ये दोस्ती...

(The Boy in the Striped Pyjamas) लहान मुलं निष्पाप असतात, निरागस असतात. त्यांना क्रूर व्यवहारी जगाचं ज्ञान नसतं, भान नसतं. जसजशी ती मोठी होतात तसतसं त्यांचं बालपण हरवतं, व्यवहार कळायला लागतो आणि ती हळूहळू बाजारू जगाचा भाग बनायला लागतात. त्याआधी मात्र त्यांचं ‘असणं’ म्हणजे निर्व्याजतेचा अखंड परिमळच जणू! - आदिनाथ चव्हाण
ये दोस्ती...
Poster- The Boy in the Striped PyjamasAgrowon

‘सारं जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि सर्व स्त्री- पुरुष त्या रंगमंचावरील पात्रं असतात’, असं प्रख्यात नाटककार विल्यम शेक्सपिअरनं म्हटलं आहे. पृथ्वीतलावरील प्रत्येक माणूस म्हणजे किमान एक कथा असते. आपल्याला भेटणारा हरेक जण एक कथापात्र असतो. त्याच्या किंवा तिच्या प्रत्येकाशी असलेल्या संबंधांतून, नात्यांतून कदाचित आणखी काही कथा, कादंबऱ्या तयार होऊ शकतात; होतातही. अर्थात, त्या लिखित स्वरुपात नसतात. बहुतेकांच्या कथा, कर्मकहाण्या साध्या असतात. त्यात नावीन्याचा अभावही असेल कदाचित! काही कहाण्या मात्र गहिऱ्या असतात. त्या जिवाला कायमचा घोर लावतात.

दुसरं महायुद्ध म्हणजे अशा कहाण्यांचं भांडार. त्यातूनच जागतिक सत्ताधीशांच्या कराल महत्त्वाकांक्षेपुढं असहाय झालेल्या सामान्य माणसांच्या हालअपेष्टांच्या करुण कथांनी अवघं वाङ्‌मयविश्‍व समृद्ध झालं. या महायुद्धानं माणसाच्या माणूसपणाचीच कसोटी पाहिली. या कसोटीवर माणसातला माणूस ठार नापास झाला हो! मानवी क्रौर्याची पराकोटी जगानं पाहिली. साधी साधी माणसं अधिकाराची तलवार हाती आल्यावर बेभानपणानं कसा माणुसकीचा बळी घेऊ शकतात, याचं मानसशास्त्रज्ञानांही थक्क करणारं चित्र पुढं आलं.

या कहाण्यांवर आधारित अनेक चित्रपटही आले. त्यांनाही मोठा प्रतिसाद लाभला. माणसातल्या सैतानाचं रूप पाहून जगभरची विचारी माणसं चकित झाली. लक्षावधी ज्यूंचा बळी घेण्यासाठी हिटलरनामक राक्षसानं बुद्धिभेद करून साध्या माणसांचाच हत्यारासारखा केलेला वापर विचारवंतांच्या, साहित्यिकांच्या चिंतनाचा, चिंतेचा विषय ठरला.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीकडून करण्यात आलेल्या ज्यू लोकांच्या हत्येचं वर्णन करण्यासाठी ‘होलोकास्ट’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘संपूर्ण भाजणे’ असा आहे. ज्यूंचं शिरकाण करण्यासाठी जिवंत जाळण्याचे अघोरी प्रकार छळछावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी युरोपात सुमारे ९० लाख ज्यू होते, ज्यांपैकी दोन तृतीयांश (६० लाख) ज्यू या हत्याकांडात मृत्युमुखी पडले. त्यामध्ये ३० लाख पुरुष, २० लाख स्त्रिया व १० लाख बालकांचा समावेश होता.

हिटलरनं समाजाचं शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व लोकांचे शिरकाण करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत जवळ जवळ सर्व ज्यूंना अटक करून छळछावण्यांमध्ये डांबलं गेलं. या छावण्यांमधील दारुण परिस्थिती, उपासमार, रोगराई, अतिश्रमामुळे अनेक ज्यू मरण पावले. डखाउ, बुखनवाल्ड, आॅशविट्झ या सर्वात प्रथम उभारलेल्या छळछावण्या होत्या. काही छावण्यांमध्ये कैद्यांना एका मोठ्या बंदिस्त खोलीत डांबून त्या खोलीत विषारी वायू सोडला जात असे.

