Santosh Dukre story: पैज भांडणाची कोणी जिंकली?

"नाय बॉ... सहा म्हैन्याआधी झालं तेवडच !" धर्माशेठनं मफलरीनं तोंड पुसत बांधभावाची अपडेट कुंडली सांगितली.
Rural Story
Rural StoryAgrowon

santosh Dukre Story पाडव्याचा दिवस. भल्या सकाळची वेळ. लिंबाच्या पारावर मारुतीकडं पाठ करुन चार टाळकी चुना तंबाखू चघळत बसलेली. एक इडा झाला, दुसरा इडा झाला, तिसरा झाला, बटवं मोकळं झालं आणि शेवटी एकानं पिचकारी टाकली... "काय रं धम्या, तुमच्या मळ्यातल्या सख्या न् तुक्याचं भांडाण झालं का नाय परत ?"

"नाय बॉ... सहा म्हैन्याआधी झालं तेवडच !" धर्माशेठनं मफलरीनं तोंड पुसत बांधभावाची अपडेट कुंडली सांगितली.

"हात्तीच्याआयला. आरं काय मजा आलती तव्हा. हे कचाकचा भांडत व्हती. आणि बायांना त् सुमारच नव्हता राव. पार झिंज्याच उपटायच्या बाकी राह्यल्या. बरंच दिवस झालं, तसं काय भांडाण झालं नाय राव गावात. द्यायची का लावून ?"

"पण कशी ? ते काय यावढं सॉप्प हे काय..." धर्मानं आपलं अज्ञान जाहीर केलं.

"बोल, लावतो का पैन्ज ? फक्त ५०० ची. रोख द्याचं."

"चल, लागली."

"ठरलं. मी जातो सख्याच्या घरी. दुपार पोहतोर तुला बोलवाया येईलच सख्याचं नाय तर तुक्याचं एखादं कारटं. मंग हायचे पंच तुम्ही." असं म्हणत एकनाथ उर्फ एकाशेठ नं पार सोडला. त्याच्या पायजम्याच्या वाऱ्यानं गायछापच्या रिकाम्या पुड्या उगा आपल्या बावचळल्यासारख्या झाल्या.

एकाची पायतानं वाजत वाजत सखारामच्या घरी पोचली. "काय रं एका, आज लय सकाळी सकाळी इकडं कुठं वाट चुकला ?" सखाराम नं टिव्हीपुढं बसल्या बसल्या एकापुढं खुर्ची ढकलली आणि पुन्हा मॅचमधी डोळं घातलं.

एकाचं बुड टेकलं आणि तोंड उघडलं, "काय नाय बा... आलो व्हतो आसाच. तुझी मदत पायजे व्हती. गव्हाची वावरं नांगरुन पडल्यात लॉकांची. फळी फिरवाया टॅक्टर बोल्हीत्यात पण फळीच नाय राव." एकानं आपलं गाऱ्हाणं गायलं.

Rural Story
Santosh Dukre story: शेवग्याच्या शेंगा आणि फाट्यावरचा गुरूजी

"आरं पण माह्याकं तरी कुठंय ?"

"तुह्याकं फळी नाय. पण विहीरीजवळच्या बांधावं तुही बाभळ हे ना. तिला लय मापाचं ख्वाड हे. एकदम माऱ्यावं फळी व्हईल. दोन च्या जागी चार हजार घे, पण तॅवढं ख्वाड काढून मला दे. नाही म्हणू नको." ओव्हर संपली. टाळीवं टाळी झाली. १०० रुपये इसार देवून एकाशेठ खुशीत पाराच्या दिशेनं निघाला.

Rural Story
Santosh Dukre story: एक उत्तप्पा पातळसा...

सखानं अंगात बंडी चढवली, सांदीकोपऱ्यातून करवत काढली. तिचं दात वाकवलं आणि बखोटीला पोरगं धरुन बांधाकडं निघाला. तुकाच्या बायकूनं सखाला करवत घेवून विहीरीच्या वावराकं जाताना पाहिलं, आणि तुक्याला पीन बसली.

सखा खोडाजवळ बसायला, करवत धरायला जागा करतोय न करतोय तोच तुका धोतराचा सोगा सावरीत बांधावर हजर. लगेच डफडं सुरु...

हा म्हणे झाड माझं, तो म्हणे झाड माझं आन् झाड तं काय बोलना. शेवटी बोलणारं पाहिजे म्हणून सख्यानं एकाशेठ न् पंच कमिटीला बोलवायला पोरगं गावात पिटाळलं.

दुपार होता होता पंच बांधावर आले. तोपर्यंत भांडणाची तिसरी फेरी संपत आली होती. सखा तुकाच्या कॉलरी आणि बायका बायकांच्यात झिंज्या धरुन झाल्या होत्या. आता पंचांच्या साक्षिने चौथी फेरी सुरु झाली. अखेर पाचव्या फेरीला पंचांचा निर्णय अंतिम झाला.

झाड कापायचं आणि दोघांनी निम्मं निम्मं वाटून घ्यायचं. पंचांसमोर झाड पालथं झालं. खोडाच्या खांडोळ्या काट्यांचं फास झालं. हाती फक्त सरपान आलं. जाता जाता धर्मानं एकाच्या हातात ५०० रू सरकवले. एका अक्कलदाढेत हसत होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com