सुगीचे दिवस

थोड्या वेळाने पाऊस उघडेल मग मामा शेंगा दास्तानी लावतील. छपरात कंदील पेटवेल. जित्रापांना वैरणपाणी करेल. वैरणीतील मक्यात एखादं कणीस सापडलं तर भाजून घेईल. त्याबरोबर रताळं मिळालं तर चैनीच. चार शेंगा तोंडात टाकेल आणि मोग्यातलं पोटभर पाणी पिऊन समाधानाचा ढेकर देईल. मग छपरात नाहीतर मांडवात जागा करेल, पोती अंथरेल आणि डोक्याखाली हात घेऊन पाठ टेकेल. गावात मामीनं बांधून ठेवलेली भाकरी तशीच असेल. चिडून ओरडून मामीचा दमा वाढून छाती घरघर करेल मग ती धापा टाकीत बसून राहील. मामाही कोणीतरी भाकरी घेऊन येईल आणि रातीला सोबत करेल, अशी भाबडी आशा ठेवणार नाही.
Harvesting Season
Harvesting SeasonAgrowon

जयंत खाडे

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. पावसाळा संपत आला होता. त्या वर्षी पाऊस उत्तम झाला. भुईमूग, हळद, तूर, हायब्रीड या मुख्य पिकांबरोबर उडीद, मूग, चवळी, मका हे सुद्धा झकास साधलं गेलं. उडीद, मूग, चवाळ्याचे वेल काढून त्यांच्या शेंगा खळ्यावर मळून चिमटीत एकेक दाणा वेचून बायकांनी भरला. जनावरांच्या वैरणीसाठी केलेला मका पण लागेल तसा काढत आणला. छपराजवळ माळव्याचे तळकट आहे. त्यात वांगी, मिरच्या, गवारी, टोमॅटो लावलं होतं. छपरावर दोडके, कारली, भोपळे, तोंदली यांचे वेल चढवले. या वेलींची सगळीकडे पिवळी पिवळी फुलं दिसायची. पण त्यांची फळं फक्त पोरींना सापडतात. त्या पण एखादा दोडका, दुधी भोपळा लहान असताना दिसला की कोणाच्या नजरेत येऊ नये अशा प्रकारे पाल्यात किंवा वेलीतच लपवतात.

माळाला भुईमूग काढायची लगबग सुरू होती. त्यातच दोन दिवसापासून संध्याकाळी परतीचा जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे भिजलेल्या रानातून वेल भसाभसा उपटत होते. सगळ्या माळ्याला प्रत्येकाच्या तुकड्यात बायकांचे पुट्टे शेंगा तोडायला बसले होते. एखादा गडीमाणूस वेल उपटून काढायचा. त्यावर्षी भुईमुगाला खूप पीक होते. आणि म्हणूनच वसाहतीमधील झाडून सगळ्या बायका शेंगा तोडायला येत. सकाळी नऊला सुरुवात करून दुपारी तीनपर्यंत प्रत्येकीचा ढीग वाटून देऊन पावसाअगोदर घरच्या वाटेला लावले जायचे. त्या दिवशी सकाळपासून तापायला लागलं होतं. बायका-पोरी तुरीच्या मोगण्याच्या सावलीत शेंगा तोडत होत्या. त्यांच्या काहीबाही गप्पा सुरू होत्या. कोणाची रात्री झालेल्या भांडणाची चर्चा चालू तर कोणी पीकपाण्याबद्दल बोलत होता. पोरी मोठ्यामोठ्याने शाळेतल्या गोष्टीवर गप्पा मारत होत्या. वसाहतीतील म्हातारी एकटीच वेल कोंबडा पायाखाली धरल्यासारखे धरून दोन्ही हाताने शेंगा तोडत होती.

