Solar Energy: शृंगारवाडी गावाचा सौरऊर्जा पॅटर्न

शृंगारवाडी व उचंगी या दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत’ आहे. ऊस (Sugarcane), भात (Paddy), नाचणी ही इथली पारंपरिक पिके. सुमारे १०४८ लोकसंख्या असलेले तसे हे अति पावसाच्या प्रदेशातील गाव.
Shrungarwadi
ShrungarwadiAgrowon

कोल्हापूर जिल्ह्यातील शृंगारवाडी (ता. आजरा) गावाने एकीचे बळ वापरून अनेक विकासकामांना चालना दिली. पाणीसमस्या सोडवली. सौरऊर्जा (Solar Energy) वापराचा आदर्श तयार केला. ग्रामस्वच्छता, शालेय शिक्षण सुविधा यांवरही भर दिला. या सर्व कामांचे फलित म्हणून विविध पातळ्यांवर अनेक सन्मान मिळविलेल्या या गावाने जिल्ह्यात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आजरा तालुक्यातील शृंगारवाडी हे गाव आजऱ्यापासून पाच किलोमीटरवर दक्षिणेस आहे. शृंगारवाडी व उचंगी या दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत’ आहे. ऊस (Sugarcane), भात (Paddy), नाचणी ही इथली पारंपरिक पिके. सुमारे १०४८ लोकसंख्या असलेले तसे हे अति पावसाच्या प्रदेशातील गाव. तरीही पाण्याची पुरेशी सोय नसल्याने विस्थापित होण्याच्या मानसिकतेत इथले गावकरी आले होते. पाच-सहा किलोमीटरवर जाऊन पाणी आणावे लागे. इतरही अनेक समस्या होत्या. पण ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकीतून विकासकामांना चालना मिळाली आणि गाव प्रगतिपथावर आले.

पाणी सुविधा
उचंगी प्रकल्पानजीक गाव आहे. वीस वर्षांपूर्वी ग्रामस्थांना प्रकल्प नजीकच्या डोहातून पाणी आणावे लागत होते. सन १९९९-२००० च्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने गावाजवळ लघू प्रकल्प उभारला. त्याच्या पाझरामुळे विहिरींना पाणी आले. जवळच जॅकवेल उभारणी करण्यात आली. या माध्यमातून पाणी गावातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामपंचायतीने नळपुरवठा केला.

सौरऊर्जा वापराचा ‘पॅटर्न’
शृंगारवाडी ग्रामपंचायतीने विकतच्या विजेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौरऊर्जेचा आधार घेतला. ग्रामपंचायतींसह शाळा व अंगणवाडीचे कामकाजही सौरऊर्जेवर सुरू केले. या तीनही बाबी सौरऊर्जेवर सुरू करणारी शृंगारवाडी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत केवळ ‘इंटरनेट’ जोडणीसाठी महावितरणची वीज घेण्यात येते. अन्य सर्व उपकरणे सौरऊर्जेवर चालवली जातात. जुन्या पद्धतीच्या खराब पथदिव्यांच्या बॅटऱ्यांचा लिलाव करून रक्कम उभारण्यात आली.

त्यातून तसेच चौदाव्या वित्त आयोगातील दहा टक्के प्रशासकीय खर्चातून सौरऊर्जेचे ‘पॅनेल इन्व्हर्टर’ आदी साहित्य खरेदी करण्यात आले. ग्रामपंचायत इमारतीसह पथदिव्यांच्या या प्रयोगातून ‘एलईडी ग्रुप’ची व्यवस्था करण्यात आली. इथून पुढील काळातही अधिकाधिक सौरऊर्जेचाच वापर करण्याचे नियोजन आहे.

शोष खड्ड्यांचा प्रभावी वापर
शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक ठिकाणी सांडपाणी शोषखड्ड्यात मुरवून पाणी प्रदूषणाचा धोका कमी करण्यात आला आहे. दुर्गंधीसह रोगराईचा धोकाही कमी झाला आहे. हा परिसर अति पावसाचा असल्यामुळे बऱ्याच वेळेला शोषखड्डे बुजण्याचा धोका असतो. मात्र सातत्याने दुरुस्ती करून वापरात सातत्य ठेवले आहे. गावातील कचराकुंड्या नीटनेटक्या ठेवल्या असून, गावच्या प्रवेश मार्गावर स्वच्छता करण्यात आली आहे.

