
समीर गायकवाड
नारायण कुलकर्ण्यांच्या किती पिढ्या इथं होत्या हे सांगणारे जुने वड-पिंपळ खूप कमी होते. नारायण, वामन आणि विष्णू हे तिघं सख्खे भाऊ, त्यातले नारायण थोरले बंधू. ते अख्ख्या गावाचे काका होते. गावच्या विठ्ठल मंदिराची पूजाअर्चा त्यांच्याकडेच असे.
आडाला पाण्याची ददात नव्हती तेव्हा आडावर सर्वांत आधी पाणी शेंदायला गेलेला माणूस नारायण काका असे. गांधी टोपी, पांढरी शुभ्र छाटी आणि तांबडं धोतर अशा वेशात ते आडावर दाखल होत. घागर पाण्यात पडून तिचा बुड्डूक असा आवाज आला, की त्यांच्या मुखातून हरिपाठ सुरू झालेला असे.
‘पुण्याची गणना कोण करी’ म्हणेपर्यंत पाण्याने भरलेली घागर वर आलेली असे. दोन घागरी पाण्यावर त्यांचं भागे. खांद्यावर घागर घेऊन घराकडे निघालेले नारायण काका दारासमोरून गेले तरी घरोघरी गलका होई.
‘नारायण काकाचं पाणी भरून झालं, आता तरी उठा की’चा नाद घुमे. नारायण काकाचा पाण्याच्या हिशेब सोपा होता- एक घागर देवासाठी आणि एक घागर घरासाठी.
मध्यम उंची, काहीसा स्थूल देह. उभट चेहऱ्याला शोभून दिसणाऱ्या धनुष्याकृती भुवया, पाणीदार पिंगट डोळे, भव्य कपाळावरचा देखणा गोपीचंदन अष्टगंध, टोकदार नाक, कानाच्या लांबोळक्या पाळ्या. तेजस्वी कांती लाभलेला गौरवर्ण.
चेहऱ्यावर असणारे सात्त्विक प्रसन्नतेचे भाव. यामुळे पाहताक्षणीच माणूस त्यांच्याकडे खेचला जाई. मृदू आवाजातलं मखमली बोलणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वास शालीनतेचा मुकुट चढवी. काकांचा स्वभाव मनमिळाऊ, बोलका, सालस आणि पापभिरू असा होता.
त्यांना साथ लाभली होती वैजयंती काकूंची. गाव त्यांना वैजंता म्हणे. तर कुणी नानीबाय म्हणे. नवऱ्याला झाकावं यांना काढावं इतकं त्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात साम्य होतं. गावातल्या बायका त्यांच्या शब्दाबाहेर नव्हत्या. तसंच काकांचंही होतं.
गावातल्या सगळ्या लग्नात आंतरपाट हाती धरून मंगलाष्टके म्हणण्यापासून ते बारशाच्या दिवशी पोराचं नाव सांगण्यापर्यंत हरकामात काकाच लागत.
एखाद्याच्या घरी महाळ असला, की तिथं जाऊन भाकरीचे तुकडे मोडणारे पायलील पासरीभर मिळतात; पण नारायण काकाला महाळाला बोलावलेलं असलं, की त्या घरातलं वातावरण बदलून जाई.
गेलेल्या माणसाच्या अशा काही आठवणी ते सांगत की घरातली माणसं हमसून रडत. त्या घरात काही भांडणतंटा लागलेला असला की तो आपसूक निकालात निघे.
एकदा मध्यरात्रीनंतर गावाबाहेर असलेल्या शंकर येसकराच्या घराकडून येणाऱ्या नारायण काकांना गावातल्या काही लोकांनी पाहिलं आणि त्याचा बभ्रा झाला. आठवडाभर गावात त्यावर खल झाला. शंकर येसकर मरायला टेकला होता, काही केल्या त्याचा जीव जाता जात नव्हता.
त्याची ती स्थिती बघून काकाचं मन द्रवलं. बोभाटा होऊ नये म्हणून मध्यरात्रीस ते शंकरच्या घरी गेले, पण पहाटेस पाण्याची पाळी द्यायला गेलेल्या काहींनी त्यांना बरोबर ओळखलं.
