Rural Story : शिवारातले ऋतुचांदणे रक्तात हळुवार उतरत जाण्याइतके दुसरे सुख नाही

एखाद्या पट्टीत उसाचे नवीन लागण होऊन फुटवा चालू होतो, तर दुसऱ्या पट्टीत पूर्ण भरलेला ऊस तोडायच्या प्रतीक्षेत असतो, हे जिते निसर्ग चक्र खूपच बोलके आणि मनोज्ञ असते.
Rural Story
Rural StoryAgrowon

जयंत खाडे

दुर्गा भागवत यांचे ‘ऋतुचक्र’ गेल्या दोन वर्षांपासून मी नेहमी वाचतो. बदलत्या ऋतूंचे वेगळेपण डोळ्यात, मनात भरण्याइतकी संवेदनशीलता व बौद्धिक कुवत माझ्याकडे नाही. कदाचित हे सर्वांग सुंदर पुस्तक मिळाल्यानंतरच हा पुरते ५० वर्षे अनुभवलेला निसर्ग आअविष्कार ‘असा आहे तर’ या ऋजुभावनेने समजायला लागला.

आपल्या ऋतूंपैकी शरद व हेमंत ऋतू मला खूप भावतात. पाऊस संपल्यानंतर या दिवसांत सर्वत्र हिरवाई पसरते आणि वातावरणात आल्हाददायक गारवा पसरायला सुरुवात होते. विशेष म्हणजे दिवाळी, नाताळसारखे मोठ्या सुट्टीचे व अपूर्वाईचे सण या ऋतूत येतात.

या ऋतूत एक अनामिक आतुरता व कारुण्य मला जाणवते. उशिरा येणारा सूर्य बराच काळ ‘सकाळ’ ठेवतो आणि पटकन ‘दुपार’ करून रेंगाळणारी ‘संध्याकाळ’ येते. कदाचित या ऋतूमधील लांबलेली सकाळ खूप आश्‍वासक, आतुर भासते तर लवकर पसरणारी संध्याकाळ हुरहुर लावणारे कारुण्य आणते.

एक नवा आशा-निराशेचा खेळ माझ्यासाठी सुरू होतो. दिवाळीच्या सुट्टीत घालविलेले गावाकडचे दिवस मला खूप आठवतात. आता आम्ही संतोषगिरीच्या पायथ्याला लहानशी वस्ती केली आहे. खरं तर या संतोषगिरीच्या पायथ्याला वडिलोपार्जित शेतजमिनीचा तळ मिळणे खरंच माझं परमभाग्य!

दिवाळीनंतर मी सलग पणे आठवड्याची सुट्टी वस्तीवर घालवितो. विशेषतः या ऋतूत गावाकडच्या शिवारातील दिवस मला खूप आकर्षित करतात. तात्या माडगूळकर म्हणतात तसे ‘‘आपल्या जीवनाला फुरसतीचा एक लांबलचक भरजरी पदर असावा, असं मनापासून वाटत असतं.

तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एक विलक्षण यांत्रिकी गतीने झपाटून टाकले आहे. कधी अंगावर चांदणं पडत नाही, कधी झाडांच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही, कधी ओढ्यात अंघोळ होत नाही, कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही.

मी कुणी मृग -पक्षी -शास्त्रवेत्ता नव्हे किंवा वनशास्त्राचा अभ्यासकही नव्हे. परंतु रानावनांतील अद्‍भुत जगाविषयी माझ्या छंदिष्ट मनात अनिवार आणी न संपणारं कुतूहल आहे...’’ तात्यांच्या लेखनाचा प्रभाव म्हणा किंवा एक अनोखी उर्मी सुट्टीच्या दिवशी मला गावाच्या शिवाराकडे अक्षरशः ओढून नेते.

Rural Story
Amravati Rural News : ग्रामसेवक सुनावणीला गैरहजर राहिल्याने वेतन कपातीची कारवाई

आश्‍विन व कार्तिकात आमच्या गावची शिवारं हिरवाईनं भरलेली असतात. नव्या जुन्याचा मस्त संगम शिवारात असतो. एखाद्या पट्टीत उसाचे नवीन लागण होऊन फुटवा चालू होतो, तर दुसऱ्या पट्टीत पूर्ण भरलेला ऊस तोडायच्या प्रतीक्षेत असतो, हे जिते निसर्गचक्र खूपच बोलके आणि मनोज्ञ असते.