Shrungarwadi
GST On Food: केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाचा पाच कोटी व्यवसायिकांना फटका

लोकसहभागातून कामे
विकासकामांसाठी ग्रामस्थांना आवाहन केले जाते. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार ते निधी देतात. त्यामुळे कामांना गती येते. त्यातूनच आतापर्यंत बगीचा दुरुस्ती, मंदिरावरील सोलर पॅनेल, रंगकाम आदी कामे पूर्ण झाली. शाळेतही याच प्रकारे बोलकी चित्रे उद्यान, ‘ओव्हर हेड प्रोजेक्टर’ची सुविधा करण्यात आली आहे.

Shrungarwadi
Crop Insurance: वऱ्हाडात ७८ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

किसान बेल
शेतकऱ्यांना सकाळी व संध्याकाळी सूचना देण्यासाठी तसेच त्यांना कामांचे नियोजन योग्य प्रकारे करता यावे यासाठी किसान बेलची सुविधा तयार करण्यात आली आहे. पहाटे व सायंकाळी साडेपाच या वेळेत स्वयंचलित पद्धतीने ती वाचते.

बोलक्या भिंती बनल्या शिक्षक
कोविड काळात सर्वत्र ऑनलाइन शिक्षण सुरू होते. शृंगारवाडीत मात्र एक अनोखा प्रयोग केला गेला. गावात ज्या ठिकाणी दर्शनी भागात घरे आहेत तेथील भिंतीवर शाळेच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या बाबी रेखाटण्यात आल्या. यासाठी लोकसहभाग व ग्रामपंचायतीची मदत घेण्यात आली.या उपक्रमामुळे विद्यार्थी कायम अभ्यासाच्या प्रवाहात राहिले.

आकर्षक बालोद्यान
गावात विरंगुळ्यासाठी मुलांना खेळण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा नव्हती. ही अडचण दूर करून ग्रामपंचायतीने बालोद्यानात बेंचची व्यवस्था तसेच विविध झाडांची लागवड केली. सातत्याने स्वच्छ, ताजे वातावरण राहील याची काळजी घेतली.

राजकारण विरहित कामे
सौ अंबुताई सुतार या गावच्या लोकनियुक्त सरपंच तर विरोधी गटाचे श्यामराव हरेर हे उपसरपंच आहेत. प्रशासकीय पातळी व लोकसहभागाबरोबर ग्रामपंचायतीतील गट एकत्र काम करीत असल्यानेच गावातील कामे जलदगतीने होण्यास मदत झाली. त्यामुळेच आज ग्रामपंचायतीला सातत्याने विविध पुरस्कार मिळाले आहेत. विकास कामांमध्ये तरुण मंडळे, बचत गट, मुंबईकर ग्रामस्थ मंडळ, माझी विद्यार्थी संघटना, सांप्रदायिक मंडळ व निरंकारी मंडळ आदींचेही योगदान लाभले आहे.

पुरस्कारांनी सन्मान
गावाला गेल्या दहा वर्षांत विविध पातळ्यांवरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील पुरस्कारांचा यात समावेश आहे. निर्मल ग्राम ,महात्मा गांधी तंटामुक्त गाव, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, सामाजिक एकता, स्मार्ट ग्राम, यशवंत ग्रामपंचायत, चाइल्ड फ्रेंडली ग्रामपंचायत, पंडित दीनदयाळ उपाध्याय, पंचायत सशक्तीकरण, सरपंच परिषद मुंबई ,आदर्श ग्रामपंचायत आदर्श सरपंच अशी ही पुरस्कारांची मोठी यादी आहे.

संपर्क ः मुरलीधर कुंभार
ग्रामसेवक : ९८६०९०८४३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com