खरं तर ज्यू लोकांचा छळ केला जात आहे हे जर्मनी आणि युरोपमधील सामान्य लोकांना चांगलं ठाऊक होतं. ज्यूंना स्थलांतर करण्यास भाग पाडलं जात आहे आणि शेवटी निर्वासित केलं जात आहे, हेही त्यांच्या लक्षात आलं होतं. ज्यू लोक मारले जात आहेत हे माहीत असलेले बरेच लोक होते. या अमानवी कृत्यांकडं काणाडोळा करून बऱ्याच जर्मनांनी होलोकास्टचा फायदा उठवला. ज्यूंची मालमत्ता आणि वस्तू बळकावल्या.

आपल्याकडं फाळणीच्या वेळी असंच घडलं. म्हणजे इथून तिथून सारी माणसं सारखीच तर, संधी आल्यावर हात धुवून घेणारी, माणुसकीला सोयीनं खुंटीवर टांगून ठेवणारी...संधिसाधू! ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी जागृत आहे अशा काही जर्मनांनी मात्र नाझी विचारसरणीचा प्रतिकार केला. त्यांना सरकारपुरस्कृत त्रासाला सामोरं जावं लागलं. सांगायचा मुद्दा असा की साधे-सरळ जर्मन नागरिक वेळ आल्यानंतर हिटलरच्या क्रूर अमानवी विचारसरणीला बळीच पडले नाहीत तर त्याच्या विचारसरणीचे कडवे समर्थक बनले; त्यातून उद्‌भवलेल्या परिस्थितीचे निर्लज्ज लाभार्थी बनले.

लहान मुलं निष्पाप असतात, निरागस असतात. त्यांना क्रूर व्यवहारी जगाचं ज्ञान नसतं, भान नसतं. जसजशी ती मोठी होतात तसतसं त्यांचं बालपण हरवतं, व्यवहार कळायला लागतो आणि ती हळूहळू बाजारू जगाचा भाग बनायला लागतात. त्याआधी मात्र त्यांचं असणं म्हणजे निर्व्याजतेचा अखंड परिमळच जणू! आजूबाजूला सुरू असलेल्या अन्यायाचं रोकडं आकलन त्यांना होत नाही. केवळ एखादी घटना, प्रसंग म्हणून ती त्याकडं पाहत राहतात, आपल्या परीनं त्याचा बाळबोध अर्थ लावायचा प्रयत्न करतात.

हिटलरच्या छळछावणीत रवानगी होऊ नये म्हणून कुटुंबासह ॲमस्टरडॅममधील (नेदरलँड) एका घराच्या पोटमाळ्यावर लपून बसलेली, पण नंतर नाझींकडून बळी गेलेली ॲन फ्रॅन्क ही चिमुरडी आणि तिची जगप्रसिद्ध डायरी जागतिक अभिजात वाङमयात मोलाचं स्थान पटकावून बसली आहे. त्याविषयी लिहायचं आहे, पण पुन्हा कधी तरी! आज लिहायचं आहे ते ब्रुनो हा नऊ वर्षांचा छोकरा आणि त्याच्याच वयाचा त्याचा मित्र श्म्यूल यांच्या अनोख्या मैत्रीविषयी आणि या मैतरांच्या शोकांत शेवटाविषयी!

जॉन बायेन या इंग्लिश लेखकाचा जन्म सन १९७१ चा! म्हणजे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर तब्बल २५ वर्षांनी त्यांनी भूतलावर पाय ठेवला. तरीही या महायुद्धातील लक्षावधी कहाण्यांपैकी एक कहाणी सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ‘द बॉय इन द स्ट्राइप्ड पायजमाज’ ही नाझी छळछावण्यांच्या पार्श्‍वभूमीवरील एका कहाणीवर बेतलेली त्यांची कादंबरी जगभर गाजली.

