Dry Land Farming : कोरडवाहू शेतीतील खर्च करा कमी

मी मराठवाड्यातील कोरडवाहू शेती कसणारा एक शेतकरी आहे. कोरडवाहू शेती करताना मला आलेल्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे मी या शेतीचे वास्तव सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करीत आहे.
Dry Land Farming
Dry Land FarmingAgrowon

दीपक जोशी

प्रथम कोरडवाहू शेतीच्या (Dry Land Farming) अत्यंत कमी उत्पादकतेबाबत शेतकरी मित्र, कृषी क्षेत्रातील विस्तार कार्यकर्ते, तसेच संशोधक शास्त्रज्ञ या सर्वांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे, असे मला वाटते. कारण एखादे पीक अपयशी ठरले, तर त्यावर आपल्याकडे पीक बदल हा पर्याय पटकन सुचविला जातो.

परंतु त्या पिकाच्या अपयशावर फारशी चर्चा केली जात नाही. त्यामुळे शेती ही वेळोवेळी घाट्याची होत चालली आहे. पुरातन काळापासून आपल्याकडे तृणधान्य (millet) आणि कडधान्य वर्गीय पिके प्रामुख्याने घेतली जातात.

परंतु हरितक्रांतीनंतर ९० च्या दशकात यात हळूहळू आमूलाग्र बदल होत गेला. या पिकांची जागा नगदी पिके म्हणून सोयाबीन (Soybean) आणि कापूस (Cotton) यांनी घेतली याचा परिणाम असा झाला, की जनावरांसाठी आणि मनुष्यासाठी घेतली जाणारी तृणधान्य पिके, जसे की ज्वारी, बाजरी नामशेष होत चालली आहेत.

त्याचा परिणाम शेतकरी मित्रांकडे पशूंची संख्या नगण्य झाली. त्याचा परिणाम कोरडवाहू शेतीला दिले जाणारे शेणखत बंद झाले. सातत्याने एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब ०.५ च्या खाली आला. जमिनीची उत्पादकताही घटली. त्यामुळे पिकांना शिफारशीपेक्षा जास्त रासायनिक खताचा वापर करूनही म्हणावे तसे पीक येत नाही.

जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असल्यामुळे उभ्या पिकांनी रासायनिक खते घेण्याचे प्रमाण कमी झाले. याचा परिणाम रासायनिक खते जमिनीत तशीच पडून राहायला लागली आणि हळूहळू ती पाण्यातून झिरपून पाण्याच्या स्रोतात आली.

त्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊन मानवी पिण्याचे पाणी धोकादायक बनू लागले आहे. तसेच प्रतिवर्षी जमिनीची नांगरणी केल्यामुळे मातीच्या कणाची रचना बदलून जमिनीची जलधारण क्षमता कमी झाली.

तसेच दरवर्षीच्या नांगरणीमुळे जेव्हा लहरी पाऊस कमी वेळात जास्त पडतो त्या काळात जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे. याचा परिणाम हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेले सिंचन प्रकल्प गाळाने भरून चालले आहेत. त्यामुळे त्यांची जलधारण क्षमता कमी होत आहे.

आज या पीक बदलाचा परिणाम मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. स्वस्त धान्य दुकानातून गहू आणि तांदूळ कमी भावात मिळत असल्यामुळे ज्वारी आणि बाजरी ही तृणधान्य पिके आहारातून बाद झाली आहेत.

Dry Land Farming
Agriculture Irrigation : जलसंधारणातून कोरडवाहू शेतीला मिळाली शाश्वतता

जुन्या काळी एक वर्ष आड नांगरणी केली जात असे. खरिपातील पिकाच्या क्षेत्राची नांगरणी होत नसे, फक्त उन्हाळ्यात काडीमोड खरडा पाळी मारली जात असे. आणि रब्बीच्या क्षेत्रावर पेरणी करायची त्याचीच फक्त नांगरट केली जात असे.

आता आपण आजच्या कोरडवाहू कापूस पिकाचे वास्तव जाणून घेऊया. महाराष्ट्रात एकरी सरासरी चार क्विंटल कापूस पिकतो. कापसाला किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल सहा हजार ३८० असून एकरी २५ हजार ५२० रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडतात.

