Rural Wedding : आवाज वाढीव डीजे....अर्थात गावाकडची लग्नं

परवा एका लग्नाला गेलो. बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवऱ्या मुलीला प्रचंड उकडत होतं. अंगावरचे ते गरमी वाढवणारे भारंभार कपडे, स्टेजवर झालेली मोठी गर्दी, असह्य उकाडा यामुळे मुलीला चक्करच आली. लग्न लागेपर्यंत नवरा आणि नवरीला उपवास करायला सांगितले जाते त्यामुळे सकाळपासून तिचं जेवण झालेलं नसणार.
Rural Wedding
Rural WeddingAgrowon

वैशाखातलं रणरणतं ऊन चांगलंच तापलं आहे. सूर्य आग ओकतोय. नवरदेवाचे दहा-वीस मित्र बेभान होऊन नाचताहेत. त्यांचं सर्वांग ओलं झालं आहे. त्या डिजेवाल्याला तर त्यांनी तुफान वैताग आणलाय. अगदी नाइलाजाने तो तेच गाणं पुन्हा पुन्हा वाजवतोय. कमाल आवाजात. डेसीबलच्या भाषेत म्हणाल तर १२० च्या आसपास! तर काही तरुण कार्यवाहक नवरदेवाच्या या झिंगाट मित्रांना मुहूर्त कधीच टळून गेल्याची आणि आतले लोक वैतागले आहेत, याची आठवण करून देत आहेत.

Rural Wedding
Rural Photo : गावाकडची फोटोग्राफी

'आता डान्स बस्स करा, लग्न लावून घेऊ.' अशी विनंती करताहेत. ती धुडकावून हे गुंगलेले मित्र डोलतच आहेत. अखेर नाइलाजाने कार्यवाहकांनी डीजेच्या गाडीमागे असलेल्या कारमधून नवरदेवाला उतरवलं. खांद्यावर उचलून घेतलं. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी आणलं. नवरा-नवरी बोहल्यावर आले. इकडे मंगलाष्टकं सुरु झाली आहेत आणि तिकडे मंगलकार्यालयाच्या गेटवर डीजेवर वाजतेय- `बाई वाड्यावर या..!'

Rural Wedding
Rural Story : गोधडीला अडगळीत टाकू नकुस

परवा एका लग्नाला गेलो. बोहल्यावर उभ्या राहिलेल्या नवऱ्या मुलीला प्रचंड उकडत होतं. अंगावरचे ते गरमी वाढवणारे भारंभार कपडे, स्टेजवर झालेली मोठी गर्दी, असह्य उकाडा यामुळे मुलीला चक्करच आली. लग्न लागेपर्यंत नवरा आणि नवरीला उपवास करायला सांगितले जाते त्यामुळे सकाळपासून तिचं जेवण झालेलं नसणार. डिहायड्रेशन झालं असेल. तिला बसायला खुर्ची दिली. तिला प्यायला पाणी दिलं. स्टेजवरची गर्दी कमी करून, घाईघाईने तिथं एक पंखा लावला!

Rural Wedding
Rural Story : आपणच आपल्याला कसं फसवणार ?  

अजूनही तिकडं बाजूला 'मान्यवरां'चे स्वागत, सत्कार, हारतुरे आणि ते आशीर्वाद असं सुरूच आहे. त्यांचं इकडं मुलीकडं लक्षच नाहीये. तेवढ्यात यजमान मुलीच्या वडलांचं माईकवर मनोगत सुरू झालं. त्यांचंही मुलीकडं लक्ष नाहीच. पण या वधुपित्याच्या भावना उचंबळून आलेल्या. भावनावेगात लांबलेल्या त्या हृदय मनोगताने मुलीचा मामाच आता जाम भडकला. मामाने ते मनोगत मध्येच थांबवलं तेव्हा कुठं मंगलाष्टकं सुरु झाली! मामाने सूर, ताल, लयीवाल्या गायक मंडळींऐवजी स्टेजवरच्या मंगलाष्टके म्हणता येणाऱ्यांनी ती लवकरात लवकर म्हणायच्या आणि लग्नविधी वगैरे उरकून घ्यायच्या सूचना दिल्या. म्हणून कसंबसं निभावलं! बिचारे नवरा नवरी. बोहल्यावर चढलेली ती नवरी अत्यंत कठोर परीक्षा कशीबशी पास झाली. पण समजा दुर्दैवाने जर ती खाली कोसळली असती तर?