तात्यापण पोती भरून गावाकडे न्यायच्या तयारीत होते. काल तोडलेल्या शेंगा भटाऱ्यात बांधून ठेवल्या होत्या. त्या सकाळी खळ्यावर वाळवायला पसरल्या. त्यांनी पोती काढून तपासायला सुरुवात केली. जुन्या पोत्यांना पडलेलले भसके सुतळी दाबनाने सांधायची तसेच पोत्याची तोंडं शिवायची पण तयारी ठेवली. गाडीबैलं आज पोती घेऊन जाणार. खरं तर शेंगाची पोती एका गाडीत बसणार नाहीत म्हणून तात्यांनी आबा, बापू यांना पण सांगून ठेवलं असावं.

बऱ्याच दिवसांनी मामा माळाला आला होता. रानाच्या मेहनतीनंतर आताच आलेल्या मामाने सगळ्या माळाला चक्कर मारली. पाठीमागे हात बांधून मामा मिशीतल्या मिशीत बारीक हसत, कुठेतरी उगवलेला काँग्रेस उपटत फिरून छपराकडे आला. बारीक डोळे करून वेलात दोडके, भोपळे शोधू लागला पण त्याला काही मिळाले नाही. पोरी लांबून त्याची गंमत पाहत होत्या. मामा सगळ्यांना आवडतो. तो आला की सगळी त्याच्याच भोवती फिरत असतात. आज शेंगा गोळा करून घरी न्यायला तात्यांना त्याची मदत पाहिजे म्हणून त्याला बोलावले असणार. अगदी पावसाने खोळंबा केला तर मग मामा वस्तीला पण राहील.

Harvesting Season
Tur : एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रातून वाढवली उत्पादकता

मी सकाळी सकाळी लवकर आलो होतो, पण मी आपल्या तुकड्यात काम करीत नाही. मी काकूच्या तुकड्यात वेल उपडत होतो. काकूने या कामासाठी मला एक गोळा शेंगा देण्याचे मान्य केले होते. त्या शेंगा मी संध्याकाळी दाजीच्या दुकानात घालणार होतो. मला कार्तिकात गल्लीतल्या मुलाबरोबर सायकल वरून जोतिबाला जायचं आहे. त्यासाठी मी पैसे जमा करत आहे. तसे मी काही सलगपणे व इमानदारीने काम करीत नाही आणि काकूला पण माझ्याकडून अपेक्षा नाही. तशी घरातील पोरं पण इतर कामात गुंतले होते. कोणी खोरीच्या डोंगरात पांदीनं सिताफळं शोधायला गेली होती. नवरात्रीच्या वेळी आष्टात या सीताफळाला खूप मागणी असते. पोरांना भरपूर पैसे मिळतात. दोन सऱ्या भुईमूग उपटल्यानंतर मी आंब्याखाली जाऊन बाबा कदमांची कादंबरी वाचत बसलो. त्यात फौजदार पाटलांच्या वाड्यावर जातो आणि तिथे मेजवानी घेतो असे वर्णन आहे. मेजवानीमध्ये मस्त कोंबडा, रश्‍शाचे वर्णन आहे. ते वाचून मला पण तोंडाला पाणी सुटलं, कदाचित ही रानातली कामं उरकल्यानंतर आमच्यात पण कोंबड्याचा बेत ठरेल.

दुपारी सगळे जेवायला बसतात. वसाहतीतील म्हातारी काही खात पीत नाही. एवढ्या शेंगा तोडताना एक शेंग फोडून तोंडात घालत नाही. तिचं काम यंत्रासारखं चालू असतं. बसून बसून तिला कढ येत नाही का तपकीर तंबाखूची तल्लफ होत नाही. तिच्या शेंगा सगळ्यांपेक्षा जास्त तोडून होतात. बाकीच्या वसाहतीमधील बायका खूप तपकीर लावतात. त्यांचे हात, साहित्य, कपडे यांना तपकिरीचा उग्र वास येतो.