नव्या लागणीतील आंतरपिके निघालेली असतात व स्वच्छ झालेल्या सऱ्या फोडून खतांच्या मात्रेसह उसाला भर लावली जाते. काही पट्ट्यात हळदीसारखे पीक दिसते, रानात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात,

मग वीज उपलब्ध झाल्यास रानातले पाणी कमी करण्यासाठी विहिरीतले पाणी हापसून रस्त्यालगतच्या नाल्यात सोडले जाते. हळूहळू कारखान्याचे धुराडे पेटतात आणि सगळ्या शिवारात चैतन्य भरते. मला तर हे दिवस जुन्या काळातील युद्धासारखे वाटतात‌.

प्रत्येक गावात पाचशे ते हजार ऊसतोडीचे नवे पाहुणे गोळा होतात. मोकळ्या जागी, डोंगराकडेला या ऊसतोडीच्या लोकांची पालं पडतात. एक, दोन दिवसांत जळण, पाणी, निवाऱ्याची बऱ्यापैकी सोय लावली जाते आणि पहाटे चारपासून हातात कोयता घेतलेली मंडळी युद्धसैनिकासारखे रस्त्यावर, शिवारात दिसायला लागतात.

एकेक फड हातावेगळा केला जातो. तुडुंब भरलेले ट्रॅक्टर प्रचंड साहसाने आणि प्रयासाने बाहेर निघतात. ट्रॅक्टर खचला की एक, दोन, तीन तर कधी पाच, पाच आधुनिक यांत्रिक ‘पार्थसारथी’ गोळा होतात आणि जमिनीपासून दोन ते तीन फूट पुढची चाके वर घेऊन धाडसी कसरती करत ट्रॉली रस्त्यावर येते.

पुन्हा अपुरा रस्ता, तीव्र वळण, कधी उतार उतरीत तर कधी चढ चढीत ऊस कारखान्याकडे मार्गस्थ होतो. एखादा नवखा किंवा परदेशी पाहुणा या दिवसांत गावात आला तर या कोयते घेतलेल्या सैनिकांना पाहून घाबरून पळत सुटेल.

बहुतांशी सातपुडा, विदर्भातले आदिवासी तसेच सोलापूर पट्ट्यातील पारंपरिक ऊसतोड कामगार गावात येतात. यांच्याबाबतीत खूप प्रवाद आहेत. जसे की हे लोक उचल घेतात व कामास येत नाहीत, शेतकऱ्यांना नाडवितात, शेतातील पीकं, माळव्याचे नुकसान करतात वगैरे वगैरे.

पण आलेल्या लोकांचे अपार कष्ट पाहिले, की त्यांच्याबद्दल करुणा निर्माण होते. हे लोक पहाटे लवकर उठून फडात कामास सुरुवात करतात आणि सूर्य मावळेपर्यंत त्यांचे काम चालते. कारखान्यात रिकामा झालेला ट्रॅक्टर वेळी अवेळी कधीही परत आला तर तोडलेल्या उसाची भरणी त्यांना करावी लागते.

ऊस तोडत असताना त्यांची अगदी काही महिन्यांची चिल्लीपिल्ली झाडाखाली ठेवलेली असतात. रानात मिळणारी किडकी, तुरट रताळे, गाजरं ही लोक लहान पोरांच्या पुढे फेकतात आणि पोरं ती आनंदाने चघळतात.

रानात उस तोड करताना कधी कधी साप चावण्यासारखे प्रकार घडतात, तर कधी बिबट्यासारखी जगली श्‍वापदे त्यांच्या मुलाबाळांच्यावर हल्ला करतात. त्याचबरोबर आजारपणसुद्धा उद्‍भवते. या सगळ्याला त्यांना तोंड द्यावे लागते.

मागच्या वर्षी एसटीचा संप होता आणि मी एका वडापने सांगलीला चाललो होतो. गाडीत एक बाई तिच्या लहान बाळाला घेऊन बसली होती. सांगली जवळ आल्यानंतर ती त्या वडापवाल्याला येथून बीडकडे जायला काही वाहन मिळते का, असे विचारायला लागली.

तिची माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले, की ती ऊसतोड कामगार म्हणून या भागात आली आहे व तिचे जवळचे नातेवाईक निवर्तल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ती निघाली होती. खरं तर सगळे वाहतुकीचे मार्ग बंद असताना ती बीडपर्यंत कशाने जाईल, हा प्रश्‍न खूप अस्वस्थ करणारा होता.