सन २००६ मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या या कादंबरीचा मराठीसह ५० भाषांत अनुवाद झाला. ताज्या माहितीनुसार जगभरात तिच्या ९० लाखांहून अधिक प्रती खपल्या आहेत. न्यू यॉर्क टाईम्सच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीतही तिचा समावेश झाला. या पुस्तकावर आधारित चित्रपट सन २००८ मध्ये आला आणि गाजलाही. ही सत्य घटना नसावी असा कयास बांधला जातो. तशी ती कल्पित कथाच आहे. प्रत्यक्षात लेखकानं मात्र याविषयी भाष्य केलेलं नाही.

ही कहाणी नऊ वर्षांच्या ब्रुनोच्या नजरेतून लेखकानं लिहिली आहे. महायुद्धाच्या काळात आजूबाजूला घडणाऱ्या घटना घडामोडी भयावह असल्या तरी बऱ्या वाईटाचं फारसं आकलन नसलेला आणि स्वतःच्याच विश्‍वात रमणारा हा गोड छोकरा बालसुलभ कुतूहलानं आपल्या आकलनानुसार सारं टिपत असतो.

साध्या सोप्या भाषेत लेखक ते आपल्यापर्यंत पोहोचवतो. तो आई, वडील, बहिणीसह बर्लिन इथं टोलेजंग निवासात राहत असतो. वडील हिटलरच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकारी असतात. त्यांना ऑशविट्झ छावणीची जबाबदारी दिली गेल्यानं कुटुंबासह पोलंडला स्थलांतर करावं लागतं. कादंबरीच्या सुरुवातीच्या भागात त्याचं वर्णन आलं आहे. ब्रुनो मित्रांमध्ये रमलेला असतो. त्याला बर्लिन सोडणं जिवावर येतं. शेवटी त्याला कुटुंबाबरोबर जावंच लागतं. त्यांचं नवं घर असतं कुख्यात आॅशविट्झ छळछावणीच्या शेजारी. ‘मॅन्स सर्च फॉर मीनिंग’ या पुस्तकाचे लेखक डॉ. व्हिक्टर फ्रॅन्कल यांनी याच छळछावणीत हालअपेष्टा भोगल्या होत्या. याआधीच्या लेखात त्यांच्या अग्निदिव्याचा परिचय आपण करून घेतला आहे.

ब्रुनोच्या आईला नवी जागा आवडलेली नसते. जर्मन सैनिक, अधिकाऱ्यांचा सतत तिथं राबता असतो. खुद्द हिटलरही एकदा मेजवानीसाठी तिथं येतो. एकूणच मुलांसह राहण्याच्या योग्यतेचं हे ठिकाण नसल्याचं आईचं मत बनतं. छळछावणीत ज्यूंचे मृतदेह जाळल्याचा दुर्गंधही घरात येत राहतो. अर्थात, ब्रुनोला यातील काही कळत नसतं. आईलाही सुरुवातीला याची कल्पना नसते.

एकदा तिथं चाललेल्या हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर ती हादरते. ब्रुनोच्या वडिलांशी या विषयावरून तिचे खूप वाद होतात. मूळ डॉक्टर असलेल्या, पण या घरात वेटरचं काम करणाऱ्या पावेल या ज्यू नागरिकाला दिली जाणारी गुलामाची वागणूक तिला पसंत नसते. छोटा ब्रुनो हे सारं पाहत असतो, आपल्या परीनं त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असतो. ज्यू, जर्मन वंश या गोष्टी त्याच्या आकलनाच्या पलीकडं असतात.

ब्रुनोला तिथं एकही मित्र खेळायला नसतो. स्वतःला तो संशोधक समजत असतो. त्याविषयीच्या त्याच्या धडपडीचं, त्याच्या बाळबोध आकलनाचं वर्णन या कादंबरीत छान पद्धतीनं आलं आहे...

मी जेव्हा लहान होतो,’ ब्रूनो स्वत:शीच म्हणाला, ‘मला काहीतरी शोधायला फार आवडायचं आणि बर्लिनला असताना, तिथली मला सगळी माहिती होती. तेव्हा डोळे बांधूनही मला हवी असलेली वस्तू मी बरोबर शोधायचो. असं शोधकार्य मी इथं कधीही केलेलं नाही. आता ते सुरू करण्याची वेळ बहुधा आलेली आहे.’ आणि मग, त्याचा विचार बदलायच्या आत, ब्रूनोनं पलंगावरून उडी मारली आणि कपाटात उचकापाचक करून एखादा संशोधक घालत असावा असे कपडे, एक ओव्हरकोट आणि जुनेपुराणे बूट बाहेर काढले आणि घराबाहेर पडायला सज्ज झाला.