Harvesting Season
कृषी सचिवांनी जळगावात घेतली महिला शेतीशाळा

जेवणात भाकरी, मुगाची उसळ, देशी दोडक्याचे कालवण, खर्डा, तेल चटणी असा बेत. मी मामा जवळ जेवायला बसलो आणि ते तिखट जेवण ओल्या शेंगा बरोबर पोटाला तडस लागेपर्यंत खाल्लं. नंतर मला काम करायचा कंटाळा आला म्हणून मी खळ्यावर जाऊन बैलगाडीत कलांडलो. तेवढ्यात रस्त्यावरून सायकल धरून चालत येणारा बागणीचा भै दिसला. लांबूनच मी भैला बरोबर ओळखलं. मी पळतच रस्त्यावर त्याला आडवा गेलो. उन्हाने आणि गदगदणाऱ्या वातावरणाने थकलेला भै मला पाहून तोंडभर हसला आणि म्हणाला,

‘‘अरे बेटा, इधर क्या चल रहा है!’’

त्याने बेटा म्हणल्यावर मी जाम खुश झालो, नाहीतर आम्हाला काय बोलवितात, बाळ्या, पिंट्या, बारक्या, भावन्या... ही काय नावं आहेत? मी भैला रानात घेऊन गेलो. अनपेक्षितपणे आलेल्या या पाहुण्याकडे पाहून सगळेच खूष झाले. पळत जाऊन मी भैला मोग्यातून गार पाणी आणून दिलं. उन्हात चालून श्रमलेला भै घटाघटा पाणी प्याला आणि त्याने मला अपार प्रेमाने आशीर्वाद दिला. नेहमी प्रमाणे भै सहजगत्या मैफिलीत मिसळला. तो मराठी बोलतो पण खुप छान उर्दू शब्द वापरतो. आमच्या गल्लीतल्या इसाक भै किंवा होटेल वाल्या ईम्या सारखं ‘चढ्या, उतऱ्या’ असलं बोलत नाही. बोलताना सारखं ‘ईन्शाअल्ला, ईन्शाअल्ला’ असं म्हणतो, बायकोला बेगम म्हणतो. हे लई भारी वाटतं. मला भै आमच्या घराजवळ असायला हवा होता. तात्या म्हणतात की भै कुळीने लांब उत्तरेकडचा आहे.

भै गावात अडकित्ता, विळे विकण्याचा व्यवसाय करतो. गावात आला की आमच्या गोंदा तात्याच्या दुकानात बसतो. म्हणजे महफिल जमवितो. भै आला की गल्लीतले तरुण तुर्क जमतात. भैच्या अद्‌भुत व विलक्षण प्रवासकथा सुरू होतात. त्यात रेल्वेत भेटलेल्या सीमेवरील जवानांच्या अचाट धाडसाची, डब्यातून हातचलाखी करून किमती वस्तू लांबविणाऱ्याची, रात्री नदीच्या पुलावरून बायकोला ढकलणाऱ्या माणसाची आणी त्याला पकडून देणाऱ्या भिकाऱ्याची, हिमालयात फिरणाऱ्या अवलिया मराठी मुलीची, तृतीय पुरुषांच्या आयुष्याची कथा असते. मग मध्य प्रदेशातील जंगलात डाकूंनी घातलेल्या दरोड्याची घटना तर खूपच भीतिदायक असते. मला या कथा सिंदबादच्या सफरीप्रमाणे लिहाव्या वाटतात. तसेच भैसारखा प्रवास त्याच्याबरोबर करावा अशी खास इच्छा आहे. त्यातल्या त्यात अजमेरच्या दर्ग्याला गेलेच पाहिजे, असे वाटते. भै सांगतो की या दर्ग्याच्या मैनुद्दीन बाबाच्या सहवासात त्याचे पूर्वज होते. मला ही गोष्ट खूप महान वाटते. या बाबाच्या अनेक गोष्टी तो सांगतो. साक्षात सम्राट अकबर त्याच्या दर्ग्यात चालत येत असल्याचे तो सांगतो आणि बाबाचे मोठे आशीर्वाद आपल्यावर आजही असल्याचा दावा करतो. मला तो खरा वाटतो. नाहीतर डाकूंनी रेल्वे दोन रात्री अडवूनसुद्धा तो सहीसलामत परत आला नसता. रानात पण अशीच मैफिल रंगविलेला भै अचानक उठतो. तात्या त्याला शिबडंभर शेंगा देतात. भै अल्लाच्या नावाचा आशीर्वाद देऊन मार्गस्थ होतो. मी बराच वेळ पांदीतून जाणाऱ्या भैच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहतो.

