अमरावती विभागात ‘महाबीज’चे १३ हजार हेक्टरवर बीजोत्पादन

नव्वद टक्के शेतकऱ्यांपर्यंत लागवडीच्या बियाण्याचा पुरवठा
Seeds Production
Seeds ProductionAgrowon

अकोला ः खरीप हंगामात महाबीजने (Mahabeej)अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे १३ हजार हेक्टरवर बीजोत्पादनाचा (Seed Production) कार्यक्रम निश्‍चित केला आहे. यात प्रामुख्याने ११ हजार हेक्टरवर सोयाबीनचे बीजोत्पादन (Soybean Seed Production) असेल. बीजोत्पादनासाठी सहभाग घेतलेल्या ९० टक्के शेतकऱ्यांपर्यंत लागवडीच्या बियाण्याचा पुरवठासुद्धा (Seed Supply) झालेला आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने सध्या सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. हंगामात सोयाबीनचे बियाणे पुरवण्यात महाबीजचा आजवर मोठा वाटा राहिलेला आहे. गेल्या दोन-तीन खरीप हंगामात परतीच्या पावसाने मात्र मोठा फटका महाबीज बीजोत्पादन कार्यक्रमाला दिला. यंदा पुन्हा महाबीज यंत्रणा नव्या जोमाने कामाला लागली आहे. आगामी खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे निर्मितीच्या उद्देशाने बीजोत्पादन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. यात प्रामुख्याने सोयाबीनचा ११ हजार हेक्टरवर प्रमाणित बियाण्याचा व दोन हजार हेक्टरवर पायाभूत बियाण्याचा बीजोत्पादन कार्यक्रम राबवला जात आहे.

सततच्या पावसामुळे २०१९ ते २०२१ असे तीन हंगाम बीजोत्पादनाच्या दृष्टीने वाहून गेल्या सारखेच राहिले. बियाण्याची उपलब्धता सातत्याने कमी झाली. कधीकाळी पाच लाख क्विंटलपर्यंत बियाणे पुरविणारे महाबीज आता ५० ते ६० हजार क्विंटलच बियाणे यामुळे पुरवू शकत असल्याची वस्तुस्थिती आहे. हा कालखंड विसरून यंत्रणा पुन्हा नव्याने कामाला लागली. या हंगामात प्रमाणित सोयाबीनचा कार्यक्रम ११ हजार हेक्टरवर नियोजित करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक पाच हजार हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादन घेतले जाईल.

बुलडाणा ‘सीड हब’

बीजोत्पादनासाठी बुलडाणा जिल्ह्याचे वातावरण हे पोषक आहे. गेल्या काही वर्षांत हा जिल्हा बीजोत्पादनात सातत्याने अग्रेसर आहे. महाबीजच नव्हे तर इतर कंपन्यांकडूनही या जिल्ह्यात बीजोत्पादनावर जोर दिला जातो. महाबीजने हंगामात १३ हजार हेक्टरचे नियोजन केले. यात सुमारे ५८०० हेक्टर बीजोत्पादन या एकाच जिल्ह्यात घेतले जाईल. त्यातही पाच हजार हेक्टरवर सोयाबीन आहे. या जिल्ह्यात बुलडाण्यासह चिखली, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा, लोणार आदी तालुके अग्रेसर बनत आहेत.

बीजोत्पादकांना मिळतो अधिक दर

महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी घेतलेल्या शेतकऱ्यांना त्या-त्या जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांतील डिसेंबर-जानेवारी महिन्यातील दर गृहीत धरून २० ते २५ टक्के अधिक भाव मिळत असते. यामुळे बीजोत्पादन कार्यक्रम ही बाब फायदेशीर ठरत आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com