घराच्या आत संशोधन करण्यात काहीही अर्थ नव्हता. कारण शेवटी हे काही बर्लिनचं घर नव्हतं. तिथे त्याच्या आठवणीप्रमाणे हजारो सांदीकोपरे होते आणि रहस्यमय छोट्या खोल्या, शिवाय पाच मजले आणि अगदी वरती असलेली छोटी खोली जिला एक अशी खिडकी होती जिच्यातून बाहेर पाहण्यासाठी त्याला चवड्यांवर उभं राहावं लागत असे. नाही, हे घर संशोधनासाठी अगदीच बेकार होतं. जर काही शोधायला हवं असेल तर ते घराबाहेरच जाऊन शोधायला पाहिजे होतं.

ब्रुनोला खेळायला सवंगडी हवे असतात. एकदा आईची व बहिणीची नजर चुकवून तो घराबाहेर पडतो आणि छळछावणीच्या काटेरी कुंपणापर्यंत जाऊन पोहोचतो. तिथं त्याला बंदीवासातला श्म्यूल हा त्याच्याच वयाचा छोकरा भेटतो. एकमेकांचं वास्तव समजून घेण्याची बौद्धिक कुवत दोघांमध्येही नसते. तरीही ते मित्र बनतात. ब्रुनो आपल्या या काटेरी कुंपणापलीकडच्या नव्या मित्राला भेटायला सतत येत राहतो, त्याच्यासाठी वेळोवेळी खायचे पदार्थ घेऊन येतो. ते समोरासमोर बसून गप्पा मारतात. काही बैठे खेळ खेळतात. साहसी कथांची आवड असलेल्या संशोधक वृत्तीचा ब्रुनो आपली ही मैत्री घरच्यांपासून लपवून ठेवतो.

या कथेचा शेवट आपल्याला सुन्न करून सोडतो. ही रहस्यकथा नाही, तरीही तिचा शेवट धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. हा शेवटच या कथेचं बलस्थान आहे. तो सांगणं टाळता येणार नाही. छळछावणीत असलेले श्म्यूलचे वडील बेपत्ता झालेले असतात. त्यांना कुठं शोधायचं असा प्रश्‍न त्याला पडलेला असतो. ब्रुनो त्याला मदत करायची ठरवतो.

दुसऱ्या दिवशी तो छावणीत शिरण्याच्या तयारीनंच येतो. आपले कपडे तारेच्या कुंपणाजवळ काढून श्म्यूलनं आणलेले पट्ट्यापट्ट्याचे कपडे घालतो. आता तो श्म्यूलसारखाच दिसू लागतो. तारेखाली खड्डा काढून तो छावणीत प्रवेश करतो. ते छावणीच्या आतील भागात जातात. तिथे जर्मन सैनिक काही ज्यू कैद्यांना एकत्र करत असतात. या दोघांनाही या घोळक्यात सामावून घेतलं जातं. इकडं ब्रुनोचे आई-वडील त्याचा शोध घेत असतात. ब्रुनो मात्र मित्राच्या हाताता हात घालून त्याच्या वडिलांच्या अखत्यारित असलेल्या छळछावणीच्या गॅस चेंबरमध्ये भाबडेपणानं प्रवेश करीत असतो. शेवटी या चेंबरची दारं बंद होतात...

ही कसली शोकांतिका म्हणायची? या दुःखाची प्रत काय असू शकेल? ही कर्मफल सिद्धांताची परिणती आहे का? तसं असेल तर त्याची शिक्षा छोट्या भाबड्या जिवानं का भोगायची; हिटलरसारख्याची साथ देणाऱ्या त्याच्या वडिलांनी का नाही? लोकहो, विचार करा... धर्म, वंशाचा आधार घेऊन केली जाणारी हिंसा, पसरवला जाणारा विद्वेष मानवाचा कडेलोट करतो हे जगाचा इतिहास आपल्याला कनीकपाळी ओरडून सांगतो आहे. आपल्या सर्वांना तो समजेल, उमजेल तो सुदिन!

(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com