
Nashik News : वाढत्या तापमानात द्राक्ष व रब्बी हंगामातील (Rabi Season) पिकांना नियमित पाणी द्यावे लागत आहे; मात्र सातत्याने वीजपुरवठा (Electricity Supply) खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, देखभालीअभावी ट्रान्सफॉर्मर (Transformer) जळण्यामुळे शेतकऱ्यांना पिकाना पाणी देता येत नाही.
विजेअभावी शेतीमालाची होरपळ होत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त असताना ‘महावितरण’चे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळत आहेत.
शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता त्यांना शेतीपंपासाठी किमान आठ तास सुरळीत वीजपुरवठा करा; अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा आमदार दिलीप बनकर यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिला.
निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून विजेच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन नाशिक येथे ‘महावितरण’चे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीदरम्यान शेतकऱ्यांना आठ तास वीजपुरवठा होण्यासाठी बनकर यांनी सूचना केल्या.
निफाड तालुक्यातील विजेच्या समस्या दूर करण्यासाठी कृषी आकस्मिक निधी, सुधारित वितरण क्षेत्र, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम व सामान्य सुधारणा विकास प्रणाली अशा विविध योजनांतर्गत फीडर विलगीकरण, नवीन उपकेंद्र प्रस्तावित करणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे, अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविणे, दुरुस्ती करणे, विविध उपकेंद्रांची दुरुस्ती करणे व जोडवाहिनी टाकणे, सिंगल फेज अशी कामे प्रस्तावित असून काही कामे मंजूर आहेत.
मंजूर कामे तत्काळ सुरू करावीत. अनेक कामे अद्याप पूर्ण न झाल्याने तालुक्यातील ग्राहकांना विजेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, तसेच गोदाकाठ परिसरात विजेचा प्रश्न गंभीर असून येथील प्रश्न कायमचा निकाली काढण्यात यावा, अशी मागणी केली.
शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. तारेच्या क्षमतेपेक्षा जास्त लोड होत असल्याने शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. तालुक्यात मंजूर अतिरिक्त रोहित्रांचे कामदेखील मार्गी लावण्यात यावे.
दोन खांबांमधील जास्त अंतर असल्याने शॉर्टसर्किट होऊन पिके जळण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन खांबांमधील अंतर कमी करण्यासाठी अतिरिक्त पोल टाकणे, दिक्षी फीडर लोड जास्त असल्याने दिक्षी गाव व दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे हे गावे स्वतंत्र करणे.
रोहित्र व वीज उपकेंद्र कार्यान्वित करावे. तसेच नैताळे येथे १३२ केव्हीचे उपकेंद्र प्रस्तावित करण्यात यावे, अशी मागणीदेखील आमदार बनकर यांनी केली.
कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी राजाराम डोंगरे, रवींद्र आव्हाड, उपकार्यकारी एकनाथ कापसे, नीलेश नागरे, ओझरचे उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, सुरेश खोडे आदी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.