
हातकणंगले (जि. कोल्हापूर) तालुक्यातील नेज गावामध्ये सौ. उज्ज्वला चव्हाण यांचे शेळीपालनाचा (Goat Rearing) गोठा आहे. भाडेतत्त्वावरील जागेत त्यांनी हा पत्रावजा गोठा उभारला आहे. उज्ज्वला यांचे पती शशिकांत हे डेक्कन मिलमध्ये वायरिंगचे काम करत होते. डेक्कन मिल बंद झाल्यानंतर चरितार्थाचा प्रश्न उभा राहिला.
घरची केवळ १३ गुंठे शेती, त्यामुळे यातील उत्पन्नात कुटुंबाचे खर्च भागवायचा कसा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी विविध शेतीपूरक उद्योगांचा अभ्यास केला. यातून शेळीपालनाचा पर्याय त्यांनी निवडला. बारा वर्षांपूर्वी एका शेळीपासून सुरू झालेला हा व्यवसाय अनेक अडचणींचा सामना करत ४० शेळ्यांपर्यंत जाऊन पोहोचला. घरचे सर्व जण यामध्ये सहभागी आहेत. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी स्थानिक जातींच्या शेळ्यांचे संगोपन केले. परंतु यात फारसा नफा राहत नसल्याने त्यांनी व्यवसायवृद्धीसाठी पंजाबी बिटल जातीच्या शेळ्यांची निवड केली.
शेळ्यांचे व्यवस्थापन ः
१) पंजाबी बिटल जातीच्या १८ शेळ्या, एक बोकड आणि २० करडांचे संगोपन. वजनानुसार शेळ्यांचे वर्गीकरण. अत्यंत कमी खर्चात ३० बाय ६० फुटांच्या पत्राच्या गोठ्यामध्ये शेळ्यांची व्यवस्था.
२) मोठ्या शेळ्यांची स्वतंत्र व्यवस्था, छोट्या करडांसाठी फिरते कप्पे. गोठ्याच्या मध्यभागी गव्हाण, पाणी व्यवस्था.
३) शेळी सोळा महिन्यांत दोन वेळा वेत देते. एकावेळी दोन करडे होतात. करडांना पुरेसे दूध दिले जाते.
४) शेळ्यांना दिवसातून दोन वेळा चारा आणि दोन वेळा खुराक. आहारात तूर भुसा, हरभरा भुसा, मका, गहू, शेंगदाणा यांचा खुराक. ओल्या चाऱ्यांमध्ये हत्ती गवत, मका आदींचा समावेश.
५) दिवसातून दोन वेळा चारा आणि दोन वेळा खुराक. प्रत्येक शेळीला एक किलो खुराक, तीन किलो कोरडा चारा, तीन किलो ओला चारा.
६) सकाळी आठ वाजता खुराक, अकरा वाजता हिरवा चारा, बारा वाजता पाणी आणि तीन वाजता परत चारा असे नियोजन.
७) स्वतःच्या शेतामध्ये हत्ती गवत, शेवरी, तुती लागवड. कर्नाटकातून तूर, हरभरा भुसा खरेदी. मका, शेंगदाणे पेंडीची सांगली बाजारपेठेतून खरेदी.
घरच्यांची साथ मोलाची...
उज्ज्वलाताईंकडे गोठा स्वच्छता, करडांच्या दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी असते. शशिकांत हे शेळ्यांसाठी चाऱ्याची व्यवस्था करतात. गौरव आणि अभिजित ही दोन्ही मुले शेळी, बोकड विक्रीचे नियोजन सांभाळतात. मुलगी मोनिका हिचीदेखील शेळी व्यवस्थापनात मदत होते. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व सदस्य गोठ्यात असतात.
यामुळे शेळ्यांवर लक्ष ठेवणे शक्य होते. यामुळे मरतुकीमुळे होणारे नुकसान टाळणे शक्य झाले. सध्या शेळ्यांचा गोठा भाड्याच्या जागेत आहे. यासाठी वर्षाला २० हजार रुपये भाडे दिले जाते. गोठा गावापासून लांब असल्याने विजेचा मोठा खर्च आहे. यामुळे चारा कटरसाठी जनरेटरचा वापर केला आहे.
सोशल मीडियावरून शेळ्यांची विक्री ः
सुरुवातीच्या काळात चव्हाण यांना स्थानिक बाजारामध्ये शेळी, बोकडांची विक्री करावी लागत असे. या बाजारात संपर्क झालेले काही लोक शेडवरून येऊन शेळ्या घेऊन जाऊ लागले. गेल्या पाच वर्षांपासून मात्र अभिजित, गौरव या मुलांच्या मदतीने उज्ज्वलाताईंनी सोशल मीडिया वरून शेळी, बोकडांची विक्री करण्यास प्राधान्य दिले. नवीन पिले तयार झाल्यानंतर लगेच त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. यातून परगावचे ग्राहक मिळवले जातात.
