Sharad Pawar: शरद पवार आणि मशरूमवर संशोधन करणाऱ्या तरुणाच्या भेटीची गोष्ट

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr.Manmohan Singh) एका पत्रकाराला एकदा म्हंटले होते म्हणे, कृषी क्षेत्रातला (Agriculture) कोणता जर निर्णय घ्यायचा असेल तर मी आधी शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करतो आणि मगच निर्णय घेतो.
Sharad Pawar with Bharat chavhan
Sharad Pawar with Bharat chavhanAgrowon

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr.Manmohan Singh) एका पत्रकाराला एकदा म्हंटले होते म्हणे, कृषी क्षेत्रातला (Agriculture) कोणता जर निर्णय घ्यायचा असेल तर मी आधी शरद पवारांशी (Sharad Pawar) चर्चा करतो आणि मगच निर्णय घेतो. हे ऐकून असं वाटत की लोक काय अशीच मोठी झालेली नसतात, उन्हा पावसाच्या झळा खातचं ही माणसं मोठी होतात. शरद पवार हे व्यक्तिमत्त्व सुद्धा त्यातलंच असं म्हणलं तर वावगं ठरू नये.

शेती हा पवारांचा मुळात आवडता विषय. पण आवडीने काम भागलं नाही तर त्यांनी या क्षेत्रात दिलेलं योगदान सुद्धा भरीव आहे. देशहितासाठी २४ बाय ७ राजकारण करणारा हा नेता शेतीशी आपली नाळ कसा टिकवून आहे याचे बरेचसे किस्से ऐकिवात आहेत. त्यातलाच हा एक किस्सा. अगदी अलीकडेच घडलेला.

तर झालं असं होतं की, बॉटणी (Botany) या विषयात पीएचडी करणाऱ्या औरंगाबादच्या एक तरुणाने आपला पीएचडीचा शोधप्रबंध शरद पवारांना अर्पण केला होता. हा प्रबंध एकदा तरी साहेबांच्या नजरेखालून जावा म्हणून या तरुणाने थेट बारामती गाठलं. या तरुणाचं नाव भारत चव्हाण.

तसं तर शरद पवारांच नावाचं ग्रामीण भागातल्या तरुणांना ऊर्जा देणार आहे. भारतीय शेतीतून देशाच्या अर्थकारणात मजबुती आणण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना आणून नवीन प्रयोगांची संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात पवारांचा कायम पुढाकार राहिलाय. आणि यामुळेच त्यांची एकदा तर भेट व्हावी असं निदान शेती क्षेत्रातील एखाद्या तरुणाला वाटणं साहजिक आहे.

आपला हा शोध प्रबंध शरद पवारांना दाखवायचा म्हणून हा तरुण बारामतीला गेला खरं पण औरंगाबादला येताना साहेबांच्या विमानातून आला.

कारण शरद पवार त्या दोन दिवसांत मराठवाड्यातील विविध कार्यक्रमानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर असणार होते. भारत चव्हाणांनी पवारांची बारामतीत भेट तर घेतली पण या भेटीनंतर औरंगाबादलाच जाणार असल्यानं सोबत येणार का असं पवारांनी विचारलं? यावर भारत चव्हाण (Bharat Chavhan) यांनी तसा होकार दिला.

आता यापुढे जे काही घडलं त्याचं इत्यंभूत वर्णन शरद पवारांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत (Satish Raut) यांनी आपल्या फेसबुक (Facebook) वॉलवर लिहिलंय.

शरद पवार त्यादिवशी औरंगाबादच्या दौऱ्यावर निघणार असल्याने गोविंदबागेत भल्या सकाळी लगबग चालू होती. तेवढ्यात साहेबांचा इंटरकॅामवरून राऊतांना निरोप आला की मला भेटायला भारत चव्हाण आलेत ते सुद्धा सोबत विमानात औरंगाबादला येतील.

तसं तर विमान लहान असल्याने आणि आधीच त्यात इतर माणसं असल्यामुळे या नवीन पॅसेंजरची सोय कशी करायची या विवंचनेत राऊत पडले. पण साहेबांनी सांगितलंय म्हंटल्यावर जुळवून आणलच पाहिजे म्हणून त्यांनी पायलटला नव्या पॅसेंजरविषयी कळवलं. पुढं भारत चव्हाणांनीही बोलवून घेतलं.

