
Nashik Onion Rate News : कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्या, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी त्वरित मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
अल्पदराने विक्री केलेल्या कांद्यास शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दीड हजार रुपये अनुदान (Onion Subsidy) द्या, या मागण्यांसाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड येथे मंगळवारी (ता. १४) कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माजी आमदार शिरीष कोतवाल (Former MLA Shirish Kotwal) यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको (Rasta Roka) केला.
मागण्यांचा विचार न केल्यास ‘जेलभरो आंदोलन’ करण्याचा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला. शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी केली.
यंदा कांद्याचे उत्पादन चांगले आले असून चांगला भाव मिळेल, अशी अशा असताना बाजारात कांद्याच्या दरात सतत घसरण सुरू आहे. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेदेखील अवघड झाले आहे. सतत घसरत असलेल्या भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चांदवड येथे महामार्गावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध दर्शवित कांदा माळा गळ्यात घातल्या होत्या. रास्ता रोकोसह शेतकऱ्यांनी चांदवड बाजार समितीचा लिलावदेखील काही वेळासाठी बंद पाडला. या वेळी प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
नाशिक जिल्ह्यात व चांदवड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली होती; मात्र परतीच्या पावसाने व चक्रीवादळाने कांदा, कांदा रोप, द्राक्ष, सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान केले.
परिणामी कांदा लागवड खराब झाल्याने शेतकऱ्यांनी महाग रोपे खरेदी करून दुबार लागवड करीत कांदा पिकाचे उत्पादन घेतले आहे. कांद्याच्या सतत घसरत असलेल्या दरामुळे संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले.
तसेच कांदा, द्राक्ष निर्यातीसंदर्भात कोणत्याही अटी व शर्ती न टाकता निर्यातीस प्रोत्साहन अनुदान द्यावे, आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्यास प्रति क्विंटल दीड हजार रुपयांप्रमाणे अनुदान द्यावे, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीपोटी मदत मिळावी यासह इतर मागण्या मांडल्या.
या वेळी काँग्रेस चांदवड तालुकाध्यक्ष संजय जाधव, समाधान जामदार, दिपांशू जाधव, पंकज दखणे, शिवाजी कासव, कैलास कोतवाल, विजय कुंभार्डे, शिवाजी बर्डे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
दर घसरण्याची शक्यता
सद्यःस्थितीत समितीच्या बाजार आवारात कांदा शेतीमालाची चांगल्या प्रमाणात आवक येण्यास सुरुवात झाली आहे; मात्र वाढत्या आवकेनुसार कांद्याच्या दरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सध्या लाल कांद्यास २ ते १० रुपये प्रति किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे.
भविष्यात वाढत्या आवकेचा विचार करता हे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण होऊन शिल्लक राहिलेला कांदा निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठेत रवाना झाल्यास कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहण्यास मदत होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.