Kulbhushan Birnale : सगळीच माणसं वाईट नसतात!

गावकुसाच्या बाहेर वस्तीतील एका जीर्ण मोडकळीस आलेल्या घरात शेतमजुरीवर कशीबशी तरलेली सत्तरीतली रुक्कु म्हातारी आपल्या दहा वर्षाच्या नाती सोबत राहायची. तसं तिचं खरं नाव रुक्मिणी पण सगळ्यांसाठी ती रुक्कु.
Village
Village Agrowon

- कुलभूषण बिरनाळे

"रुक्कु म्हातारीच्या घरात साप आलाय, लवकर या पकडायला." रात्री ८ वाजता फोन आला. गावकुसाच्या (village) बाहेर वस्तीतील एका जीर्ण मोडकळीस आलेल्या घरात शेतमजुरीवर कशीबशी तरलेली सत्तरीतली रुक्कु म्हातारी आपल्या दहा वर्षाच्या नाती सोबत राहायची. तसं तिचं खरं नाव रुक्मिणी पण सगळ्यांसाठी ती रुक्कु.

रुक्कुचा एक मुलगा शहरात रोजगारासाठी कायमचा गाव सोडून गेलाय तर दुसरा मुलगा गेलाय कायमचंच हे जग सोडून. त्याचीच ही लेक. रुक्कु शेतावर मजुरीसाठी जाते तेंव्हा तिची नात शाळेत जाते किंवा घरात, गल्लीत खेळत असते. या अवघड आयुष्यात दोघींना आधार आहे तो एकमेकींचाच. आणि या नाजूक आधारावरच एक साप संकट रुपात प्रकटलाय.

Village
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

मी पोहोचलो तेव्हा रुक्कुच्या दारासमोर पन्नास एक बघ्यांची गर्दी उभी होती. "चार दिवस झालं साप घरातच वस्तीला हाय बघा.""नाग हाय नाग. न्हाई घोणस हाय. एकदम विषारी.""तुमी यायलाय म्हणून आमी थांबलो, न्हाई तर त्याला अज्याबात ढिल्ला सोडलो नसतो.""जिवंत सापडतंय काय बघा, न्हाई तर सरळ खलास करून टाका."

बघ्यांच्या सूचना आणि अनाहूत सल्ले !

सर्वात आधी या सगळ्यांना तिथून लांब पांगवलं. घराच्या आत जायला दार उघडलं तशी रुक्कु म्हातारी माझ्याजवळ आली आणि माझ्या हाताला धरून म्हणाली, " बाळा, चार दिस झालं त्यो घरात हाय पर दिसत न्हाई. निस्ता जोरात भुसगोडतोय.

Village
मार्केट इंटेलिजन्स आणि रिस्क कमिटी ः हीच ती वेळ, हाच तो क्षण...

त्याच्या आवाजानं लई भ्याव वाटतया. माजं काय न्हाई पर नातीची लई काळजी वाटतीया. पर काय बी झालं तरी त्या सापाला मारू नको बग बाळा. त्यो शंकर म्हादेवाचा लाडका हाय. त्यो हितंच ऱ्हानार म्हंटला तर ऱ्हाऊ दे. आमी दोगी जातो तक्क्यात (समाजमंदिरात) ऱ्हायाला."

आयुष्यातले सगळे सहारे गमावून केवळ एका प्राण्यासाठी उरलासुरला शेवटचा सहारा सुद्धा सहज सोडायची तयारी दाखवणाऱ्या रुक्कु म्हातारीला काय उत्तर द्यायचं हेच मला कळेना.तिला बाजूच्या कट्टयावर बसवून घराच्या आत गेलो आणि दार बंद करून घेतलं.

कळकट अंधुक बल्बच्या प्रकाशात फार काही स्पष्ट दिसत नव्हतं. त्यातून कोपऱ्यात चूल, काही भांडीकुंडी, दोरीवरचे कपडे आणि एक लोखंडी पलंग सोडता सर्वत्र केवळ अडगळीचं साहित्य आणि सरपण दिसत होतं. तेवढ्यात कोपऱ्यातील एका अडगळीतून जोराचा फुत्कार ऐकू आला. नाग आहे याची खात्री झाली.

आवाजाच्या दिशेने जाऊन डोक्याला लावलेल्या बॅटरीच्या उजेडात तिथलं सरपण दूर केलं तसं एका कोपऱ्यात वेटोळा घालून बसलेला नाग फणा काढून फुत्कारला. खूपच आक्रमक दिसत होता. जवळ जाताच तो चवताळून हातातील स्टिकवर दंश करू लागला. या बघ्या लोकांनी त्याला डिवचला असणार असं मला वाटलं.