वसाहतीमधील बायका-पोरी आणि माझ्या वयाची मुलं शेंगा तोडायला आलेली. या बायका घर चालवण्यासाठी अपार कष्ट करतात. बहुतांशी घरामधील कर्ती माणसे व्यसनी आहेत. प्रत्येक दिवशी कामाला जाऊन घर चालवण्याची कसरत या बायका करतात. मुले वसाहतीमधील शाळेत जातात. पण शिक्षणाचा दर्जा खूपच सुमार आहे. शाळा म्हणजे केवळ औपचारिकता. मुलींना तर तेवढंही स्वातंत्र्य नाही. यामध्ये हाडापेराने मोठी असलेली छोटी मुलगी चिंगी सगळ्या पोरींची लाडकी. आमच्या आक्काच्या शाळेत तिची मोठी बहीण होती. तिचे लहान वयात लग्न झाले आणि काही कौटुंबिक कलहात तिने जीवन संपवले. एकमेकांना सतत अद्वातद्वा करणाऱ्या आमच्या बहिणी तिच्याशी अपार प्रेमाने वागतात. मग तिला कोणी बांगड्या, टिकल्याचे पाकीट, रिबीन देतात. तिच्या आईला ताई सकाळीच तोडलेले दोडके, भोपळा देते. वसाहतीमध्ये परत जाताना तिचा पाय निघत नाही. दुपारी चिंगीचा दारुडा बाप झोकून तरंगत तरंगत रानात वेल न्यायला आला. मामानं त्याला एक बिंडा बांधून डोक्यावर दिला. तो झोकांडतच चालायला लागला. तात्या त्याला म्हणाले, ‘‘सावकर, डोक्यावर य्याल हाईत, कुठं धडपडला तर येलावर डोकं पडंल असं बघा.’’ तात्यांना या लोकांचा खूप राग येतो म्हणून ते यांना कधी रानात कामाला बोलवत नाहीत.

ज्ञानू मामा शेंगा भरून यायच्या तयारीत आहे. मी त्याला आज वस्ती राहू या का, म्हणून विचारले तर तो मिश्किल हसत नेहमीप्रमाणे म्हणाला,

‘‘आ, वस्ती राहतोस का आणि काय?’’

मामाची ही कायमची सवय आहे, तो घरी आल्यावर जेवताय का म्हणून विचारलं की म्हणतो,

‘‘आ, जेवतुस का आणि काय?’’

कधी रानात जाताना भेटला आणी माळाला येता का म्हणून विचारले की म्हणे,

‘‘आ, माळाला येवू का आणि काय?’’

त्याची अशी गंमत असते. खरं तर आज तात्यांनी त्याला ऐनवेळी पाऊस आला तर वस्तीवर राहायलाच बोलवलं आहे. तसा मामा खरा रानमाणूस आहे. उभ्या पावसात सहज रात्रभर माळाला काढेल. गहू काढताना तो असाच रानात मुक्काम ठोकतो. त्या भयानक थंडीत तो सरीतच झोपतो आणि पहाटे उठून गहू कापायला सुरुवात करतो. बरं त्याला जेवणखाणं नसलं तरी चालतं. रानातलंच काहीबाही खाल्लं तरी त्याचं भागतं. घरी मामा वस्ती राहणार, हे कळल्यावर मामी त्याचं जेवण पोहोचविण्यासाठी चंदर किंवा कोणातरी पोराच्या मागे लागते पण बहुतांशी तिला कोण दाद देत नाहीत. मला पण मामा बरोबर असंच भर पावसात रात्रभर मस्त मुक्काम ठोकायचा आहे.