ज्या येसकराला आपण आपल्या घरातलं सगळं शिल्लक, उष्टं अन्न देतो त्याला हवं असलेलं मरण दिलं तर कुठं चुकलं, असा रोकडा सवाल नारायण काकांनी केला. गावाला त्यांचं म्हणणं पटलं; पण काहींना ते अखेरपर्यंत रुचलं नाही. त्यात भर पडली काकांच्या भावकीच्या वागण्याची.
नारायण काकांकडे पिढीजात वारशाने गावाची देवदेवरस्की आल्यानंतर त्यांच्या दोन भावांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शहराकडे कूच केलं. तिथं त्यांनी पौरोहित्य करून नावलौकिक वाढवला. वामन आणि विष्णू गावाकडे कधी तर येत तेव्हा त्यांच्या समाधानासाठी काका, काकू सोवळं पाळत.
कुलाचार, विधिव्रत कर्मकांडे, मंत्रपठण, होमहवन भरभरून होत. ते गेले की काका, काकू पुन्हा सामान्य वागत. कुणाच्या घरी काही धार्मिक विधी असले, तर नारायण काकांनी एखाद्या वस्तूपायी अडवणूक केली नाही. अमुक एक दक्षिणा मिळावी म्हणून हट्ट केला नाही.
गावाच्या बोकांडी त्यांनी कर्मकांडेही मारली नाहीत. वारीच्या काळात मात्र त्यांना उसंत नसे. काकड आरतीपासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत त्यांचा पिट्टा पडून जाई; पण त्यात त्यांना अलौकिक समाधान असे.
कुणाच्या घरी माणूस गेलं की गरुड पुराण जरूर वाचत. पण पुन्हा म्हणत, ‘चांगली कर्मे हेच संचित आहे रे बाबांनो, जन्मदात्यांची सेवा हेच ईश्वरी कार्य आहे. माझा पांडुरंग फक्त मार्ग दाखवतो, कृपा करतो. पण त्याच्या पर्यंत जाण्यासाठी तुमचं आचरण शुद्धच हवं.
बाकी पुराणातली वांगी पुराणात. लोकांच्या समाधानासाठी हे वाचलंच पाहिजे. पण जोडीने सत्यही सांगितलं पाहिजे.’ ते असलं काही बोलू लागले, की त्यांच्या वाणीला धार येई.
काळ बदलत गेला तसं गावानं कूस बदलली. हमरस्त्यात अनेकांच्या जमिनी गेल्या. भरपूर पैसा आला. त्यातून खुन्नस वाढली. काहींनी दोन-तीन इमल्यांची घरं बांधली. तर सोपान जाधवांच्या पोरांनी भलंमोठं विठ्ठल मंदिर बांधलं. काही जुन्याजाणत्यांनी त्यांना अडवून पाहिलं;
पण पैशापुढं शहाणपण चाललं नाही. नव्या मंदिरासाठी बाहेरून पुजारी आले. त्यांची तिथंच राहण्याची सोय लावून दिली गेली. त्यांनी बारमाही सोवळंओवळं सुरू केलं. कर्मकांडांचे देखावे सुरू केले. नियम, रिवाज आणले. लोकांना त्याचं अप्रूप वाटलं, लोक भुलले.
हळूहळू जुनं मंदिर ओस पडत गेलं. देखभालीअभावी ते जणू विजनवासात गेलं. नारायण काका आणि वैजंताकाकूचं वयही दरम्यान वाढत गेलेलं. दोघं थकून गेले. पण त्यांनी आपल्या स्वभावधर्मात बदल केला नाही. काका काकूंची मुलं शिकून मोठी झाली.
चांगल्या नोकऱ्या मिळवून ती पुण्यात स्थायिक झाली. वर्ष-दोन वर्षाला त्यांचं गावात येणं होई. तेव्हा ते आपल्या श्रमलेल्या आईवडिलांना गाव सोडून आपल्याबरोबर चलण्यास विनवत. पण काका, काकू नकार देत. याच गावात इथंच आपण जन्मलो, वाढलो, सुखदुःखात ऊन-पाऊस झेलत जगलो. तेव्हा इथल्या मातीतच शेवट व्हायला हवा असं ते म्हणत. खिन्न मनाने मुलं त्यांचा निरोप घेत.
