‘स्टार्ट अप इंडिया’चा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

राजनाथ सिंह ः प्रतापराव पवार, अभय फिरोदिया यांना डी.लिट. प्रदान
Rajnath Singh
Rajnath SinghAgrowon

पिंपरी ः ‘‘आत्मनिर्भर (Aatmnirbhar Bharat) होण्याचा ध्यास भारताने घेतला आहे. ज्ञान-विज्ञानाची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘स्टार्ट अप इंडिया’ (Start Up India )योजनेचा लाभ घ्यावा. सध्याचे स्टार्टअप इनोव्हेशन आरोग्य क्षेत्रातील आहेत. वैद्यकीय व जैवतंत्रज्ञान या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी व्यवसाय-उद्योगातील संकल्पनांवर विचार करावा,’’ असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केले.

येथील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ शुक्रवारी (ता. २०) झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या सोहळ्यात ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार (Prataprao Pawar) व फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.), तर नागपूर येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) या मानद पदवीने गौरविण्यात आले. या वेळी कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्‍वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव, विश्‍वस्त व कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील उपस्थित होते.

राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘कोरोना काळात भारतीय वैद्यकीय क्षेत्राबद्दलचा आदर जगात वाढला. त्यांच्यावरील संस्कारामुळे त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले. हा देश तुमचा आहे आणि या देशाला तुमची गरज आहे. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा. देशाचा विसर पडू देऊ नका. तुमच्या यशात देशातल्या लहान-लहान घटकांचा वाटा आहे. त्यांना तुम्ही कदाचित ओळखतही नसाल. शेतकरी, कामगार यांच्या त्यागाची, बलिदानाची किंमत करता येत नाही.’’

श्री. अभय फिरोदिया म्हणाले, ‘‘आमचा कारखाना १९६० मध्ये महाराष्ट्रात आला. त्या वेळी हे राज्य औद्योगिक आघाडीवर नव्हते. महाराष्ट्र शेतीप्रधान होता. गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राची प्रगती झाली ती केवळ उद्योग व गुंतवणूक यामुळे. १९३१ मध्ये उत्तर प्रदेशचा जीडीपी देशात सर्वाधिक होता. १९६७ मध्ये बिहार आघाडीवर होते. मग आता हे सगळं का बिघडले? ‘मोदी राज’मध्ये हा प्रवाह बदलला जात आहे. उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्था सुधारत आहे. बिहारही बदलतो आहे. उद्योग, रोजगार निर्मितीत ही राज्ये सुधारतील तेव्हा महाराष्ट्राला स्पर्धा करावी लागेल. महाराष्ट्र आज जो काही प्रगतिपथावर आहे, ही सरकारची देन नसून येथील लोक, उद्योजक यांच्या प्रयत्नामुळे, कर्तृत्वामुळे हे घडले आहे.’’

‘उद्योग, शैक्षणिक संस्थांत संवाद वाढला ः पवार

श्री. प्रतापराव पवार म्हणाले, ‘‘शिक्षण केवळ पुस्तकी न राहता कल्पक असले पाहिजे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनयरिंगमध्ये आम्ही काही प्रयोग केले. उद्योगांशी संवाद वाढवला. त्यांच्या गरजा जाणून घेऊन शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न केले. आता शिक्षण व्यवस्था आणि उद्योग क्षेत्राने एकत्र यावे लागेल. सन २००० पासून मी उद्योग आणि संरक्षण यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मला आनंद आहे, की अलीकडच्या काही वर्षांत या दिशेने खूप सकारात्मक बदल होत आहेत. उद्योग आणि शैक्षणिक संस्था यातील संवाद, देवाणघेवाण वाढली आहे. सुपर पॉवर बनण्याची संधी आपल्यापुढे आहे. एकत्र आलो तर देशाची, समाजाची प्रगती होईल.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com