सतीश राऊत भारत चव्हाणांच वर्णन करताना म्हणतात, "माझ्यासमोर मध्यम उंचीचा, कपाळावर गंधाचा लाल टिळा लावलेला, खुरट्या दाढीतून मंद स्मित करणारा एक तरूण हातात जाडजूड बायडिंग केलेलं पुस्तक घेऊन अदबीने उभा राहिला."

राऊतांनी भारत चव्हाणांना कोणत्या भागातून आलाय असं विचारलं. यावर चव्हाण म्हटले, "सर ! मी बॅाटनी मध्ये पीएचडी केलीय. साहेबांना थेसीस कॅापी दाखवायला औरंगाबादहून आलोय."

जाडजूड बायडिंग असलेला तो प्रबंध तात्काळ त्या मुलाने राऊतांच्या हातात ठेवला. राऊतांनीही उत्सुकतेने त्याची पान चाळली. ऊसाच्या बगॅसवर अळिंबीची ( मशरूम ) लागवड कशी करायची याचा हा शोधप्रबंध होता.

ऊसाच्या बगॅसवर होणारा हा अभिनव प्रयोग होता. प्ल्यूरोटस इओस ही अळिंबी 1 किलो बगॅसवर दीड किलो इतके उत्पन्न देते, तेही केवळ पंधरा दिवसात! एका स्क्वेअर फूटात दोन ते अडीच हजार रुपयाची कमाई 15 दिवसात करून देणारा हा प्रयोग उद्या उद्योग म्हणून उभा राहिला तर काय भारी होईल ! हा विचार राऊतांच्या मनात तरळून गेला.

बोलणं चालू असतानाच चव्हाणांनी राऊतांना सांगितलं की, "ही अळिंबी पवार साहेबांना पण माहित आहे आणि मोदी साहेबांना देखील आवडते."

पुढे विमानात बसल्यावर पवार आणि भारत चव्हाण यांच्यात चर्चा रंगली. साहेबांनी भारत यांच्या कुटूंबाची, गावाची विचारपूस केली. भारत अंग चोरून विनम्रतेने सगळे सांगत होते. त्याच्यासाठी हा वन्स इन लाइफटाईम अनुभव होता. हा अनुभव कॅमेऱ्यात कैद करावा म्हणून राऊतांनी दोन चार फोटो घेतले.

पवार साहेबांनी भारतशी चर्चा करताना जवळील काही कागद दाखवले. तो एक रिसर्च पेपर होता अर्जेरिया शरदचंद्रजी (Argyreia sharadchandraji) नावाच्या वेलवर्गीय वनस्पतीसंबंधी.

कोल्हापूरमधील दोन तरुण संशोधक डॉ. विनोद शिंपले व डॉ. प्रमोद लावंड यांनी या वनस्पतीचा शोध लावला. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ही वनस्पती त्यांना प्रथमच आढळलेली. अशा प्रकारच्या वनस्पती फक्त आशियातच आढळतात. या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर दरम्यान फुले येतात आणि डिसेंबरपर्यंत ही वनस्पती फळे देते.

हे दोघे 20 वर्षांपासून या कुळातील वनस्पतींचा अभ्यास करत होते. त्यांनी आतापर्यंत गारवेल कुळातील पाच नव्या प्रजातींचा शोध लावला होता. जगभरात त्यांच्या सशोधनाला मान्यता मिळाली. पण त्यांनी शोधलेल्या वनस्पतींना पवारांच नाव देण्यामागे खास कारण होतं. काही वर्षांपूर्वी आपलं संशोधन पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्यासाठी पवार साहेबांनी मदत केली होती, असं शिंपले यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. म्हणून त्यांनी आपल्या संशोधनाला साहेबांचं नाव देण्याचा निर्णय घेतला होता.

यावर भारतने सांगितलं की, अशाप्रकारे एकूण सहा वेगवेगळ्या वनस्पतींना साहेबांचे नाव देण्यात आलंय. शरद पवारांच्या सार्वजनिक आयुष्यातील कार्यकर्तृवाची संशोधकांनी घेतलेलीही दखल होती. आणि शरद पवार ही संशोधकांची किती दखल घेतात याची प्रचिती भारतला सोबत घेऊन केलेल्या वायू भ्रमणाने आलीच होती!

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com