स्वतःच्या सोबत राहा

मैत्र जिवाचे या व्याख्येत बसणारे, आपल्याला अंतर्बाह्य ओळखणारे, वेळ पडेल तेव्हा मदतीचा हात देणारे, शब्दांनी दिलासा देणारे मित्र माणसाला हवे असतात.
मशागत लेख
मशागत लेखAgrowon

मैत्र जिवाचे या व्याख्येत बसणारे, आपल्याला अंतर्बाह्य ओळखणारे, वेळ पडेल तेव्हा मदतीचा हात देणारे, शब्दांनी दिलासा देणारे मित्र माणसाला हवे असतात. भरपूर नातेवाईक असले तरीही त्यापलीकडे जाऊन काही नाती तयार होतात. रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट होतात. देण्याघेण्यावर आधारित नाती व्यवहार संपला की नामशेष होतात. विचारांनी भावनांनी जोडलेली नाती विश्‍वास संपला की संपुष्टात येतात. मग प्रश्‍न पडतो, स्नेह खरंच माणसाशी जुळतो का? की त्याच्याजवळ असलेल्या पैसा, सत्ता, अधिकार, वलय, कीर्ती, सौंदर्य यांच्याशी जुळतो? जसे पानगळ झाली की पाखरे उडून जातात. झाड खिन्न, एकाकी होते. ऋतू बदलतो, पालवी फुटते, फळे लागतात, ते पुन्हा गजबजून जाते. हा निसर्गाचाच नियम आहे. मग याला माणसे तरी अपवाद कसे असतील? माणसाची नजर सतत चांगल्या पर्यायाच्या शोधात असते. विश्वासाची बिलोरी काच तुटते, ती जखमा करते. हे कधीतरी घडतेच,

कधीतरी प्रतिकूलता वाट्याला येतेच. सर्वतोपरी प्रयत्न करूनही अपयश मानगुटीवर बसतेच. कितीही काळजी घेतली तरी कुणीतरी दुखावले जातेच. पांढऱ्या कागदावरचा केवळ एकच गडद ठिपका उरलेल्या धवलतेला धूसर करतो. दूर जाणाऱ्या पावलांचे ठसे उमटत राहतात. त्या खळग्यांमध्ये गैरसमजाचे गढूळ पाणी साचून राहते. कठोर शब्दांचे घाव फोडून काढतात आस्थेचं कवच. एकाकीपणाच्या भोवऱ्यात तनमन भोवंडून जातं.

कुणाजवळ व्यक्त व्हावं अशी विश्‍वासाची जागाही सापडत नाही. ही घुसमट कुठल्याही थराला घेऊन जाऊ शकते. म्हणूनच स्वतःच्या सोबत राहता यायला हवं.

इंशा अल्लाह खान इंशा म्हणतात

‘अजीब लुत्फ़ कुछ आपस की छेड़-छाड़ में है

कहाँ मिलाप में वो बात जो बिगाड़ में है’

दुराव्याला लोक दोष का देतात त्याचे तर फायदेच आहेत. कधी कधी जवळ असून, माणूस कळत नाही तर दूर गेल्यावर तो अधिक चांगला कळतो. दूर गेल्यानंतर जसं एखाद्याशी उगाच वाईट वागलो असं वाटतं, तसंच एखाद्या माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं गेलं असं ही वाटून जातं. नाती आणि माणसे नेमकी समजून घेण्यासाठी दुरावा गरजेचाच आहे. एकटेपणाला आनंददायी एकांताचं रूप देता यायला हवं. आत्मसन्मान ढळू न देता आपल्या चुकांचे चिंतन करून त्या सुधारण्याच्या वाटेवर स्वतःला हात धरून घेऊन जावे. प्रत्येकजण आपापल्या जागेवर बरोबर असतो या न्यायाने समोरच्याला माफ करावं. ‘अत्त दीप भव’ ही बुद्धांची शांततेची पाऊलवाट कधीच पथभ्रष्ट करणार नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com