
Jalgaon Agriculture News : जळगाव जिल्ह्यात यंदा सोयाबीन, मक्याचे क्षेत्र (Soybean, Maize Area) वाढण्याचे संकेत आहेत. यातच गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाण्याचे नियोजन (Soybean Seed management) आतापासून कृषी विभागाने करण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कापसाची लागवड घटणार आहे. कारण कापसाबाबत स्थिती बिकट आहे. जळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक पाच लाख ६७ हजार हेक्टरवर कापसाची लागवड २०२२-२३ मध्ये झाली होती. यंदा कापूस लागवड २० ते २२ हजार हेक्टरने कमी होईल, असा अंदाज आहे. कापसाखालील क्षेत्र सोयाबीन, मका व इतर फळ पिकांखाली जाईल.
सोयाबीनचे जळगाव जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार हेक्टर एवढे आहे. त्यात यंदा १० ते १२ हजार हेक्टरने वाढ होईल. तसेच मक्याखालील क्षेत्रदेखील सहा ते सात हजार हेक्टरने वाढणार आहे. सोयाबीन बियाण्याची टंचाई, महागाई, अशी स्थिती मागील वेळेस होती. ही स्थिती यंदा राहू नये व गुणवत्तापूर्ण बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरातील बियाण्यांवर प्रक्रिया करून त्याची पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. तसेच उन्हाळ सोयाबीनचीदेखील पेरणी जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टरवर झाली होती. यातूनही दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.
सोयाबीन बियाण्यांच्या काही विशिष्ट वाणांची कृत्रीम टंचाई व अधिक मागणीची हवा जिल्ह्यात तयार केली जाते. या प्रकारावर यंदा बंधन, नियंत्रण आणावे, अशी मागणीदेखील केली जात आहे. काही विशिष्ट कंपन्यांचे बियाणे काही वितरकांकडेच असते.
त्याचे वितरण काही तालुक्यातच केले जाते. हा सर्व प्रकार कृत्रीम टंचाई आणि नफेखोरीसाठी केला जातो. शेतकरी यंदा संकटात आहेत. त्यात इतर अडचणी उभ्या होणार नाहीत आणि शेतकऱ्यांची नाडवणूक थांबेल, अशी व्यवस्थादेखील करण्याची गरज आहे.
बियाण्यांचा तुटवडा होऊ नये
जळगाव जिल्ह्यात कापसाची लागवड सर्वाधिक असेल. पण त्यात यंदा घट होईल. त्यापाठोपाठ तृणधान्य, कडधान्याची पेरणी केली जाईल. अनेक शेतकरी सूर्यफुलाची पेरणीदेखील करतील. सूर्यफुलाचे बियाणे रब्बीत मुबलक होते. ते खरिपातही मुबलक असेल.
कारण सूर्यफुलाची पेरणी रब्बीत बऱ्यापैकी झाली होती. मका बियाण्यातही काही वाणांचा किंवा काही कंपन्यांच्या बियाण्याचा तुटवडा तयार केला जातो. हा तुटवडा यंदा तयार होणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.