Singing Stone : गाणारा दगड आणि दगडाचे गाणे

माणसाच्या आजवरच्या वाटचालीत दगडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो माणसाच्या प्रगतिपथात सोबती बनून राहिला. तो जमेल तेवढे साह्य करत राहिला.
Stone Art
Stone ArtAgrowon

गाणारा दगड, हो गाणारा दगड!

 माणसाच्या आजवरच्या वाटचालीत दगडाचे (Importance Of Stone) अनन्यसाधारण महत्त्व आहे. तो माणसाच्या प्रगतिपथात सोबती बनून राहिला. तो जमेल तेवढे साह्य करत राहिला. प्रारंभी माणसाची शिकारीची हत्यारेही (Hunting Weapons) दगडापासूनच बननेली होती. तांबे धातूचा शोधही नदी पात्रातील दगडगोट्यांतून मानवाला लागला असे मानले जाते.

Stone Art
Indian Agriculture : तेणे मुक्ती चारी साधियेल्या...

पुढे माणूस दिवसागणिक, वर्ष आणि शतकागणिक आधुनिक होत राहिला तसा दगडाचा वापरही अधिकाधिक कामासाठी तो करत राहिला. गुहेत राहणाऱ्या माणसाला कालांतराने दगडाचा वापर करून वास्तू उभारण्याची कल्पना सुचली.

त्याने ती वास्तवात आणण्याला सुरुवात केली. जमिनीवर दगडं रोवून त्याने या कामाची सुरुवात केली. आणखी काळ गेल्यावर त्याने दगडाचीच घरे, मंदिरे उभारायला सुरुवात केली. आणखी बराच काळाने चुनखडकाचा शोध लागल्यावर त्याने दगडी चाकाचा घाणा चुना मळणीसाठी तयार केला.

ही सगळी प्रगती होत असतानाच माणसाने दगडाचा आपल्या दैनंदिन जीवनातील वापरही प्रभावीरीत्या वाढवला. धान्य कुटण्यासाठी उखळ, वाटून बारीक करण्यासाठी पाटा-वरवंटा, अन्नाचा ओला भाग साठवण्यासाठी पाळे या त्याने दगडापासून बनवलेल्या वस्तू त्याच्या रोजच्या वापरातील झाल्या होत्या.

हा प्रवास फक्त दगडाच्या वापरातील प्रगती दाखवणाराच होता असे मात्र नाही. या सगळ्या काळात टोळीने राहणारा माणूस ते नाते संबंधाची जाणीव असलेला माणूस इतपत बदल झालेला होता.

Stone Art
Indian Agriculture : नवे वर्ष, नवी उमेद

भटके जीवन स्थिरावण्याच्या वाटचालीत शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रियांचा मोठा वाटा होता. माणूस धान्याचा वापर करू लागल्यानंतर काही काळाने त्याला दगडावर धान्य ठेवून दुसऱ्या दगडाने वरून ठेचले की त्याचा भुगा होतो हे समजले. त्यांनंतर कितीतरी वर्षांनी त्याला दगडी जात्यांची कल्पना सुचली आणि त्याने ती प्रत्यक्षात आणली.

दोन दगडांनी बनलेले घरघर आवाज करणारे जाते गाणारा दगड झाले. त्याच्या घरघरीची आदिम लय मानवी नातेसंबंधांची शब्द वाहिनी ठरली. याच जाते नावाच्या दोन दगडांसाठी स्त्रियांनी कितीतरी गाणी रचली आणि गायली. या गाण्यातून नंतरच्या काळातील लोकजीवन फार सुंदररीत्या व्यक्त झाले.

पूर्वी म्हणजे अगदी तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत खेडेगावात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. त्यामुळे नात्यांचे जाळेदेखील व्यापक असे. आई-वडील, भाऊ-बहिण, कन्या-पुत्र, विहीण-जावई, मामा-मामी, दीर-भाया, नणंद, जावा, सवत अशी एक ना अनेक नाती आणि लेणी, जन्म, मरण, शेती, झाडे-झुडपे, गायी- बैल, सण-समारंभ, देवी-देवता या सर्वांविषयीच्या अनुभवाने नि आठवणीने दाटून आलेल्या भावनांना घरातील स्त्रियांनी गाण्यातून वाट करून दिली. हे होत असतानाच्या काळातच घरातील मोठी, अनुभवी माणसे आपल्या अनुभवाच्या गोष्टी लहान मुलांना सांगत असत. गोष्टी सांगणे हा जणू एक संस्कारच होता.

आज वाढत्या यांत्रिकीकरणाच्या जागतिकीकरणानंतरच्या काळात एकूणच मानवी जगण्यात मोठे बदल झाले आहेत. कामेदेखील कमी शारीरिक श्रमाची आणि सहजतेने करता येतील अशी झाली आहेत. माणसाचे जगणे गतिमान झाले आहे. साहजिकच घरातील मुलांना गोष्टी सांगणारे आणि नाते संबंधाची गाणी गाणारे आवाज आपोआप क्षीण झालेले आहेत.

ते शब्द वैभव आणि अनुभवाचे संचित आजच्या पिढीला माहिती होण्याआधी आटण्याच्या वाटेवर आहे. गाणी गाणे हा माणसाचा स्थायिभाव. मनातील साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा हा सुंदर नि सुगम मार्ग. आजच्या स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी लोकसंचिताची माध्यमे नाहीत. या लेखमालेतून आपल्या लोकसंचिताच्या जाणिवांची फुले अनुभवावयास मिळणार आहेत.

आजच्या घडीला मोबाईलसारखी आधुनिक संपर्क साधने सर्वांच्या हाती आली आहेत. त्यामुळे एक दुसऱ्याशी सहज संपर्क साधू शकतात. पूर्वी प्रत्यक्ष भेटीशिवाय किंवा पत्राशिवाय हे शक्य नव्हते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे चुलत भावंडात देखील सख्खे प्रेम दिसे. जात्यावरील एका गीतात बहिणीने त्याविषयी एकोप्याची भावना व्यक्त केलेली आहे ती अशी :

‘‘चुलत गं भाऊ कसे म्हणू लांब लांब

लाडके गं भाऊ माझे, एका वसरीचे खांब’’

यामागे भावावरील माया तर आहेच, त्याचबरोबर भाऊ म्हणजे तिच्या दृष्टीने तिच्या माहेर आणि सासर यातील तो दुवा आहे. तोच तिला माहेरी न्यायला मुऱ्हाळी म्हणून येणार आहे. त्यामुळे ती त्याला उदंड आयुष्य मागते.

‘‘सरलं दळण सरती होईना शिराळाला

आवूख (आयुष्य) मागते गाडी बैल नि मुऱ्हाळ्याला’’

डॉ. कैलास दौंड, ९८५०६०८६११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com