कोल्हापूर, मिरज रेल्वे स्थानकावरून शेळ्या, बोकड विविध ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून पाठवले जातात. पहिल्यांदा ग्राहकाकडून पाच हजार रुपयांचे टोकण घेतले जाते. ग्राहकाला शेळी किंवा बोकड पाठवत असल्याचे छायाचित्र पाठवले जाते. तिकिटाचे फोटोही पाठवले जातात. यानंतर ग्राहक पैसे पाठवतो.
पैसे मिळाल्यानंतर शेळ्या किंवा बोकड हे रेल्वेतून पाठवले जातात. सोशल मीडिया हा त्यांच्या शेळ्यांच्या विक्रीचा प्रमुख मार्ग आहे. ‘समर्थ गोट फार्म' या नावाने यू-ट्यूब चॅनेल, फेसबुकद्वारे ते शेळ्यांची विक्री करतात. विशेष म्हणजे शेळी, बोकडांची विक्री मटणासाठी न करता पैदाशीसाठी जास्त प्रमाणात होते.
विक्रीचे गणित ः
१) वर्षाला सुमारे ५० करडांची विक्री.
२) चार महिन्यांच्या करडाची विक्री. एक करडू (वजन २० ते २५ किलो) १५ ते २५ हजार रुपयांपर्यंत दर.
३) वर्षाला सहा लाखांची उलाढाल. साडेतीन लाखांपर्यंत व्यवस्थापन खर्च
अनुभवाने नुकसान कमी ः
गेल्या बारा वर्षांमध्ये चव्हाण कुटुंबीयांनी शेळीपालनामध्ये अनेकदा नुकसान सोसले. सुरुवातीच्या काळात पंजाब राज्यातून आणलेल्या पैदाशीसाठी आणलेल्या काही बीटल शेळ्या नेजमधील वातावरणामध्ये समरस न झाल्याने आजाराने मरण पावल्या. त्यामुळे पाच लाखांचे आर्थिक नुकसान झाले. शेळ्यांच्या मृत्यूने हा व्यवसाय डबघाईस आला.
पण उज्ज्वलाताईंच्या कुटुंबाने जिद्द न हारता हळूहळू घरच्या गोठ्यात जन्मलेल्या पंजाबी बीटल जातीच्या करडांचे संगोपन करून शेडमध्ये पैदास सुरू केली. शेळ्या विकत न आणता शेडमध्येच पुढील पिढी तयार केली.
आता रेतनासाठी जातिवंत बोकडाचा वापर केला जातो. एक बोकड एकच वर्ष वापरला जातो. पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण, औषधोपचार केले जातात. प्रत्येक शेळी, बोकडावर बारीक लक्ष असल्याने तातडीने योग्य उपचार करून त्यांनी मरतूक शून्यावर आणली आहे. घरच्या सदस्यांचे कष्ट आणि मरतूक शून्यावर असल्याने सध्या हा व्यवसाय फायद्यात आला आहे.
कुक्कुटपालनातून दररोज मिळकत
शेळीपालनाबरोबरच उज्ज्वलाताईंनी पूरक व्यवसाय म्हणून शेडमध्येच ५० गावरान कोंबड्यांचे संगोपन केले आहे. आर्थिक उत्पन्नाबरोबरच गोठ्याची स्वच्छता राहावी हा कोंबडीपालनाचा उद्देश आहे. गोठ्यात सांडलेल्या खाद्यावर कोंबड्यांचे पोषण होते. याशिवाय गोठ्यातील किडा, मुंगी व गोचीड नियंत्रण कोंबड्यांमार्फत होत असल्याने कोंबडीपालन शेळीपालनासाठी पूरक ठरले आहे. एक कोंबडा सुमारे ८०० रुपये आणि एक कोंबडी ४०० रुपयांपर्यंत जागेवर विकली जाते. गावरान कोंबडीचे एक अंडे आठ रुपये याप्रमाणे विकले जाते. दररोज १५ ते २० अंड्यांची विक्री होते. यातून दररोज मिळकत होते.
‘माविम'चा आधार
चव्हाण कुटुंबीयांना माविमअंतर्गत हातकणंगले येथील महिला कुटुंब ग्राम विकास लोकसंचालित साधन केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. या केंद्राच्या नेज येथील आशीर्वाद महिला बचत गटाकडून आर्थिक उपलब्धता करून चव्हाण यांनी शेळीपालनास सुरुवात केली.
महिला आर्थिक विकास महामंडळ, कोल्हापूरचे जिल्हा समन्वयक अधिकारी सचिन कांबळे, मॉनिटरिंग ऑफिसर उमेश लिंगनूरकर, महिला कुटुंब ग्राम विकास लोकसंचालित साधन केंद्र, हातकणंगले येथील अध्यक्षा रेखा दावणे, सहयोगिनी मंगल चव्हाण आदींचे मार्गदर्शन उज्वला चव्हाण यांच्या शेळीपालनास मिळाले आहे. व्यवसाय वृद्धीसाठी ‘माविम'ने आर्थिक बळ दिले आहे.
संपर्क ः सौ. उज्ज्वला चव्हाण, ८०८०७२९३८३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.