मत्स्यनारायणाची कथा

लट्टालूर (लातूर) नामक आटपाट नगरीत सहा-सात वर्षांपूर्वी न्यायासनावर एका सत्यवचनी, न्यायप्रिय आणि उदारमनस्क हुजूरमहोदयांची नेमणूक झाली.
Story
Story Agrowon

लट्टालूर (लातूर) नामक आटपाट नगरीत सहा-सात वर्षांपूर्वी न्यायासनावर एका सत्यवचनी, न्यायप्रिय आणि उदारमनस्क हुजूरमहोदयांची नेमणूक झाली. सदरहू न्यायाधीश महाराज बहुत हर्षाने या नगरीत रूजू झाले. परंतु त्यांचे समोर नमनालाच एक यक्षप्रश्न उभा राहिला.

Story
Agri Business : ‘ॲग्री बिझनेस’ कौशल्य विकसित करणारा अभ्यासक्रम ः डॉ. कौसडीकर

त्यांची उभी हयात मुंबई, रत्नाग्री आणि तत्सम किनारपट्टीच्या प्रदेशात व्यतीत झाल्या कारणाने मासोळीशिवाय रोजचा अन्य काही आहार असतो याची त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती. जसे आपण दररोज श्वास घेतो अथवा जल प्राशन करतो त्यात आपल्याला विशेष काही केल्याचे वाटत नाही तद्वतच त्यांच्या लेखी रोजच्या आहारात मासोळींचा समावेश असे.

लट्टालूर ग्रामात मात्र ना कोणता समुद्र ना कोणता मोठ्ठा तलाव. एक मोठे तळे आहे गावात पण त्याच्या काठावर महादेवाचं मंदीर. लट्टालूर ग्रामात वारकरी संप्रदाय आणि आर्य समाजाचे प्रस्थ फार. शिवाय लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय. त्यामुळे या देशी वशाट खाण्याचे वळण तसे कमीच. तसे मुसलमानही संख्येने जास्त असल्याने मटन उत्तम मिळते. पण न्यायाधीश मजकुरांना ते खाट-खूट काही पचनी पडत नसे.

Story
Bhima Sugar Election : भीमा’ वर महाडिकांचेच वर्चस्व

त्यांच्या जिभेचे वळणच नव्हते ते. त्यामुळे न्यायमूर्तींच्या रोजच्या थाळ्याची मोठी गहनच मुसीबत पैदा झाली. जेवणात मासे नाहीत मग ही आषाढी किती दिवस सहन करायची. थाळीतला घास-फुस बघून त्यांना भोजनाची वासनाच राहती ना. चांगलीच उपासमार सुरू झाली. सकाळी झाड्याचीही पंचाईत होऊन बसली.

पोटात दुध आणि पाण्याशिवाय काही ठरत नसल्याकारणाने मग प्रातः(काली) कसला विधी न् कसला न्याय. पाण्याबाहेर काढली की मासोळी जशी तडफडते तैसे न्यायाधीश महोदय ताटात मासोळी नाही म्हणून तळमळो लागले. त्यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी मासाच दिसो लागला.

न्यायासनावर जड अंतःकरणाने बसावे तो समोरच्या आरोपी, वकील, मुन्सफ, पट्टेवाला, कारकून यांच्या चेह-याच्या जागी त्यांना माशांचे चेहरे दिसोनी यावेत. डोळे चोळून चोळून डोळ्यांच्या मुंग्या व्हायची वेळ आली पण माशांची तोंडे काही हटेनात. कामात लक्ष लागेना. यावर काही जालीम उपाय केला नाही तर आपले या नगरीत तगणे काही होत नाही, या विचाराने त्यांची रात्रीची झोप उडाली.

अखेर बहुत विचार करोन त्यांनी आगीनगाडीची समयसारिणी मागवून घेतली. मोबाईल नामक कर्णपिशाच्चाचे थोडेबहुत साहाय्य घेतले आणि एक योजना आखली. हापिसातल्या एका शिपायाला बोलावण धाडलं. तो तातडीने हजर झाला. त्याला त्यांनी आपबिती सांगितली व त्यावर पुढील उपाययोजना सांगितली- तू रोज प्रातःकाळी लातूरहून सोलापूरला जावे. साडे तीन-चार तासाची वाट आहे. सकाळी मुंबैहून निघणारी मुंबै-हैदराबाद ही आगीनगाडी सोलापूरला दुपारी पोहोचते.

त्या गाडीने माणसांबरोबर दररोज मासेही हैदराबादी पोहोचवले जातात. सोलापूरला त्यातला काही माल उतरतो. तेव्हा तू तिथून मासे खरेदी करावे आणि लगेच उलट पावली लातूरला पोहोचावे. संध्याकाळी साडे चार-पाच पर्यंत बंगल्यावर मासे पोहोचतील असे बघावे. उद्यापासून तुझी हीच ड्युटी. हापिसातले काम करायची जरूर नाही. सोलापूर रेल्वेस्थानक आणि माझा बंगला हेच तुझे उद्यापासून हापिस.

