Selection of soybean varieties : उत्पादन स्थिरतेसाठी सोयाबीनच्या योग्य वाणांची निवड

Soybean Crop : सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड ही जमिनीचा प्रकार, वातावरण बदल, परिपक्वतेचा कालावधी यानुसार केली पाहिजे. त्यातच अलीकडे मजुरांची कमतरता ही समस्या लक्षात घ्यावी लागते.
soybean varieties
soybean varietiesAgrowon

डॉ. मिलिंद देशमुख, डॉ. अनंत इंगळे, डॉ. विवेक चिमोटे

Soybean Crop Update : महाराष्ट्रामध्ये सोयाबीन हे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते. त्यातही नवीन विविध वाणांची उपलब्धता होत आहे. मात्र वाणाची निवड करताना शेतकऱ्यांना अडचणी येतात. नवीन वाणाची निवड करावी की नाही, या शंकेत ते अडकून पडतात.

परिणामी, नवीन वाण उपलब्ध असूनही त्याचा फायदा घेण्यामध्ये शेतकरी कमी पडत असल्याचे दिसून आले आहे. मात्र वातावरण बदलामुळे शेती व पीक यांवर अनिष्ट परिणाम होत आहेत.

त्यांचा विचार करताना वातावरण बदलाला प्रतिकारक व स्थानिक हवामानास अनुकूल असे वाण निवडले पाहिजेत. बदलत्या स्थितीनुसार आपल्या शेती पद्धतीत बदल व सुधारणा करणेही आवश्यक आहे.

जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड

- महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जमीन आढळते. जमिनीचा प्रकार व वाण यांचे महत्त्वाचा संबंध आहे. त्यामुळे हलकी, मध्यम आणि भारी अशा जमिनीच्या प्रकारानुसार वाणाची निवड करावी.

- अत्यंत हलक्या, उथळ किंवा मुरमाड जमिनीमध्ये सोयाबीन पीक घेणे टाळावे.

- जमिनीतील सेंद्रिय कर्ब चांगले असावे.

- विद्यापीठ किंवा संशोधन संस्था यांनी विभागनिहाय शिफारस केलेल्या वाणातील आपल्या भागासाठी योग्य वाणाची निवड करावी.

soybean varieties
Soybean Market Rate : वाशीममध्ये सोयाबीनला ४४५० ते ५२०० रुपये दर

जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड करणे

- हलकी जमीन असेल तर ८५ ते ९५ दिवसांत आणि मध्यम जमीन असल्यास ९५ ते १०० दिवसांत तयार होणारे वाण निवडावेत.

उदा. जे.एस.-९३०५, पी.के.व्ही.- अंबा (पी.के.व्ही ए.एम.एस. -१००३९), आर.व्ही.एस.-१८, एम. ए.यू.एस. १५८, एम. ए.यू.एस. ६१२, जे.एस.-३३५.

- भारी जमीन असल्यास मध्यम ते उशिरा येणारे वाण निवडू शकतो. उदा. फुले किमया, फुले संगम, फुले दूर्वा, एम. ए.यू.एस. -७१, एम. ए.यू.एस. - ६१२, फुले कल्याणी, तसेच पी.के.व्ही.- अंबा (पी.के.व्ही. ए.एम.एस. -१००३९) इ.

अ) त्यातही आपल्याकडे भारी जमीन व पाण्याची देण्याची व्यवस्था असली तरच उशिरा येणारे वाण निवडावेत.

ब) पाणी देणे शक्य नसल्यास मध्यम कालावधीत येणारे वाण निवडावेत.

क) भारी जमीन असल्यास उशिरा व मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणांपैकी दोन - तीन वाण निवडावेत. कोणत्याही एकाच वाणाची निवड करू नये. कारण वाण विविधता अतिशय महत्त्वाची आहे. वातावरण बदलाच्या परिणामावर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणाऱ्या वाणाची निवड करणे आवश्यक आहे.

उदा. आपल्याकडे १० एकर जमीन असेल. त्यातील ४ एकर भारी असेल तर त्यात उशिरा येणारे वाण (फुले संगम).

