्पष्ट झाले. सरकारकडून कर्जमाफीसारख्या योजना राबविल्या जातात, मात्र कालांतरानेही कर्जाचा बोजा कायम राहतो. त्यामुळे सरकारी मदतीपेक्षा शेतकऱ्यांना बाजारपेठेचे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे, असे मत शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे-पाटील यांनी शनिवारी (ता.२८) व्यक्त केले.

सांगली येथे संघटनेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात बहाळे-पाटील बोलत होते. ते म्हणाले, शेती व्यवसायामध्ये अडचणीत भर पडण्यामध्ये सरकारही तितकेच जबाबदार आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे. मात्र शेतकऱ्यांना पिकविलेल्या शेतमालाला दर ठरविण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य नसल्याने व्यापाऱ्यांची मक्तेदारी वाढत चालली आहे. हे धोकादायक आहे. सरकारकडून विविध योजनांतून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला जातो. कर्जमाफी दिली जाते. परंतु शेतकऱ्यांवरचा बोजा पुन्हा वाढतो. त्यामुळे बाजारपेठेचे स्वातंत्र्य देण्याची गरज आहे.

बहाळे-पाटील म्हणाले, जनुकीय अभियांत्रिकीचे बियाणे वापरण्यासाठी अजित नरदे यांनी आयुष्य वेचले. कापसाच्या जी. एम. बियाण्यांमुळे २००५ पर्यंत कापूस आयातदार भारत निर्यातदार बनला. परिणामी देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार घाटा कमी झाला. आता या तंत्राने पिकात औषधी गुण आणता येतात. त्यामुळे छोटे शेतकरीही औषधांच्या किमतीने आपला माल विकतील. शेतकऱ्यांनी हे विषय समजून घ्यायला हवेत.’’ या वेळी संघटनेचे सहकार विभाग आघाडीप्रमुख संजय कोले, सीमा नरोडे, शीतल राजोबा, रावसो दळवी, शंकर कापसे उपस्थित होते.

राज्य सरकार कुचकामी

शेतमाल बाजाराचे काही प्रमाणात स्वातंत्र्य देण्याला दिल्लीच्या आंदोलनात विरोध झाला. तसेच जनुकीय तंत्रज्ञानाला केंद्राने परवानगी देताना राज्यांना चाचण्या घेण्याला परवानगी देण्याचे अधिकार दिले. पण राज्य सरकार चाचणी घेण्यास परवानगी देत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकार कुचकामी आहे,असा आरोप बहाळे-पाटील यांनी केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com