मला चारुता सागर यांची ‘वाट’ ही कथा आठवली. कथेत एका पारधी महिलेची आई शेवटची घटका मोजीत असते आणि तिला भेटायला ही महिला उस्मानाबादहून निघते व कवठेमंकाळच्या सगळ्या डोंगर खोऱ्यात ती आपली पाले शोधत फिरते, असे खूपच वेदनादायी वर्णन आहे. या महिलेची ही तशीच अवस्था होती व हे पाहून मन विषण्ण झाले होते.

याच वर्षी एका टोळीमधल्या जोडप्याचे काही महिन्यांचे लहान बाळ न्यूमोनियाने आजारी पडले व उपचाराला न दाद देता ते मरण पावले. त्या बाळाला या लोकांनी जवळच एक खड्डा करून पुरले व त्या ठिकाणी अगरबत्ती गुलाल टाकून ही लोक कामावर निघून गेली.

पोलिस यंत्रणेला याची माहिती मिळाल्यानंतर चौकशी केल्यानंतर हा प्रकार समजला. हा सुद्धा प्रकार अत्यंत वेदनादायी होता.

एकंदरित अर्थकारण पाहिलं तर सहा महिने हंगाम काढल्यानंतर प्रत्येक जोडीला साठ ते पासष्ट हजार रुपये शिल्लक राहतात. आज भारत साखर उत्पादनात व निर्यातीत अग्रणी झालेला आहे; पण त्या मानाने यासाठी काम करणाऱ्या लोकांची प्राप्ती व राहणी अस्वस्थ करणारी आहे.

या वेळचा हंगाम सुरू झाला आणि आमच्या वस्तीला लागून डोंगराच्या पायथ्याला सांगोला भागातली टोळी एका दुपारी ट्रॅक्टरमध्ये सगळा लवाजमा भरून आली. संध्याकाळपर्यंत त्यांच्या राहुट्या उभ्या राहिल्या.

अवकाळी पाऊस पडला म्हणून खालची जागा अचानक सोडून डोंगराकडे हे लोक आणून टोळीवाल्यांनी ठेवले. आठ-दहा कुटुंबं, प्रत्येक कुटुंबात एक जोडी आणि त्यांची चिल्लीपिल्ली, प्रत्येकाची एखादी शेळी, करडू तर कुणाची गाय... बघता बघता एक छोटा गाव तयार झाला.

मी खरं तर या नवीन शेजाऱ्यांना पाहून हरखून गेलो. एक तर वस्तीला रात्रीच्या वेळी खूप एकाकी वाटते आणि आता तीस-पस्तीस जण आमच्या शेजारी आले. दुसऱ्या आठवड्यात मुक्कामाला गेलो, तर लोकांनी छान संसार थाटला होता.

गुंडाने सिमेंटची टाकी भरून पाण्याची आणि तात्पुरती विजेची व्यवस्था करून दिली होती. या पाहुण्यांना दिवाळीला फराळ वाटला तर सकाळी एक जण गाईचे दूध घेऊन उठवायला आला. पैसे देताना न घेता तो हसून निघून गेला.

एका मुक्कामात आनंद, आबा, बापू आणि मी टोळीच्या मुकादामासोबत गप्पा मारत बसलो. चाळिशीतला मुकादम लहान असल्यापासून गावात तोडीला येतो. पूर्वी तर तोडी संपल्यानंतर सालगडी म्हणून कामालाही तो राहिला होता.

त्याचे रेशन कार्ड, मतदार नोंदणीसुद्धा गावातीलच आहे; पण सध्या तो सांगोला तालुक्यातील त्याच्या गावी घर बांधून राहिला आहे. आता नात्यागोत्यातील आठ-दहा लोकांची टोळी करून तो मुकादम झालाय.

कार्तिकानंतर मार्गशीर्ष सुरू होतो. आमच्या खोरीच्या रानाजवळची परतीच्या पावसात भरलेली तळी हळूहळू रिकामी व्हायला लागतात. मार्गशीर्षाला दुर्गाबाई ‘प्रशांत आणि प्रक्षुद्ध’ म्हणतात आणि श्रीकृष्णाने याला ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणून गौरविल्याचे सांगतात.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्षातील शांती, भ्रांती आणि अत्यंत वास्तव व वेगवान अशी जीवनाची ओढ मी या आयुष्याच्या निम्म्या वाटेपर्यंत अनिवार्य उपभोगली आहे; पण ती पकडून ठेवता आली नाही.