मध्यम जमीन : ३ एकर, त्यात मध्यम कालावधीत येणारे (फुले किमया, जे.एस. -३३५, किंवा पी.के.व्ही.- अंबा, -पी.के.व्ही. ए.एम.एस. -१००३९, एम. ए.यू.एस. -७१ इ.).

हलकी व मध्यम : ३ एकर, त्यात लवकर येणारे वाण (जे.एस.९३०५, आर.व्ही.एस.-१८, पी.के.व्ही.- अंबा (पी.के.व्ही. ए.एम.एस. -१००३९) इ.

अशाप्रकारे नियोजन केल्यास नैसर्गिक आपत्तीपासून कमी नुकसान होईल. म्हणजे पाऊस कमी किंवा जास्त झाला तरी सर्वच सोयाबीन पिकाचे नुकसान होणार नाही. तसेच या पिकांची काढणी वेगवेगळ्या वेळी होणार असल्याचा फायदा होईल. मागील दोन वर्षे अनेक ठिकाणी सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे १०० दिवसांत परिपक्व होणाऱ्या वाणांचे अतोनात नुकसान झाले.

मात्र याच पावसातून उशिरा व लवकर येणारे वाण सुटले होते. म्हणजे त्यांचे अजिबात नुकसान झाले नाही. त्यामुळे आपल्या शेतावर एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणाऐवजी वेगवेगळ्या वेळी पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी.

वाणांच्या वाढ व अन्य गुणधर्मानुसार निवडीमध्ये पडणारा फरक

- फुले संगम हे वाण उंच व जास्त प्रमाणात वाढणारे आहे. त्याची पेरणी करताना लागवडीचे अंतर महत्त्वाचे आहे. जर दाट पेरणी केली तर उत्पादन मिळत नसल्याचा माझा स्वतःचा आणि अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

- फुले संगम हे उभट व लवचिक वाण आहे. पानांचा रंग थोडा पिवळसर असल्याने रस शोषक किडींचा (उदा. चक्री भुंगा, खोड अळी) प्रादुर्भाव जास्त दिसून आला. ही बाबही लक्षात ठेवावी.

आणखी एक बाब, फुले संगम हे वाण प्रतिसाद देणारे (responsive) वाण आहे. म्हणजे तुमचे खत, पाणी आणि अन्य व्यवस्थापन अत्यंत काटेकोर असेल, हे वाण खूप चांगले उत्पादन देते. ज्यांना कोणत्याही कारणांमुळे काटेकोर नियोजन करणे शक्य नाही. त्यांनी फुले संगमचा विचार करू नये.

- त्यामुळे फुले संगम या एकाच वाणाची निवड करण्यापेक्षा काही क्षेत्रांवर फुले संगम आणि काही क्षेत्रांवर फुले किमया अशी निवड करावी.), त्यातही फुले संगम हे भारी जमिनीसाठीच निवडावे. आपली जमीन मध्यम असेल, तर फुले किमया किंवा इतर मध्यम कालावधीत येणाऱ्या वाणाची निवड करावी.

फुले संगम, फुले किमया आणि फुले दूर्वा वाणांची वैशिष्ट्ये व फरक

फुले संगम (के.डी.एस. ७२६)

- महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण आणि तमिळनाडू या राज्यांत लागवडीसाठी शिफारशीत.

- लागवडीसाठी ४५ × ८ ते १० सेंमी असे अंतर ठेवावे.

- परिपक्व होण्यासाठी ११०-११५ दिवस लागतात,

- पानांचा रंग फिक्कट हिरवा म्हणजे पिवळसर असतो. (लाइट ग्रीन)

- पानाचा आकार लांबट आणि पातळ असतो. तसेच पाच पाने व चार पाने जास्त प्रमाणात दिसून येतात.

- वाढ उंच (म्हणजे २.५ फुटांपर्यंत) होते. दोन फांद्यांतील अंतर थोडे जास्त असते.

- २ ते ३ दाणे असलेल्या शेंगा एका ठिकाणी ४ ते ५ शेंगा दिसून येतात.

- आकर्षक व पिवळसर रंगाचे दाणे

- सरासरी उत्पादन हेक्टरी २५ ते ३० क्विंटल.

soybean varieties
Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच पेरणी करा

फुले किमया (के.डी.एस. ७५३)

- दक्षिण महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्‍चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांत लागवडीसाठी शिफारशीत आहे.

