सोयाबीन वाण वास्तविकता आणि विपर्यास

त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन वाणाचा बियाण्यासाठी थोडा धीर धरणे आवश्यक आहे. मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे या वाणाचा झालेला अपप्रचार आणि पसरलेल्या अफवा. दुप्पट उत्पादन देणारे वाण अशा जाहिराती You Tube वरती जास्त लाईक मिळावे म्हणून केल्या आहेत.
सोयाबीन वाण वास्तविकता आणि विपर्यास
Soybean SeedsAgrowon

सोयाबीन पीक हे अतिशय महत्त्वाचे व नगदी पीक म्हणून महाराष्ट्रात घेतले जाते. त्यामुळे शेतकरी जागरूक होऊन नवीन तंत्रज्ञान तसेच वाणांचा वापर करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करीत असतात, ही एक शेतीसाठी चांगली गोष्ट आहे. गेली १५-२० वर्षे महाराष्ट्र तसेच देशात सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत आहे. अगदी मागील दोन-तीन वर्षे सोडले तर, प्रामुख्याने जेएस-३३५ वाणाचे क्षेत्र बघितले तर ९० टक्के व त्यापेक्षा जास्त होते, हा एकच वाण मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जात होता.

सोयाबीन पीक संशोधन संस्था तसेच कृषी विद्यापीठे यांनी मागील सात-आठ वर्षांत अनेक अधिक उत्पादन देणारे वाण शोधले. त्यानंतर हळूहळू नवीन वाण शेतकरी लागवड करू लागले. त्यात प्रामुख्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे सोयाबीन ब्रीडर डॉ. मिलिंद देशमुख यांचे फुले संगम हे वाण क्रांतिकारी ठरले. त्यानंतर फुले किमया, तसेच पीकेव्ही अंबा, एमएयुएस-६१२ ही वाणं सुद्धा शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलीत. गेल्या दोन वर्षापासून शेतकरी नवीन वाण पेरू लागले आहेत व उत्पादनात वाढ सुद्धा झाली आहे. परंतु हे सर्व होत असताना यातून काही वेगळ्या गोष्टी घडू लागल्या आहेत, ते म्हणजे बियाण्याचा व्यापार. अर्थात जास्त उत्पादन देणारे वाण असा प्रचार करून त्या वाणाचे बियाणे महागात विकले जात आहे.

केडीएस - ९९२ हे वाण सध्या खूप चर्चेत आहे, कोणीही त्याचे बियाणे पाहिजेत म्हणतो, कितीही भाव असेल तरी खरेदी करू असे शेतकरी बोलतात. काही लोकांनी तर ३०० ते ६०० रुपये किलो प्रमाणे या वाणाचे बियाणे विक्री केली, असे माझ्या निदर्शनास आले आहे. परंतु ते लोक देत असलेले बियाणे हे खरंच केडीएस - ९९२ चे आहे का, किंवा त्यांच्याकडे ते बियाणे कसे आले, याची शहानिशा केल्याशिवाय शेतकऱ्यांनी ते बियाणे खरेदी करणे कितपत योग्य आहे. कोणतेही वाण विकसित झाले की त्याला बियाणे साखळीमध्ये यायला कमीत कमी तीन वर्षे तरी लागतात. आणि त्याचे नोटिफिकेशन झाल्याशिवाय बियाणे साखळीमध्ये येत नाही किंवा आणता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन वाणाचा बियाण्यासाठी थोडा धीर धरणे आवश्यक आहे. मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे या वाणाचा झालेला अपप्रचार आणि पसरलेल्या अफवा. दुप्पट उत्पादन देणारे वाण अशा जाहिराती You Tube वरती जास्त लाईक मिळावे म्हणून केल्या आहेत.

त्यामुळे शेतकरी केडीएस -९९२ च्या मागे लागले आहेत व अक्षरशः ५०० रुपये किलो प्रमाणे बियाणे खरेदी करत आहेत, ते सुद्धा खोटे आहे की खरे हे माहीत नाही. कोणतेही वाण विकसित होते त्याचे उत्पादन चांगले असतेच किंवा ते रोग प्रतिकारक असते, परंतु डबल उत्पादन देणारे वाण असे सांगणे कितपत योग्य आहे. यात काही वास्तविकता तरी आहे का, शक्य आहे का दुप्पट उत्पादन मिळणे? याचा विचार झाला पाहिजे. ठीक आहे १०-२० टक्के उत्पादन वाढ असेल आणि रोग प्रतिकारक असेल याचा अर्थ फुले संगम आणि फुले किमया यांचे पेक्षा दुप्पट उत्पादन मिळेल असा होत नाही. याठिकाणी आपण अफवांना बळी पडू नये.

राहुरी कृषी विद्यापीठाचे फुले संगम, फुले किमया तसेच परभणी चे एमएयुएस-६१२, पीकेव्ही अंबा हे मागील २-३ वर्षात आलेले अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण आहेत. त्यामुळे यांची निवड करा उगाच जास्तीचे पैसे मोजून खात्री नसलेलं बियाणे का खरेदी करायचे, या वर्षी नाहीतर पुढील वर्षी नक्कीच आपल्याला बियाणे मिळेलच ना! वाण विकसित झाल्यानंतर नोटिफिकेशन त्यानंतर सुरुवातीला मूलभूत बियाणे आणि मग पैदासकार बियाणे हे फक्त विद्यापीठात काटेकोर पद्धतीने मुख्य ब्रीडरच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. त्यानंतर जर वाण नोटिफिकेशन झालेला असेल तर बियाणे साखळी मध्ये येतो किंवा आणता येतो. त्यानंतर विद्यापीठ महाबीज किंवा इतर संस्था यांना पैदासकार बियाणे देते.

त्यापासून पायाभूत बियाणे व त्यानंतर प्रमाणित बियाणे तयार होते. अशा प्रमाणे शेतकरी वर्गापर्यंत बियाणे येण्यासाठी कमीतकमी तीन वर्ष तरी लागतात, त्यामुळे आपल्या केडीएस- ९९२ या वाणाचे नोटिफिकेशन हे २०२१ ला झाले म्हणजे फक्त एक वर्ष झालेले आहे. त्यामुळे या वर्षी बियाणे मिळणे कसे शक्य आहे, याचा विचार आपण करावा, सर्व गोष्टी व्यवस्थित व प्रमाणीकरणानेच होत असतात, यात कुठेही शॉर्टकट नाही. राहिला मुद्दा तो वास्तविकतेचा, तर कोणतेही वाण विकसित झाले तरी डबल उत्पादन मिळणे शक्य नाही त्यामुळे हा संभ्रम दूर करा, उत्पादन हे फुले संगम आणि फुले किमया या वाणांचे सुद्धा अतिशय चांगले आहे. त्यामुळे उगाच खात्री नसलेले बियाणे वाजवी दरात खरेदी करून आपली फसवणूक करून घेऊ नका व दुसऱ्यांची सुद्धा करू नका.

- डॉ. अनंत इंगळे, विदर्भ शेती विकास संस्था चिखली बुलडाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com