Rural Wedding
Vikas Godage Story : म्हातारीच्या जगण्याची गोष्ट

तिसरा एक प्रसंग तर या सगळ्यावर कडी करणारा.

दुपार टळून चाललीये. हवा खेळती नसल्यानं आणि मोठ्या गर्दीमुळे उकाडा विचारु नका. त्यात लग्न समारंभ लांबलेला. त्याचं कारण मोठं विचित्र होतं. कुठल्याशा मेळाव्यात की बैठकीत व्यस्त असलेल्या 'माननीय साहेबां'ना यायला उशीर होणार होता म्हणून भर दुपारी निघालेली नवरदेवाची वरात मुद्दाम लांबवली होती. लग्नाआधी जेवणाच्या पंक्ती उठवलेल्या नसल्यानं लोकं खासकरून लहान मुलं प्रचंड भुकेलेली आहेत. पण लग्न लागायचं काही चिन्ह दिसेना. कारण `माननीय` अजून पोहाचायचे होते.

शेवटी एकदाचे नवरा-नवरी बोहल्यावर आले. त्यांना बसायला खुर्च्या दिल्या. दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते यांचे स्वागत सत्कार सुरू आहेत. आता या साहेबांच्या कार्यकर्त्यांची आशीर्वादपर भाषणं सुरुयेत. मान्यवर साहेब येईपर्यंत वेळ काढायची कामगिरी हे वाजंत्री बजावत आहेत. बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर अखेर एकदाचे साहेब आले. साहेबांचे स्वागत करताना सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीस काय स्फुरण चढले होते! शब्दसामर्थ्य पणाला लावून मुक्त उधळण सुरू होती.

आता साहेबांचा सत्कार संपन्न झाला. साहेबांचं आशीर्वादपर मनोगत सुरू झालं. 'अत्यंत दिमाखदार आणि दृष्ट लागावा, असा सोहळा आमच्या कार्यकर्त्याने घडवून आणलाय याचा आम्हाला आनंद वाटतो!' साहेब म्हणाले. लग्नाचा धनी म्हणजे नवरीचा बाप ते कौतुकोद्गार ऐकून कृतकृत्य झाला. साहेबांनी खर्चिक लग्नावर स्तुतीसुमने उधळतल्यानं चुकीचा संदेश गेलाच शिवाय सवयीप्रमाणं भाषणाचं चऱ्हाट वळणं सुरू होतं. ते बरंच लांबलं. आतापर्यंत शांत बसलेल्या वऱ्हाडी मंडळींचा संयम ढळला. शुभ लग्न सावधान... असं समूह स्वरात मोठ्यानं म्हणत लोकांना अक्षता टाकायला सुरुवात केली...

गावाकडची लग्नं हल्ली हल्ली तर अंगावरच येऊ लागलीत. काय तो बडेजाव, काय तो दिखाऊ दिमाख. वऱ्हाड्यांना तोंडात बोटं घालायला लावणारी ही लग्नं मुहूर्त टळूनही उरकता उरकत नाहीत ! सत्कार सोहळे, पुढाऱ्यांची आशीर्वादाची भाषणं. अलीकडे लग्न सोहळ्यात आध्यात्मिक गुरू, बाबा, बुवा, महाराज, उपदेशकांचंही मोठ्ठं स्तोम माजलंय. मग कुठं ऐन लग्नातच दर्शनबारी सुरू होते! या लग्न नामक सोहळ्यात नवरा-नवरी, मुहूर्त याकडे लक्ष द्यायला कोणाला उसंतच नसते. गावाकडच्या लग्नांचं पूर्वीचं साधं, सोज्वळ रूप आता पुरतं पालटून गेलं आहे.

