
Sharad Pawar: उसापासून साखर ते हायड्रोजन अशी साखळी विकसित केल्याशिवाय साखर कारखानदारीला गत्यंतर नाही, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
तसेच कारखान्यांना सीएनजी आणि पोटॅश निर्मितीमध्येही मोठा वाव आहे. इथेनॉलच्या बाबतीत केंद्र सरकारची धोरणे सकारात्मक आहेत.
त्याचा साखर कारखानदारीला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
सकाळ माध्यम समूहाने पुण्यात १७ व १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या सहकार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ‘सकाळ'चे अध्यक्ष प्रताप पवार, ‘सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, मुंबई बॅँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, भारतीय रिझर्व्ह बँकचे संचालक सतीश मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
‘‘उसापासून साखर-मोलॅसिस-अल्कोहोल-इथेनॉल-हायड्रोजन तयार करण्याची साखळी विकसित केली पाहिजे. यातील हायड्रोजन वगळता इतर सर्व उत्पादनांमध्ये यश आलेले आहे.
हायड्रोजन निर्मितीतही यश येईल. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. तसे झाले तर साखर कारखानदारीला उत्तम जोडधंदा उपलब्ध होईल,'' असे पवार म्हणाले.
इथेनॉलचा खरेदी दर वाढवणे आणि इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण दुप्पटीवर नेणे हे केंद्र सरकारचे धोरणात्मक निर्णय सकारात्मक आहेत.
या क्षेत्रात काही अडचणी आहेत, त्यावर मार्ग काढण्याचे काम सुरू आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
यंदा उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात जास्त साखर उत्पादन झाले. देशात सगळ्यात जास्त साखर महाराष्ट्राने तयार केली. राज्यातील कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचे श्रेय आहे, असे पवार म्हणाले.
यंदा राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी'पोटी ३३ हजार २४४ कोटी रूपये मिळणार आहेत.
आतापर्यंत त्यातील ३३ हजार ७७ कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत. एखाद्या पिकातून शेतकऱ्यांना कसा सशक्त आधार मिळतो, याचे हे उदाहरण असल्याचे उद्गार पवार यांनी काढले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.