
नवी दिल्ली ः पूर्वीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नदीजोड प्रकल्पाचा (River Linkage Project) पर्यावरणाप्रमाणेच मॉन्सूनच्या चक्रावरदेखील (Monsoon Cycle) विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. या प्रकल्पामुळे जैवविविधता (Biodiversity) तर धोक्यात येईलच पण त्याचबरोबर नवे आर्थिक- सामाजिक प्रश्न निर्माण होतील, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
बुंदेलखंडमधील अवर्षण आणि दुष्काळ दूर करण्यासाठी केंद्राने केन-बेतवा प्रकल्पाला गती दिली असून या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्र वाढविण्याचाही सरकारचा विचार आहे. राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाच्या अंतर्गत राबविण्यात येणारा पहिला प्रकल्प ‘केन- बेतवा’ असेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील अवर्षणग्रस्त बुंदेलखंडमधील तब्बल अकरा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या भागामध्ये पुरामुळे अधिक पाणी येते ते पाणी अवर्षण आणि दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्यात येईल. या नदीजोड प्रकल्पामुळे निसर्गाची साखळीच तुटू शकते त्यामुळे मॉन्सूनचे चक्र ठप्प होणार असून जैवविविधता धोक्यात तर येईलच पण त्याचबरोबर नवे सामाजिक आणि आर्थिक प्रश्नदेखील निर्माण होतील, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
‘यमुना जिये’ या अभियानाचे समन्वयक मनोज मिश्रा म्हणाले की, ‘यमुना नदीच्या संरक्षण आणि संवर्धानासाठी एकत्रित प्रयत्न करावे लागतील, पूरप्रवण भागाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्पाचे दुष्परिणाम हे फार उशिरा जाणवायला सुरुवात होतात त्याबाबत आताच अंदाज बांधता येत नाही.
केन- बेतवाचेच उदाहरण घेता येईल, या दोन्ही नद्यांची उगमस्थाने वेगवेगळी आहेत. केन नदीमध्ये फार वेगळ्या प्रजातीचे औषधी मासे सापडतात पण ते बेतवामध्ये सापडत नाहीत. आता जर केन नदीचे पाणी बेतवाकडे वळविले तर जैवविविधतेचेही स्थलांतर होईल, या सगळ्या बदलांचा स्थानिक माशांच्या प्रजातीवर नेमका कसा परिणाम होईल, हे आपण आताच सांगू शकत नाही. याचा पर्जन्यमानावर देखील विपरीत परिणाम होईल. जेव्हा नद्यांचे पाणी वळविले जाते आणि ते समुद्रामध्ये मिसळते, तेव्हा त्याच्यासोबत गाळही जातो. या प्रकल्पाची निर्मिती करताना आपण फक्त मॉन्सूनची साखळी गृहीत धरली आहे पण त्याच्यावर काय परिणाम होतील हे मात्र आपल्याला ठावूक नाही.’’
शुद्ध पाण्याचा प्रवाह रोखला जाणार
समुद्रातील उष्णता आणि खारे पाणी (क्षार ) हे मॉन्सूनचे दोन महत्त्वाचे चालक असून नद्याजोड प्रकल्पांमुळे या दोन्ही घटकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्रात मिसळणारा ताज्या शुद्ध पाण्याचा प्रवाह आपण रोखत आहोत, त्यामुळे क्षारांचे प्रमाणही कमी होईल. या सगळ्याचा गंगेच्या पठरावर देखील विपरीत परिणाम होणार आहे, जे घटक मॉन्सूनच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत त्यांनाच आपण धक्का पोचवत आहोत, असे ‘साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल’चे समन्वयक हिमांशू ठक्कर यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे सुमारे २३ लाख मोठी झाडे तोडण्यात येणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.