अर्थात, हा बिघाड काही लग्नापुरता र्मयादित नाहीये. परंतु समाजात अनिष्ट परंपरा, विकृती कशा निर्माण होतात, त्या पद्धतशीर कशा पोसल्या जातात, पुढे कशा फोफावतात, त्यातून सामाजिक प्रश्न कसे निर्माण होतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता असणाऱ्यांनी गावाकडची लग्नं जरूर ‘अटेन्ड’ करावीत. अर्थात हे केवळ गावाकडील लग्नांत घडतेय असे अजिबात नाहीये. शहरांतल्या लग्नांचं इव्हेंटमध्ये झालेल्या रूपांतर बघून विवेकी लोकांना तिकडे गुदमरल्यासारखे होते.

एका मित्राच्या लग्नाची पत्रिका घरात येऊन पडली. आशीर्वाद, सन्माननीय उपस्थिती, विशेष उपस्थिती, प्रेषक, कार्यवाह, व्यवस्थापक, संयोजक, स्वागतोत्सुक, निमंत्रक, भाऊबंद, किलबिल परिवार, आणखीन फर्म्सची मिळून तब्बल ३५९ नावं होती! नवरा-नवरीची नावं कोपऱ्यात अंग चोरून बसलेली! बऱ्याचदा पत्रिकेत नावं असलेली मंडळी लग्नाच्या मांडवाकडं फिरकतही नाहीत! अलीकडे लग्नपत्रिकेबाबत नवं ‘फॅड’ आलंय. एकाच लग्नाच्या तीन-चार नमुन्यांतल्या पत्रिका पाहायला मिळतात.

यात खटकणारी बाब म्हणजे पाहुण्यांची ‘लायकी’, त्यांचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय स्थान पाहून पत्रिका वाटल्या जातात. गरिबाला गरीब पत्रिका आणि दाबजोर असामींसाठी सजवलेली महागडी पत्रिका! विशेष म्हणजे असा चातुर्वर्ण्य पाळायला कोणाला काही गैर वाटत नाहीये. अगदी बिनदिक्कतपणे सारं सुरू आहे. पत्रिका वाटण्यासाठी उन्हातान्हात करावी लागणारी यातायात हा स्वतंत्र विषय आहे. ‘मान्यवरां’ची प्रत्यक्ष भेट होईपर्यंत यजमान लोकं पत्रिका देण्यासाठी हेलपाटे घालत राहतात. अगदी न थकता, न कंटाळता ते मान्यवरांचा पाठपुरावा करतच राहतात आणि पत्रिका हातात देऊनच घरी परततात.

राज्य पातळीवरील शाही विवाह सोहळे गाजतात. त्यांचं कवित्व सुरू राहतं. खाली सगळं तेच लोण झिरपतं. आज ग्रामीण भागातदेखील ‘इझी मनी’वाल्यांची संख्या वाढलीय. ते लग्न किंवा अन्य कौटुंबिक सोहळ्यांवर प्रचंड पैसे उधळतात. त्यातून ‘लॉन्स कल्चर’ जन्माला आलंय. सायंकाळची वेळ. तिथली ती गुबगुबीत हिरवळ. ऑर्केस्ट्रा, लायटिंगचा झगमगाट, नवरीला डोली, नवरदेवाला घोडा, (परवा लग्नाआधी नवरदेवाची वरात निघाली होती. नवरदेव ज्या घोड्यावर बसला तो घोडा डीजेच्या गाण्यांवर नाचत होता.