आता कापसाला एकरी उत्पादन खर्च किती येतो ते पाहूया... (आकडे रुपयांत)

नांगरणी १५००

वखरणी, रान तयार करणे १५००

लागवड व निंदणी ३०००

आंतरमशागत ६०००

खताच्या दोन मात्रा ६०००

कीडनाशके फवारणी ३०००

वेचणी २०००

एकूण खर्च २३०००

ही सर्व आकडेवारी पाहता शेतकऱ्याला अंदाजे त्याची मेहनत न धरता जेमतेम अडीच हजार रुपये उरतात. मी २०१० पासून पूर्णपणे कोरडवाहू शेतकरी आहे.

त्यामुळे वरील वास्तवाचा विचार करून प्रतापराव चिपळूणकर यांच्याशी विना नांगरणी शेती यावर संवाद साधून मागील चार वर्षांपासून माझ्या कापूस आणि तूर या पिकांतील नांगरणी, आंतरमशागतीसाठी वखरणी ही पूर्णपणे बंद केली आहे.

याचा मला चांगला परिणाम दिसून आला आहे. सुरुवातीला मला लोकांनी वेड्यात काढले होते, परंतु आता हळूहळू या तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेतीत, तसेच द्राक्ष, डाळिंब, मोसंबी या पिकांतही दिसून येत आहे.

जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी आमच्या जवळ बाहेरून विकत आणून काही टाकण्यास पैसे नाहीत. त्यामुळे तण व्यवस्थापन हाच एकमेव उपाय आम्हा शेतकऱ्यांकडे राहिलेला आहे.

तण व्यवस्थापनाचे चांगले परिणाम मला चार वर्षांनंतर दिसू लागले आहेत. मी चौथ्या वर्षी फक्त खताचा एक हप्ता देऊन एका एकरात पाच क्विंटल कापूस आणि १.५ क्विंटल तूर असे पीक उत्पादन घेतले आहे.

माझी चिभड जमीन जिथे पाणी तुंबलेले असायचे तिथे आता हळूहळू वाफसा स्थिती आली आहे. तसेच मागील चार वर्षांपासून माझ्या कापूस पिकावर मावा ही कीड अजिबात आली नाही.

तसेच कापूस पिकाच्या ओळीच्या मधल्या भागात आम्ही ग्रासकटर चा वापर करून तण व्यवस्थापन केल्याचा परिणाम पंचक्रोशीत झालेला फुलकिड्यांचा प्रादुर्भाव माझ्या कापूस पिकावर अजिबात आलेला नाही.

तण व्यवस्थापनामुळे जमिनीत जो सेंद्रिय कर्ब वाढला त्याचा मोबदला आपण मोजत नाही. कापूस पिकामधील तण व्यवस्थापनामुळे जमिनीत नत्र स्थिरीकरण मोठ्या प्रमाणात झाले. त्याचा दृश्य परिणाम म्हणजे पिकाची अवास्तव कायिक वाढ झाली नाही.

Dry Land Farming
Millet Crop Cultivation : कोरडवाहू शेतीसाठी भरडधान्य लागवड फायदेशीर

त्यामुळे कापूस पिकावर किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून आला. कीडनाशकांच्या फवारण्या कमी झाल्या. हे सर्व अनुभव बघता नांगरणी, वखरणी, खताचे अतिरिक्त हप्ते, तसेच कीडनाशकांच्या फवारण्या याचा जर विचार केला तर माझे उत्पन्न वाढले जरी नसले तरी कापूस पीक उत्पादनावर होणारा खर्च बऱ्यापैकी अंदाजे १५ हजार रुपयांपर्यंत कमी झाला.

माझी कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे, की आपण उत्पादनवाढीच्या नादात न जाता खर्च कसा कमी करता येईल यावर गांभीर्याने विचार करावा. कोरडवाहू शेती जर घाट्यात आली, तर शेतीतून स्थलांतर वाढून शहरी लोकसंख्या वाढत आहे.

त्यामुळे शहरातील प्रशासन यंत्रणेला मूलभूत सुविधा देणे हे अशक्य होत चालले आहे. तसेच जेवढे सिंचन प्रकल्प शेतीसाठी बांधलेले आहेत. त्या प्रत्येक प्रकल्पावर शहरी पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी आरक्षण टाकले जात आहे. ही सुद्धा बागायती शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल.

दीपक जोशी ९८५०५०९६९२ (लेखक प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com