Women's In Agriculture : मावळातील आधुनिक हिरकणी सगाबाई

Women's Empowerment : लग्नानंतर दोन वर्षांत घरधन्याचे अकाली निधन झालेले, समोर एक-दीड एकराची उजाड शेती, झोपडीतील दाणापाणी संपलेला आणि अंगावर दीड वर्षाचा तान्हा मुलगा अशी भयावह स्थिती असताना मावळातील ही आधुनिक हिरकणी डगमगली नाही.
Womans In Agriculture
Womans In AgricultureAgrowon

मनोज कापडे ः अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः लग्नानंतर दोन वर्षांत घरधन्याचे अकाली निधन झालेले, समोर एक-दीड एकराची उजाड शेती, झोपडीतील दाणापाणी संपलेला आणि अंगावर दीड वर्षाचा तान्हा मुलगा अशी भयावह स्थिती असताना मावळातील ही आधुनिक हिरकणी डगमगली नाही.

जगण्यासाठी ‘ती’ गुराखी बनली. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत धाडसाने एकटे फिरत वर्षानुवर्षे पशुपालनाचे काम करीत तिने मुलाला वाढवले. त्याला उच्चशिक्षणासाठी पुण्यात पाठवत स्वतः मात्र अजूनही दऱ्याखोऱ्यांत एकटी जगते आहे. ही कहाणी आहे शेतकरी सगाबाई बबन कचरे (Sagabai Kachare) यांची.

तोरणा गिरिदुर्गाच्या पाठीमागील दुर्गम भागात वेल्हा तालुक्यातील डोफेखिंडीच्या शिखरावर सगाबाईंची झोपडी आहे. ‘‘तोरणा किल्ल्याच्या घेऱ्यातील भट्टी गावात माझे माहेर आहे. २० वर्षांपूर्वी लग्न होऊन मी इथे सासरी आले. धनी दोन खंडी शेळ्यांचा मालक होता.

लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून मी रानात जाऊ लागले. नशीब चांगले नव्हते. दोन वर्षांत धनी आजारपणात मरण पावले. दीड वर्षाच्या मुलासह माझा संसार उघड्यावर आला.

शेतीत भात सोडून काहीच येत नव्हते. उभे आयुष्य पडलेले होते. पण मी सासरची झोपडी न सोडण्याचा निर्णय घेतला,’’ सगाबाई आपली कहाणी सांगत होत्या.

Womans In Agriculture
Womans In Agriculture : तिच्या कष्टाशिवाय शेती अपूर्णचं !

‘‘माहेरी शेती होती. पण जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्या पार्टीवाल्यांना स्वस्तात जमीन गेली. माझ्या भावांनी मला हे गाव न सोडण्याचा सल्ला दिला. मग मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या एकुलत्या एक मुलासोबत म्हणजेच संतोषसोबत रानात राहू लागले.

गुराढोराबरोबरच त्याला मी वाढवला. त्याला बारावीपर्यंत मावळात शिकवले. आता त्याला पुण्याला पाठवले आहे. त्याला सरकारी नोकरीत जायचे आहे. माझ्याकडे आता दोन शेळ्या आणि दोन गायी आहेत. एक बकरू पाच हजाराला विकले जाते.

दोन पोती भात होतो. त्यातच मी संसार चालवते,’’ सगाबाईंच्या बोलण्यात आत्मविश्‍वास दिसत होता.

Womans In Agriculture
Agriculture Students : आधुनिक शेतीचे ‘शिलेदार’च दुर्लक्षित

सगाबाईं प्रचंड धाडसी आहेत. हिंस्र श्‍वापद असलेल्या जंगलात त्यांनी गुरे चारली आहेत. ‘‘बिबट्या, भेकराशी माझा कधीच सामना झाला नाही. साप मात्र सतत दिसतात. मोठा सर्प असल्यास बाजूने निघून जाते. मला कधीच मोठे आजारपण आले नाही.

थंडीताप भरला तरी सरकारी दवाखान्याची गोळी खाऊन पुन्हा रानात जात असते. पूर्वी डोंगरातून तालुक्याला बाजारासाठी पायी जावे लागत होते.

सकाळी निघाले की संध्याकाळी घरी पोहोचत असे. आता सडक झाल्यामुळे गाडीने बाजाराला जाता येते,’’ अशी माहिती देणाऱ्या सगाबाई हळूच आपल्या हाताने पायांच्या टाचा चोळत होत्या.

जगण्यासाठी जंगलात वर्षानुवर्षे अनवाणी फिरल्यामुळे सगाबाईंच्या पायांना भेगा पडल्या आहेत. त्यातून कधी कधी रक्त येते. पण पोलादी शरीराच्या या हिरकणीला त्याची तमा नसते.

दऱ्याडोंगरांत जनावरांसोबत मला कधी भीती वाटली नाही. फक्त वीज कडाडली की मला भीती वाटते, असे त्या सांगतात. सगाबाईंच्या या धैर्यशील जगण्याला तोड नाही.

मावळातील पर्वतरांगांच्या कुशीत कष्टाची शेती करणाऱ्या हजारो झुंजार महिला आहेत. त्यांच्यासाठी सगाबाई दीपस्तंभासमान समान समजल्या जात आहेत.


पीएम किसान योजनेच्या लाभापासून दूर
पंतप्रधान किसान सन्मान योजना मुळात तळागाळातील शेतकऱ्यांना मदतीसाठी सुरू केली गेली. मात्र सगाबाई बबन कचरे यांना सरकारी यंत्रणेने या योजनेचा लाभ अजूनही मिळवून दिलेला नाही. संजय गांधी निराधार योजनेतून त्यांना थोडीफार मदत मिळते.

पण पंतप्रधान किसान सन्मान योजनेची चौकशी करण्यासाठी त्या तालुक्याच्या ठिकाणी गेल्या असता ‘योजना बंद झाली आहे. तुमचे नाव नोंदवता येणार नाही,’ असे उत्तर त्यांना देण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com