त्याला शांत करायला मी तिथून मागे सरकलो आणि पलंगावर बसून राहिलो. पण तो जास्तच फुत्कारायला लागला. त्या अंधाऱ्या खोलीत अशा भीषण शांततेत त्याचा फुत्कार अजूनच भीतीदायक वाटू लागला.वाट पाहून मी परत गेलो तर अजून त्याचा तोरा तसाच होता. मी गोंधळलो. त्याला हुकात पकडायचे माझे सर्व प्रयत्न असफल होत होते.

Village
Crop Insurance: विम्या कंपन्याच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका : राहुल गांधी

मग त्याच्या भोवतीचा पाचोळा साफ करून जागा मोकळी करायला लागलो. तेवढ्यात त्या पाचोळ्यात एक पांढरी वस्तू चमकली. बॅटरीचा फोकस तीव्र करून त्यावर प्रकाश पाडला. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की तिथे अजून अशा बऱ्याच पांढऱ्या वस्तू आहेत. ती सापाची अंडी होती . म्हणजे ही नागीण आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी नैसर्गिक वृत्तीनुसार आक्रमक झाली होती तर!

आता माझ्या हे लक्षात आलं की माझं काम अजूनही अवघड झालं आहे .नागीण चवताळून माझ्या अंगावर यायचा प्रयत्न करतच होती.मी पुन्हा तिथून मागे सरकलो. पुढचा काही मार्गच दिसत नव्हता.कुठल्याही प्राण्यांशी जुळवून घ्यायचं असेल तर त्याच्याशी आपला सलग दृष्टीसंपर्क झाला पाहिजे किंवा त्याला स्पर्श करता आला पाहिजे किंवा आपण बोललेलं त्याला ऐकू गेलं पाहिजे.या तिन्हींपैकी कुठलाच पर्याय या प्रसंगात या प्राण्याच्या बाबतीत अजिबात शक्य नव्हता.

Village
Agri Business : ‘ॲग्री बिझनेस’ कौशल्य विकसित करणारा अभ्यासक्रम ः डॉ. कौसडीकर

मग काय मार्ग असतो अशा वेळी ?एकमेव मार्ग कुठल्याही दोन सजीवांच्यात जोडला जाऊ शकणारा, जो स्पर्श- संवाद- दृष्टी संपर्काच्याही पुढचा, खरं तर त्याहून कित्येक पटीने प्रभावी असणारा आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक सजीवात निसर्गदत्त उपजत असणारा हा दैवी ठेवा - शुद्ध चेतना !

मी अगदी मनापासून त्या नागिणीतल्या मातृत्वाच्या चेतनेला मौनातून हाक दिली. "बाई, तुला आता असंच सोडून गेलो तर उद्या तुझी पिल्लं घरभर पसरणार. त्यांच्या रक्षणासाठी मग तू त्या असहाय म्हातारीला किंवा तिच्या निष्पाप नातीला संपवणार. या दोघी अनाथांना अजून किती अनाथ करणार तू ?आणि जर का मी तुला तुझ्या मनाविरुद्ध पकडायला गेलो तर तुझ्या पिलांच्या जीवाचं बरं वाईट होईल.

त्यातून तू माझ्या जीवाचं बरं वाईट करणार. मग माझ्या पिलांचं काय होणार ?या घराबाहेर अस्वस्थतेने वाट बघणारी क्रुद्ध जनता तुझ्या जिवावरच टपली आहे. मग तुझ्या पिलांना हे जग पहायच्या आधीच अनाथ करून जाणार का तू ?आपल्या सगळ्यांचा हा सर्वनाश कशासाठी ?तू तर आई आहेस. त्या म्हातारीनं आपल्या पोटची लेकरं तर गमावली आहेतच.

Village
Indian Farmer : कष्टाळू शेतकरी देशाचा हिरो

केवळ एका कोवळ्या नातीच्या प्रेमापोटी आपलं उरलेलं दुर्दैवी गरिबीचं आयुष्य कसंबसं सारती आहे. तुझ्या जिवाच्या सुरक्षेसाठी ती म्हातारी हे तिचं हक्काचं घर सुद्धा सोडायला सहज तयार झाली. बाईपणाचं दुःख त्या म्हातारीला कळतं तसं ते तुला पण नक्कीच कळत असणार !तू माणसांच्या वस्तीत चुकून आलीस. खरी चूक आमचीच आहे. आम्हां सगळ्या निर्दयी माणसांची.