माझी दोन वेळची जेवणाची भ्रांत मिटवायची हीच एक तरकीब आहे, तर माझ्यासाठी ही तोशीस तू सहन करशील का? तुझ्या सेवेचे मी सदैव स्मरण ठेवेन. हे ऐकल्याबरोबर न्यायाधीश महोदयांच्या तकलीफीने आपले मन द्रवल्याचे त्या शिपायाने दाखवले. साहेब जरी विनवणीच्या भाषेत बोलत असले तरी त्यांची विनंती म्हणजे आदेशच आहे हे त्याला इतकी वर्षे सरकारी नोकरीत (चकाट्या पिटत) घालवल्यामुळे लक्षात यायला काहीच उशीर लागला नाही.

शिवाय रोज लातूर-सोलापूर उंडारायचे, हापिसातल्या कमाचे लचांड नाही या विचाराने तो हरखूनही गेला. त्यामुळे त्याने लगोलग साहेबांना उद्यापासूनच मोहीम सुरू करतो असा मनसुबा सांगितला. आणि मग रूटीन नीटच बसून गेले. स्वामींच्या चरणी शिपायाची सेवा रोजच्या रोज न चुकता रूजू होऊ लागली. मुंबईचे मासे व्हाया सोलापूर साहेंबांच्या बंगल्यावर पोहोचू लागले. साहेबांच्या थाळीत रोजच माशांचे कालवण, तळलेला मासा दिसो लागले.

पोटाची खळगी नीट भरो लागली. न्यायाधीश महोदय प्रसन्नचित झाले. कोर्टात आरोपाच्या जागी आरोपीचेच, वकीलांच्या जागी वकीलांचेच, साक्षीदाराच्या जागी साक्षीदाराचेच, मुन्सफ, कारकून, शिपायांच्या जागी मुन्सफ, कारकून, शिपायांचेच चेहरे दिसो लागले. साक्षी-पुराव्यात मन रमो लागले. मनीमानसी हर्ष दाटून आला.

Story
Fodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन

सगळे सुरळीत चालू असता कधी कधी मोठी गंमतही घडे. एकदा साहेबमजकुरांचे एक पाहुणे वस्तीला होते. त्यांच्यासाठी खास बेत करायचे ठरले होते. शिपाई सोलापूरला पोहोचला पण घात झाला. आगीनगाडी चार तास लेट होती. त्याने साहेबांना कळवले. पण साहेबांनी निमिषार्धात त्याला सांगितले की कितीही वेळ झाला तरी चालेल पण मोहीम फत्ते करूनच ये. आज तर पंक्तीला पाहुणे आहेत. पोटाच्या खळगीचाच नव्हे तर इभ्रतीचाही सवाल आहे.

सूर्य मावळला, अंधार गडद झाला तरी शिपायाचा पत्ता नाही. साहेब दिवाणखान्यात पाहुण्यांबरोबर कायद्याचा आणि गाजरांचा किस काढत बसले. पाहुणेही डोळ्यांतली झोप आवरत गाजराचा किस चघळत वेळ काढत राहिले. रात्र चढू लागली पण प्रतीक्षा काही संपेना तसे साहेब अस्वस्थ होऊ लागले.

फोनवर फोन सुरू. शेवटी रात्री सव्वा दहा वाजता बंगल्याच्या गेटची कडी वाजली. त्याआधीच स्वर्गीय वास वायुवेगाने आत येऊन पोहोचला होता. साहेबांनी गाजराचे ताट भिरकावून दिले आणि तटकन् उभे राहिले. हातात पिशवी घेऊन समोर शिपाई उभा. आहाहा जणू पुंडलिका भेटी परब्रह्म आले. पिशवीवर झडप घातली, मोगरा हुंगावा तशी लांबूनच हुंगली आणि क्षणातच मुदपाकखान्यात रवाना केली. पुढच्या पाऊण तासांत ताटं तयार असल्याची वर्दी मिळाली. मग सगळ्यांनी आडवा हात मारला. झाकपाक करून नीजानीज व्हायला दिड वाजला. अशा एकेक हकीकती.

Story
Rabbi Sowing : रब्बी पेरणी का पडतेय लांबणीवर ? | ॲग्रोवन

अशाच रीतीने पळांमागून पळे, दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने जात राहिले. माशांचा रतीब अव्याहत चालूच राहिला. असे करता करता साहेबांचा तीन-साडेतीन वर्षांचा कार्यकाळ संपत आला. एके दिवशी त्यांच्या बदलीचा हुकूम प्राप्त झाला. साहेब बाड-बिस्तारा गुंडाळून पुढच्या मुक्कामाला निघायची तयारी सुरू झाली.

पण साहेब न्यायबुध्दीचे. न्याय करायला विसरले नाहीत. त्या शिपायाने ज्या मनोभावे परमेश्वराच्या पहिल्या (मत्स्य) अवताराची सेवा केली, त्याचे त्याला यथोचित फळ मिळाले. साहेबांनी त्याच्या सेवेचे चीजच जणू प्रमोशन नामे एक भलेथोरले पारितोषिक बहाल केले. शिपाई आता क्लर्क बनून हापिसात टेबलामागे बसो लागला. साता उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण. बोला मत्स्यनारायण महाराज की जय...!

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com