Agriculture Technology : आधुनिक तंत्रज्ञानाने केला गाईंच्या चराई वर्तनाचा अभ्यास

Agriculture Technology Study : कुरणामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडण्याचे विविध प्रकार आहेत. नियमित चराई किंवा टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडली जातात.
Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon

Agri Technology News : कुरणामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडण्याचे विविध प्रकार आहेत. नियमित चराई किंवा टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडली जातात.

मुक्त पद्धतीने जनावरांचे पालन करताना कोणती पद्धत अधिक शाश्‍वत आणि फायदेशीर ठरू शकते, या संदर्भात अमेरिकन कृषी संशोधन सेवेतील शास्त्रज्ञांनी नवीन संवेदक आधारित तंत्रज्ञानाच्या साह्याने अभ्यास केला आहे. सलग दहा वर्षे केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष लक्षणीय आहेत.

अमेरिकेमध्ये मुक्त पद्धतीने पशुपालन करणारे समूह (Ranchers) हे प्रामुख्याने हंगामी पद्धतीने वेगवेगळ्या कुरणांमध्ये जनावरे चरण्यासाठी सोडत असतात. सामान्यतः एका हंगामामध्ये एकाच कुरणामध्ये त्यांची जनावरे चरतात.

मात्र त्यांना त्या कुरणाचे वेगवेगळे भाग पाडून त्यामध्ये टप्प्याटप्प्याने जनावरे चरण्यासाठी सोडण्याची शिफारस शास्त्रज्ञांकडून केली जाते. ही पद्धत अधिक शाश्‍वत असल्याचे सांगितले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पद्धतीच्या शाश्‍वतपणा आणि फायदेशीरपणा याबाबत अधिक प्रयोग आणि अभ्यासाची गरज भासत होती.

त्यामुळे अमेरिकी कृषी विभागाच्या कृषी संशोधन सेवेतील संशोधकांच्या गटाने वेगवेगळ्या चराई पद्धतींचा अभ्यास १० वर्षे सलग केला. या चराई पद्धतीचे जनावरांच्या चरण्याच्या वर्तनावर होणारे परिणाम, त्यांच्या आहाराचा राहणारा दर्जा आणि अर्ध दुष्काळी स्थितीमध्ये दरवर्षी जनावरांच्या वजनवाढीवर पडणारा त्याचा परिणाम मोजण्यात आला.

Agriculture Technology
Agricultural Drone : शेती फायदेशीर करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान

जीपीएस आधारित संवेदकांचा वापर

या प्रयोगामध्ये जनावरांच्या कॉलरमध्ये जीपीएस (जागतिक स्थाननिर्धारण प्रणाली) बसविण्यात आली होती. त्याला जोड म्हणून वेगवेगळ्या संवेदकांची (सेन्सर्स) मदत घेण्यात आली. त्यामुळे जनावरांच्या चरण्याच्या आणि वर्तनातील वेगवेगळ्या सवयींच्या नोंदी घेणे शक्य झाले.

त्या विषयी माहिती देताना कोलोरॅडो येथील रेंजलॅंड रिसोर्सेस ॲण्ड सिस्टिम्स रिसर्चमधील पर्यावरण तज्ज्ञ डेव्हिड ऑगस्टिन यांनी सांगितले, की या अभ्यासासाठी मूळ उद्देश मुक्तपणे चराई करणाऱ्या जनावरांच्या वर्तनाचा अभ्यास करणे आणि त्याचा संबंध त्यांच्या वजनवाढीसाठी जोडून शाश्‍वत पद्धतीचा शोध घेणे, हा होता.