ही चूक दुरुस्त करायची मला एक संधी दे बाई.तू सहकार्य कर. तुला तुझ्या पिल्लांसकट सुरक्षित ठिकाणी निवारा मिळवून देतो. याचं मी तुला वचन देतो."बराच वेळ अशाच भयाण शांततेत निघून गेला.मी तिच्याकडे पहात नि:शब्द शांत उभा होतो.थोड्यावेळाने ती नागीण सुद्धा शांत झाली.

मग तिने आपल्या शरीराचा अंड्यांभोवतीचा वेटोळा सोडला आणि ती सरळ झाली. तिथून थोडं पुढं सरपटत जाऊन सरपणावर निपचित पडून राहिली.मला तो संकेत समजला.मी तिचे मनापासून आभार मानले.मग तिला अलगद हुकात पकडून बरणीत बंद केलं.एका बादलीत कापड टाकून तिची अंडी हळुवारपणे त्यात ठेवून दिली.

एव्हाना रात्रीचा अंधार घनगर्द झाला होता. इतक्या रात्री नागिणीला बाहेरच्या मोकळ्या जगात सोडणं तिच्यासाठीही आणि मनुष्यवस्तीसाठीही धोकादायक ठरलं असतं. कदाचित हाच सगळा किस्सा पुन्हा घडला असता. त्यामुळे त्यांना माझ्या घरी घेऊन जाणं क्रमप्राप्त होतं.

Village
Onion Rate : कांदा दरात सुधारणा

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या शेताजवळील माळरानात बऱ्याच वर्षापासून एक ढासळलेलं निर्मनुष्य शेतघर होतं तिथं गेलो. त्यातल्या एका अडगळीतल्या कोपऱ्यात सांदीला पोतं अंथरून त्यावर पालापाचोळा रचला. फडक्यात गुंडाळलेली अंडी हळुवारपणे काढून त्यात पहिल्यासारखी रचून ठेवली.

मग अल्लाद बरणीतून मोकळी सोडलेली नागिण चपळाईने त्या अंड्यांवर जाऊन बसली. आपल्या लकाकत्या अंगाचं घट्ट वेटोळं करून तिने अंड्यांना अंगाखाली झाकून घेतलं.एक वर्तुळ यशस्वीरित्या पूर्ण झालं होतं, विनाश टाळून सर्वांनाच सुखरूप ठेवणारं !

मी नागिणीकडे डोळे भरून पाहिलं. ती आता फुत्कारत नव्हती की हलतही नव्हती. जणू काही तृप्त झाल्यागत शांतपणे बसून होती ती! मग तिला मोठ्या आवाजात हात जोडून, "बाई, कृपा करून पुन्हा आम्हा माणसांच्या वस्तीत येऊ नकोस." म्हणत समाधानाने तिचा निरोप घेतला आणि शेताचा रस्ता धरला.

नुकत्याच कळ्या फुटलेल्या रोपांना स्पर्श करत हिरव्यागार रानातून चालतांना माझ्या मनात विचार आला.उद्या त्या अंड्यातून पिलं जन्म घेतील. या जगाकडे कुतूहलाने पाहायला लागतील. भोवतालच्या सजीव निर्जीवांबद्दल स्वतः आकलन करू पाहतील.आणि पहिल्यांदा जेंव्हा त्यांना माणूस दिसेल तेव्हा ते आपल्या आईला विचारतील तेंव्हा ती आम्हां माणसांबद्दल त्यांना काय बरं सांगेल ?

पण सापांना तर स्मरणशक्तीच नसते.ती रुक्कु म्हातारी, तिची नात, मी आणि तो जमाव यातलं आता कोणीच आठवणार नाही तिला.मग ?तेंव्हा ती नागीण तिच्या चेतनेला हाक देईल, जी माणसांच्यातल्या चेतनेपेक्षा कित्तेक पटीने तीक्ष्ण आहे आणि महत्वाचं म्हणजे शुद्ध आहे !त्याला स्मरून ती सांगेल..."बाळांनो, आपल्यातल्या अविश्वासातून, भीतीतून किंवा रागातून केवळ विनाशच घडतो.तो टाळन्यासाठी विश्वासाला, प्रेमाला संधी द्या.एकदा नाही, हजारदा द्या.कारण सगळीच माणसं वाईट नसतात !"

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com