काही वर्षांनी काकांचे भाऊबंद गावात यायचे बंद झाले. मुलं आपापल्या संसारात रुतली. काकांचे नातू शिक्षणासाठी विदेशात गेले, तेव्हा मुलांचं येणं रोडावत गेलं. मुलांच्या मनिऑर्डरमध्ये खंड पडला नाही. मात्र काका, काकूंच्या दारी येणाऱ्या गरजू व्यक्तीसाठी ती खर्ची पडे.
काका पुरते थकले, तेव्हा नानू राऊत त्यांना पाणी आणून द्यायचा. आपल्या थरथरत्या हातांनी काकू काहीबाही रांधायच्या. दिवस त्यावर जायचा. सांज कलताच कंबरेत वाकलेल्या रुपेरी बायका आणि काही वठलेली सागवानी झाडं त्यांच्या अंगणात येऊन बसत. जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा तिथं झडत.
तुळशीपुढे तेवत असलेल्या मंद दिव्याचा प्रकाश त्यांच्या म्लान कांतीवर झळके. पिकल्या पानांची मैफल संपली की तिथं एक उदासीनता येई. बाजलं टाकून त्यावर काका पडून राहत. झाडांच्या पानांमागून चांदणं त्यांच्या पडक्या घरात शिरे, कोनाड्यात बसून अश्रू ढाळताना त्याला गहिवरुन येई.
तेव्हा वैजंताकाकूंचा सायमाखला हात काकांच्या डोक्यावरून फिरे. एक शब्द न बोलता दोघांचे डोळे डबडबून येत. पैलतीरावर तोरण बांधायला कोण आधी जाणार याची जणू ती मूकचर्चा असे! ते दोघं असे कासावीस झाले, की देवळाच्या चिरे ढासळलेल्या भिंतीआडून कंबरेवर हात ठेवून असलेले विठुरुख्माई त्यांच्याकडे पाहून भावविभोर होत.
काकांच्या पडझड झालेल्या घराचं अंगण शहारून जाई. बाक आलेला चाफा अधिकच आत्ममग्न वाटू लागे. मग ते दोघं एकमेकांच्या हातात हात गुंफून शांत पडून राहत...
पैलतीरावर आधी जाण्याची शर्यत काकूंनी जिंकली. गावाला वाटलं आता नारायण काका गाव सोडून पोरांकडे पुण्याला जाणार; पण काका गेले नाहीत. काकू गेल्यानंतर ते एकटे राहत. शून्यात नजर लावून तासन् तास एकटे बसत.
नव्या देवळातून स्पीकरवरून येणाऱ्या आरतीचा आवाज येताच नकळत टाळ्या वाजवत. पण त्याच वेळी डोळ्यांतून धारा वाहत. कुलकर्णी म्हणजे बामन, मग हे इथं कुठून इथं आले; गावाशी यांचा काय संबंध, ते आपल्या गावचे नाहीतच... अशा नव्या पिढीच्या चर्चा काकांच्या एकट्यानं गावात राहिल्यामुळं थंड पडत गेल्या.
काकांना मात्र याचं शल्य वाटे. ते म्हणत, ‘मी याच मातीतला आहे, हे माझा पांडुरंगच सिद्ध करेल, मला त्याची चिंता नाही.’ आणि झालंही तसंच. काका गेले तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांचा परिवार विदेशात आपल्या मुलांपाशी गेला होता. त्यांच्या भावंडांनी गावात येण्यास नकार दिला.
वारकरी भजनी मंडळ लावून त्यांची अंत्ययात्रा निघाली. ओढ्याजवळच्या मसणवाटीत त्यांची चिता रचली. ज्या नानू राऊताने त्यांची अखेरपर्यंत सेवा केली, त्यानेच त्यांना अग्नी दिला. गावातल्या मानकऱ्याने अग्नी दिला.
सगळं गावच जणू त्यांचं कुटुंब झालं होतं. नारायण काकांची गावाच्या मातीशी असणारी नाळ एकदम पक्की होती. ती कुणालाच तोडता आली नाही. अगदी काळाला देखील नाही!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.