प्रत्येक जनावरांच्या प्रति दिन खाद्य सवयींचा माहिती कॉलरद्वारे गोळा केली जात होती. त्यामध्ये ही जनावरे प्रति दिन किती काळ चरण्यामध्ये घालवतात, त्यासाठी त्यांच्या चालण्याचा वेग किती असतो, त्यांच्या चालण्यातून काही पॅटर्न तयार होतात का, चालताना ती जनावरे किती काळ खाली मान करतात (हे जनावरांच्या खाण्याचे लक्षण गृहीत धरले होते.), त्यावरून त्यांच्या खाण्याचा नेमका कालावधी मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अर्थात, संवेदकांकडून माहिती गोळा करण्यामधील त्रुटी किंवा अन्य समस्यांचा विचार केला तरीही या तंत्रज्ञानामुळे जनावरांच्या चरण्यामधील विविध सवयी आणि वर्तनांतील दुवे लक्षात येण्यात मदत झाली.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे जनावरांच्या वर्तनावर त्यांच्या व्यवस्थापकांना नियमितपणे लक्ष ठेवणे शक्य होत आहे. याचा फायदा पशुपालनातील वेगवेगळे निर्णय घेण्यामध्ये होतो. जनावरांच्या चालण्याचा वेग वाढला, की कुरणातील चारा कमी झाल्याचे लक्षात येते.

या बाबत बोलताना ऑगस्टिन म्हणाले, की रोटेशनल पद्धतीमध्ये गाईंनी फिरण्यासाठी तुलनेने कमी जागा उपलब्ध होते. त्यातही गवत किंवा चाऱ्याच्या प्रकाराबाबत त्यांना फार चोखंदळ राहता येत नाही. एकाच हिरव्या भागामध्ये जास्त काळ घालवतात. चांगल्या चाऱ्यासाठी शोध घेण्यासाठी वेळ घालवत नाहीत.

जे समोर येईल, ते खाण्याशिवाय पर्याय राहत नाही. स्पर्धेमुळे मिळेल ते त्वरित खाऊन पोट भरण्याकडे अधिक कल असतो. परिणामी, त्यांच्या आहारामध्ये प्रथिनांची मात्रा कमी राहून त्याचा अंतिमतः वजनावर विपरीत परिणाम होतो. नॉन रोटेशनल पद्धतीच्या तुलनेमध्ये त्यांचे वजन सरासरी १४ टक्क्यांनी कमी राहिले. या गायी सावकाश चरत जातात.

निष्कर्ष आणि फायदे

ऑगस्टिन आणि त्यांचे सहसंशोधक सीन पी. किअर्नी, एडवर्ड जे. रेनॉर, लॉरेन एम. पोरेन्स्की आणि जस्टिन डी. डेर्नेर यांनी केलेल्या या दीर्घकालीन संशोधनाचे निष्कर्ष ‘ॲग्रीकल्चर, इकोसिस्टिम्स ॲण्ड एन्व्हायर्न्मेंट’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

संशोधकांनी जनावरांच्या लहान कळपांमध्ये आणि चरण्याच्या नॉन रोटेशनल पद्धतीसाठी (पूर्ण हंगामभर) किंवा एकाच मोठ्या कळपातून लहान लहान गटामध्ये विभागलेल्या रोटेशनल पद्धतीसाठी हेच तंत्रज्ञान वापरले.

Agriculture Technology
Animal Husbandry : आयव्हीएफ : क्रांतीकारी तंत्रज्ञान

पहिल्या पाच वर्षांच्या नोंदीच्या अभ्यासातून रोटेशनल पद्धतीने व्यवस्थापन केलेल्या गायींचे वजन पूर्ण हंगामभर नॉन रोटेशनल पद्धतीमधील गायींच्या तुलनेमध्ये सरासरी १४ टक्क्यांनी कमी राहिल्याचे दिसून आले.

म्हणजेच मोठ्या कळपांची लहान भागामध्ये सलग पट्ट्यामध्ये चराई करत राहिल्यास त्यांच्या वजनवाढीवर परिणाम होत असल्याचे दिसून आले. आहाराचा दर्जा तितका चांगला न राहिल्यामुळे जनावरांचे आरोग्यही तुलनेने कमजोर राहिले.

त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने मोठ्या कुरणांमध्ये पूर्ण हंगामभर चराई करण्याचे काही फायदे दिसून आले. अर्थात, अशा अभ्यासामुळे गायींच्या चरण्याच्या सवयी अधिक साक्षेपाने जाणून घेता आल्या.

जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये नवीन तंत्रज्ञानयुक्त संवेदकांचाही अधिक फायदा होऊ शकतो. त्यांना त्याबाबतचे अनेक निर्णय बिनचूकपणे आणि वेळेवर घेणे शक्य होते. विशेषतः कुरणांमध्ये त्यांच्या चराईसंदर्भात अधिक सजगपणे निर्णय घेता येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com