अगदी गेल्या मार्गशीर्षात मी हिमालयातील अपूर्व व अद्‍भुत निसर्गाचा आकंठ आस्वाद घेतला, तो दुर्गाबाईंच्या सारखा कागदावर उतरवता आला नाही. पण याचा खेद तर अजिबात नाही.

शिवारात तालीकडेने पावट्याचे वेल बहरतात. मुद्दामहून रिकाम्या ठेवलेल्या जागेतील तुरीचे मोगणे हिरव्यागार शेंगासह लखडतात. खोडवा जाऊन रिकाम्या झालेल्या पट्टीत सारटी सोडून पेरलेल्या माढ्या गहू, हरभऱ्याचे पीक डोलायला लागते.

तालीवरच्या आंब्याला नव्या पानांचे तपकिरी कोवळे फुटवे फुटतात, तर शेंड्याला मोहर लगडायला लागतो. रस्त्यावरील करंज्यांच्या झाडाला हिरव्या करंज्या लोंबायला लागतात.

डोंगराकडच्या काटेरी बोरींवरील हिरवी बोरं भरून पिवळी, तांबडी व्हायला लागतात. आतल्या अंगाला असलेल्या करवंदांच्या जाळ्यावर बारीक बारीक हिरवी करवंदं दिसायला लागतात.

Rural Story
Rural Life : निसर्गात श्रीमंत आनंद किती स्वस्तात मिळतो ना ?

तळ्याकडच्या सीताफळाची सगळी पाने झडून बारीक पालवी फुटायला लागते. तळ्याकडेच्या गर्द झाडीत भोरड्यांची शाळा भरते, थोडी सुट्टी मिळाली, की त्या जोरजोराने भांडायला लागतात. डोंगरात सकाळी सकाळी चरायला आलेल्या गाई आणि म्हशींच्या अंगावर बगळे बसायला लागतात.

ठिकठिकाणी फुटलेल्या घाणेरीच्या बुडाखाली एखादे लिंबाचे अथवा पिंपळाचे रोपटे वाढायला लागलेले दिसते. अगदी पुण्यवान घाणेरीच्या बुडख्याखाली चंदनाचे झाड उगवलेले दिसते. या दिवसातला सूर्योदय तर अत्यंत अपूर्व असतो. आकाश सोनेरी सूर्याची तांबूस किरणे पृथ्वीवर पोहोचतात.

एके दिवशी खोरीच्या वस्तीच्या शेजारी ऊस तोडवाल्यांची पालं, जवळचा ऊस तुटला व तोडी पुढे चालू झाल्या, म्हणून उठून गेली. जाणार म्हणता म्हणता एक दिवस आठ ते दहा कुटुंबं पटकन जागा खाली करून निघून गेली.

शनिवारी वस्तीला आलो, तर वरच्या अंगाला पालं जाऊन त्यांच्या खुणा राहिलेल्या, आठ, नऊ पालांच्या जागी थोडेसे उंचावून सारवलेल्या पालाच्या जागेत मोडलेल्या चुली, रिकामा झालेल्या जनावरांचा गोठा, शिल्लक राहिलेले जळण, मारलेल्या खुटांची भोकं आणि राख, शेण, लेंड्या तालीवर पडलेल्या होत्या. तात्पुरती राहायला आलेली लोकं गेली आणि त्या रात्री मला झोप आली नाही.

मार्गशीर्षातील रात्रीच्या आवकाशाचे विशेषतः या महिन्यातील चंद्रकलेबाबतचे दुर्गाबाईंचे निरीक्षण व त्याचे वर्णन केवळ एक ‘ऋतू प्रार्थना’ आहे. या महिन्यातील एकही पहाट मी बाहेर फिरायची सोडली नाही, तर वस्तीवरच्या मुक्कामात मी या रात्रीच्या अवकाशाचा अखंड आस्वाद उपभोगला. मला संदीप खरे यांची एक कविता खूप आवडते.

स्वतःला विकुन काय घेशिल विकत?

खरी खरी सुखे राजा, मिळती फुकट!

हपापुन बाजारात मागशिल किती?

स्वतःतच नवे काही शोधायला हवे!! ....

कधीतरी वेड्यागत वागायला हवे!

खरंच आयुष्याची पन्नास वर्षे संपल्यानंतर का होईना दुर्गाबाईंचे हे ‘ऋतुचांदणे’ माझ्या रक्तात हळुवार उतरत जात आहे, याच्या इतकं मोठं सुख नाही.

लेखक - जलसंपदा विभागात कार्यकारी अभियंता आहेत. ९४२१२९९७७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com