- ४५ × ७-१० सेंमी वर लागवड करावी.

- परिपक्व होण्यासाठी १०० ते १०५ दिवस घेते.

- पानाचा रंग गडद हिरवा असून, थोडे जाड असते. चार पानांची संख्या जास्त दिसून येते.

- पानाचा आकार - थोडा गोलाकार.

- फांद्यांची संख्या जास्त व जवळ जवळ फांदी तसेच शेंगा जवळ जवळ लागतात. संगम या वाणापेक्षा जवळ व जास्त प्रमाणात शेंगा लागतात.

- खोडाची जाडी जास्त व उंची (संगम वाणापेक्षा कमी) २ फुटांपर्यंत असते. शेंगांची संख्या ४ ते ५ एका ठिकाणी व २ ते ३ दाणे असलेल्या शेंगा दिसून येतात. तीन दाणे असलेल्या शेंगा जास्त असतात.

- हेक्टरी सरासरी २७ ते ३२ क्विंटल उत्पादन देणारे वाण.

- तांबेरा रोग व खोडमाशी या किडीस प्रतिकारक्षम वाण.

- योग्य व्यवस्थापनात अतिशय चांगले उत्पादन देते.

फुले दूर्वा (के.डी.एस. ९९२)

- दक्षिण महाराष्ट्र, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांत लागवडीसाठी शिफारशीत आहे.

- हे मध्यम कालावधीत येणारे वाण असून ९५ ते १०० दिवसांत परिपक्व होते.

- उंची किमया व संगम यांच्या तुलनेत थोडी कमी दिसून येते. (१.५ ते २ फुटांपर्यंत)

- पानाचा आकार थोडा त्रिकोणी, फिक्कट हिरवा व चार पानाचे प्रमाण मध्यम. ३ पानांची संख्या जास्त प्रमाणात असून, पाने थोडी वरती वाढलेली दिसतात. खोडावर व शेंगेवरही थोड्या प्रमाणात केस असतात.

- उंची कमी व खोडाची जाडी जास्त असली तरी दोन फांद्यातील अंतर कमी आणि दोन इंटरनोडमधील अंतरही कमी असल्यामुळे एकूण फांद्यांची संख्या जास्त राहते. तसेच एका ठिकाणी शेंगांची संख्या ५ ते ६ (म्हणजे इतर वाणांच्या तुलनेत जास्त) दिसून येते. एकूण शेंगांचे प्रमाण वाढते.

- तांबेरा रोग व खोडमाशी किडीस प्रतिकारक्षम.

- योग्य व्यवस्थापनात अतिशय चांगले उत्पादन देते.

- हेक्टरी सरासरी २७ ते ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.

- वरील फुले संगम, फुले किमया आणि फुले दूर्वा हे तीनही वाण उत्तम व्यवस्थापनास प्रतिसाद देतात. आपले नियोजन चांगले नियोजन असल्यास त्यांच्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. त्यामुळे काटेकोरपणे व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळण्याची खात्री असते. फुले संगम हे वाण उंच व जास्त प्रमाणात वाढ होणारे वाण असून, लागवडीतील अंतर योग्य ठेवावे. दाट पेरणी केल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

- फुले संगम हे भारी जमीन असेल तरच निवड करावे. मध्यम जमीन असेल तर फुले किमया, फूल दूर्वा किंवा इतर मध्यम कालावधीत येणारे वाण निवड करावेत.

- मागील दोन वर्षांपासून फुले किमया या वाणाचे उत्पादन विदर्भ आणि पूर्ण राज्यातील शेतकऱ्यांस चांगले मिळालेले दिसून येते

- नवीन तंत्रज्ञानाचा आणि योग्य वाणांचा वापर करून मध्यम ते भारी जमिनीत २५-३० क्विंटल उत्पादन आपल्याला सहज मिळवता येवू शकते.

संपर्क - डॉ. मिलिंद देशमुख (सोयाबीन पैदासकार), ९४२२२१०४७६, डॉ. अनंत इंगळे, (संशोधन सहयोगी), ८३२९६६९०७७ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com