दुपारचे तीन वाजून गेलेले. सगळं आभाळ गच्च भरून आलेलं. आता कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होईल. अजून शेंगा तोडायच्या बाकी आहेत; पण तात्यांनी आता सगळ्यांना थांबायला सांगितलेलं. आणि मामाला शेंगा वाटायचं काम दिलेलं. मामा मिशीत हसत डोक्याला टॉवेल गुंडाळत सगळ्यांच्याकडे बघायला लागला. पोरींना माहीत होता आता मामा काय करणार ते. मामाने सगळ्यांनी तोडलेल्या शेंगावर नजर टाकली. म्हातारीच्या शेंगा सगळ्यात जास्त होत्या. मामाने तिच्या त्या ठेवून बाकी शेंगा पोत्यात भरायला सांगितलं. खरं मला प्रत्येकाचे वाटे करायचे होते. मी मामाला विचारलं तर तो म्हणाला,

‘‘आ, वाटं घालत बसतुस का आणि काय?’’

मामाने म्हातारीने तोडलेल्या शेंगांचा अर्धा भाग करून परत अर्ध्याचे सात भाग केले आणि एकाएकाला वाटून टाकले. जास्त काम करणाऱ्या म्हातारीला आणखी शिबडंभर शेंगा दिल्या. सगळ्या बायका समाधानाने आणि घाईने चालायला लागल्या. चिंगी मात्र बराच वेळ रानातच रेंगाळत होती पण नंतर तिच्या आईने बोलावल्यावर जोरात पळत सुटली.

आमच्या शेंगा तोडून झाल्या नव्हत्या आणि भरून पण होणार नव्हत्या. शेंगा माळाला ठेवण्या शिवाय पर्याय नव्हता. मामा आता वस्तीला राहणार होता. आबाच्या शेंगा तोडून भरून झाल्या होत्या. पावसाअगोदर त्याने गाडी भरून नेटाने बाहेर काढायला सुरुवात केली. त्या गाडीत जागा होती म्हणून पोरी मधून रस्त्याकडे चालत निघाल्या. मी पण काकूकडून माझ्या शेंगा घेतल्या आणि पाय ओढत रस्त्याकडे निघालो. म्हणतात ना मावळतीला आपली वास्तू सोडू नये; तिच्या हाका खूप आर्त स्वरात ऐकू येतात.

थोड्या वेळाने पाऊस उघडेल मग तात्या मामाच्या मदतीने शेंगा दास्तानी लावतील. दिवस पूर्ण कलला की मामाला म्हणतील, ‘‘थांबू या दोघं बी.’’

मग मामा म्हणेल, ‘‘आ, दोघं थांबता का आणि काय?’’ पडत्या फळाची आज्ञा मानून तात्या घराकडे निघतील. मामा छपरात कंदील पेटवेल. जित्रापांना वैरणपाणी करेल. वैरणीतील मक्यात एखादं कणीस सापडलं तर भाजून घेईल. त्याबरोबर रताळं मिळालं तर चैनीच. चार शेंगा तोंडात टाकेल आणि मोग्यातलं पोटभर पाणी पिऊन समाधानाचा ढेकर देईल. मग छपरात नाहीतर मांडवात जागा करेल, पोती अंथरेल आणि डोक्याखाली हात घेऊन पाठ टेकेल. गावात मामीनं बांधून ठेवलेली भाकरी तशीच असेल. चिडून ओरडून मामीचा दमा वाढून छाती घरघर करेल मग ती धापा टाकीत बसून राहील. मामाही कोणीतरी भाकरी घेऊन येईल आणि रातीला सोबत करेल, अशी भाबडी आशा ठेवणार नाही. अशा कितीतरी खस्ता त्यानं पूर्वीही खाल्ल्या असतील आणि पुढेही खात राहील.

(लेखक सांगली जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत.) ९४२१२९९७७९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com