
मनोज कापडे / अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः सह्याद्रीतील पर्वतरांगांमध्ये गोठा तयार करीत जिद्दीने दूध उत्पादन करणाऱ्या एका कष्टाळू शेतकरी दांपत्याची कहाणी ‘अॅग्रोवन’मधून प्रसिद्ध होताच मदतीचे काही हात पुढे आले आहेत. मुंबईतील एका शेतकरी महिलेने बुटाचे जोड भेट देत कचरे दांपत्याच्या अनवाणी दुखऱ्या पायांवर मायेची फुंकर घातली आहे. तर, दुसऱ्या एका शेतकरी वास्तुविशारद तरुणाने सौरदिवा भेट देत या दांपत्याची झोपडी उजळून टाकली आहे.
सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या विंझर (ता. वेल्हे, जि. पुणे) गावातील कष्टकरी शेतकऱ्यांनी दुधाचा जोडधंदा उत्तमपणे सांभाळला आहे. त्यामुळे या गावाला दुधाची पंढरी म्हणून ओळख मिळाली. या गावातून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक (कात्रज) संघ तसेच फडके डेअरीला निर्भेळ दुधाचा पुरवठा होतो. दूध उत्पादनात गावाला आघाडीवर नेण्यात भोसले कुटुंबांप्रमाणेच धनगरवस्तीचा वाटा आहे.
या वस्तीवरील दूध उत्पादक शेतकरी मालू कोंडिबा कचरे व सौ. प्राजक्ता कचरे यांची संघर्षमय दिनचर्या ‘अॅग्रोवन’ने २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केली होती. ‘एक दिवस बळीराजाबरोबर’ या मथळ्याखाली कचरे दांपत्याची कहाणी प्रसिद्ध होताच अनेक वाचक हेलावले व मदतीसाठी पुढे आले.
सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगेतून एक उपरांग विंझरच्या दिशेने उतरते. याच रांगेत एक दीड तास उंच चालून गेल्यानंतर मालू कचरे आपल्या दुभत्या जनावरांच्या गोठ्यात पोचतात. गोठ्यात राहतात आणि तेथून डोक्यावर दुधाच्या किटल्या वाहून पुन्हा गावात दूध संकलन केंद्रांवर पोहोचतात. त्यांची या संघर्षमय प्रवासाची माहिती वाचून मुंबईतील एक महिला शेतकऱ्यांनी दोघांसाठी नव्या कोऱ्या बुटाचे जोड पाठविले. तसेच, त्यांना हस्तचलित कडबा कुट्टी यंत्र घेऊन देण्याच्याही हालचाली सुरू केल्या आहेत. ‘अॅग्रोवन’मुळे मिळणारी ही मदत पाहून कचरे दांपत्याच्या आनंदाला पारवार राहिलेला नाही.
मुलीच्या शिक्षणासाठी मदतीचे नियोजन
कचरे दांपत्याला मदत मिळावी यासाठी मुंबईतील एक शेतकरी कुटुंबातील आर्किटेक्ट अतुल देशमाने यांनीही मदतीची जुळवाजुळव केली. त्यांनी एक सौरदीवा थेट ‘अॅग्रोवन’च्या कार्यालयात पाठवला. कचरे दांपत्याच्या गोठ्यात तो बसविण्यात यावा, अशी इच्छा श्री. देशमाने यांनी व्यक्त केली. काही वाचक त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे नियोजन करीत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणककारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के हे कचरे दांपत्याला भेटण्यासाठी डोंगरातील त्यांच्या गोठ्याला भेट देणार आहेत. श्री. म्हस्के हे कात्रज डेअरीचे ज्येष्ठ संचालक असून कचरे दांपत्याकडून होणारा दूध पुरवठा थेट ‘कात्रज’लादेखील होतो.
मुलांचाही घराला हातभार
कष्टपूर्वक दूध उत्पादनातून संसार चालत नसल्याने कचरे दांपत्य स्वतःची शेती आणि गोठा सांभाळून पुन्हा मजुरीला बाहेर जातात. त्यांचा एक मुलगा हॉटेलमध्ये कामाला जात असून दुसरा मुलगादेखील महाविद्यालयीन शिक्षण खंडीत करून हॉटेल कामाला जाण्याच्या तयारीत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.