
Water Shortage In Jalgaon : खानदेशात गिरणा धरणातून टंचाई दूर करण्यासाठी चौथे आवर्तन सोडण्यात आले होते. हे आवर्तन नदीच्या अंतिम भागात किंवा टप्प्यात पोहोचले आहे. तसेच धुळ्यातील वाडी-शेवाडी (ता. शिंदखेडा) मध्यम प्रकल्पातून डाव्या व उजव्या कालव्यातून १९०.७३६ दक्षलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्याचा आदेश जारी झाला आहे.
सातपुड्यातील अनेर प्रकल्पांतूनही पाणी सोडले जाणार आहे. त्यासंबंधी चोपडा (जि. जळगाव) येथील शेतकरी व कृती समितीचे एस. बी. पाटील यांनी पाठपुरावा केला होता. गिरणेच्या पाण्यामुळे नदीकाठच्या १०० गावांचा पाणीप्रश्न दूर होणार आहे. हे पाणी नदीच्या शेवटच्या भागात असलेल्या कानळदा (ता. जळगाव) पर्यंत पोहोचले आहे.
वाडी शेवाडे प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पाटबंधारे विभागाला दिला. या आवर्तनामुळे शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
वाडी-शेवाडी मध्य प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, ज्येष्ठ नेते डी. आर. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. दीपक बोरसे यांनी जिल्हाधिकारी जयश शर्मा यांच्याकडे केली होती.
त्यावरून शुक्रवारी जिल्हाधिकारी शर्मा यांनी वाडी-शेवाडी मध्य प्रकल्पातून शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीकाठावरील गावांसाठी पिण्याच्या पाणीटंचाई निवारणार्थ मध्यम प्रकल्पातील आरक्षित पाण्यातून १९०.७३६ दक्षलक्ष घनफूट पाणी तालुक्यातील २५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
डाव्या कालव्यावरील २१ गावांसाठी १४५.३७ व उजव्या कालव्यावरील चार गावांसाठी ४५.३६ दशलक्ष घनफूट पाणी एकाच आवर्तनात सोडण्यात येणार आहे.
अटी व शर्तींबाबत सूचना
जिल्हाधिकारी शर्मा यांनी आदेशात म्हटले आहे, की आवर्तन सोडण्यापूर्वी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील फळ्या काढल्याबाबत व पुन्हा टाकून पाणी अडविले जाणार नाही. याबाबतचे संनियंत्रण शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व गटविकास अधिकारी देवीदास देवरे यांनी करावे.
आवश्यक असल्यास पाणी सोडण्यापूर्वीच पोलिस बंदोबस्ताची मागणी करून परिपूर्ण नियोजन करावे. पोलिस अधीक्षकांनी पाणी सोडल्यानंतर नागरिकांकडून पाणी अडविणे, अनुचित प्रकार न होण्यासाठी गरज असल्यास पोलिस बंदोबस्त देणे, पोलिस गस्ती वाहनाने वेळोवेळी भेटी देणे, याबाबत मदत करण्यासाठी अधीनस्त पोलिस ठाण्याचे प्रभारी यांना आदेशित करावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.