
Washim Mango News : योग्य व्यवस्थापनातून आंब्याचे एकरी सहा टन उत्पादन घेणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी केले.
करडा कृषी विज्ञान केंद्र व महाकेशर आंबा बागाईतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अतिघन आंबा लागवड तंत्र या विषयावर शुक्रवारी (ता. ६) आनलाईन पद्धतीने मार्गदर्शन कार्यशाळा झाली. यावेळी डॉ. कापसे बोलत होते.
आंब्याला बाजारात विशेष मागणी राहते. या फळ पिकाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने केव्हीकेच्या वतीने आधुनिक पद्धतीने आंबा लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौऱ्याच्या आयोजन गेल्या मागील महिन्यात करण्यात आले होते. याची फलपूर्ती म्हणून शेतकरी मोठ्या पद्धतीत आंबा लागवडीस तयार झाले.
या शेतकऱ्याना आधुनिक लागवड तंत्राची माहिती देण्याच्या हेतूने ऑनलाइन वेबीनार घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाकेशर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष नंदलाल काळे होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कापसे, केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील सहभागी होते. यावेळी केव्हीकेचे प्रमुख डॉ रवींद्र काळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आंबा तज्ज्ञ डॉ. संजय पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी अनिल बोंडे, तहसीलदार रवी काळे, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जयताळे यांचा सहभाग होता.
तांत्रिक सत्रात डॉ. कापसे यांनी शेतकऱ्यांना अतिघन आंबा लागवड तंत्रज्ञानाबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन करताना भारतातील व महाराष्ट्रातील या पिकाची सद्यस्थिती स्पष्ट केली. कमी उत्पादकतेची कारणे मांडत त्यांनी 1.5 x 4 मीटर अंतरावर अतिघन पद्धतीने लागवड करून वळण व छाटणी तंत्र आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यास सहा टन एकरी उत्पादन घेणे सहज शक्य होत असल्याचे स्पष्ट केले.
निवृत्ती पाटील यांनी अतिघन आंबा लागवडीचे अर्थशास्त्र मांडत ग्रामीण युवकांना या माध्यमातून आपल्या गावातच रोजगार उपलब्धी होऊ शकते असे स्पष्ट केले. येत्या हंगामात किमान २५ बागांची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात येईल असे सांगितले.
डॉ. काळे यांनी केव्हीके च्या माध्यमातून शेतकाऱ्याना संपूर्ण तांत्रिक पाठबळ देऊन या पिकाच्या माध्यमातून पीक बदल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असे सांगितले. श्री. तोटावार यांनी शाश्वत पाण्याची उपलब्धता असल्यावरच आंबा लागवडीचे नियोजन करावे व त्यासाठी कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जल संवर्धन व शेततळे करावे असे आवाहन केले.
अनिल बोंडे यांनी विदर्भात आंबा पिकाला मोठा वाव असून लागवडीसोबतच प्रक्रिया व विक्री या बाबींवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मार्गदर्शनात काळे यांनी संघाची भूमिका व कार्यपद्धती मांडली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन गोपाल बोरकर यांनी तर आभार रवींद्र जयताळे यांनी मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.