घोड्याच्या मालकाने लगाम सोडला आणि घोडा जे चौखूर उधळला की विचारु नका! काही अपघात वगैरे झाला नाही, हे नशीब!) फुलांची लख्ख सजावट, बुफे जेवणाचा थाट, जोडीला फटाक्यांची आतषबाजी (अर्थात पैशांचा धूर). काही जण तर खास यासाठी रात्रीच्या वेळेला लग्न ठेवतात. लग्न आता मोठा इव्हेन्ट बनलंय. ते ‘नेत्रदीपक’ व्हावं ही महत्त्वाकांक्षा वाढतेय! त्यासाठी त्यावर लाखोंची उधळमाधळ होते. लग्न किती मोठं झालं, त्याला कोण कोण आलं हे म्हणजे सोशल स्टेटसचा सिम्बॉल बनलाय. लग्नापेक्षा याच्याच चर्चा गावागावांत रंगतात. ही अशी प्रतिष्ठा मिळविण्याचा ‘संसर्ग’ साऱ्यांनाच जडलाय.

नेमकी हीच मानसिकता साधेपणानं लग्न करण्यातला मोठी अडसर बनलीये. मोठ्यांचे डोळे दिपवणारे सोहळे पाहून पोरीचं लग्न कसं करायचं, अशा विवंचनेतल्या बापांचा ऊर चेपतो. ते कोसळून पडतात. प्रसंगी स्वतःला संपवतात. ऐपत नाही आणि पोरीचं टुमणं मागं लागलेलं ‘किमान लग्न तरी देवळात माळबीळ घालून नका करू...’ यातून मार्ग कसा काढायचा? बाप कोंडीत सापडतो. महागडी, डोळ्यांना जेवढी भडक वाटतात तितकीच मनाला भडक वाटणारी, दिखाऊपणाचा उबग आणणारी, चुकीच्या प्रथांवर वायफळ पैसा आणि वेळ खर्च करणारी ही ‘गावाकडची लग्नं’ ही आता मोठी समस्या बनली आहे. या आर्थिक विषमतेनं अनेक सामाजिक प्रश्नही जन्माला घातले आहेत.

एखादी शीतल वायाळ पत्र लिहून या सगळ्या व्यवस्थेवरचा राग व्यक्त करत विहीर जवळ करते. त्याची तेवढ्यापुरती चर्चा होते, हळहळ व्यक्त केली जाते. पण या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तीव्र आच समाजातल्या धुरीणांना नाही. त्यामुळे सामुदायिक विवाह, गेटकेन लग्न असे पर्याय किंवा हुंडा देणं-घेणं टाळण्याच्या चांगल्या गोष्टींचे पायंडे पडत नाहीत. अपवाद म्हणूनच त्यांचं कौतुक होतं. पण अजूनही समाजातल्या मान-सन्मानाच्या कल्पनांमुळं या प्रयत्नांना हवा तेवढा पाठिंबा मिळत नाहीये. उच्च शिक्षण घेतलेले, भरपूर पैसे कमावणारे, नोकरी व्यवसायच्या निमित्ताने परदेशी स्थिरावलेल्या मुलांचे लग्नाच्या बाजारातले 'भाव' गगनाला भिडलेले असतात!

हुंड्यासारख्या शोषणकारी व्यवस्थेला पाठिंबा देणारी ही मुलं बघतो तेव्हा ही मुलं नेमकं काय शिकली? असा प्रश्न हमखास पडतोच! समाजातल्या प्रतिष्ठांनी, पुढाऱ्यांनी, धनिकांनी स्वत:च्या घरातली लग्नं संपत्तीचं किळसवाणं प्रदर्शन करण्याचा मोह बाजूला ठेवत शक्य तेवढ्या साध्या पध्दतीने करण्याचा घाट घातला आणि त्यासाठी सामाजिक दबाव निर्माण झाला तरच बदलाची सुरूवात होईल. खोट्या प्रतिष्ठेपायी होणारी गरीब कुटुंबांची पडझड वाताहत रोखता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com