
Indian Agriculture : पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा
आई, मला नेसव शालू नवा।
बांधला सैलसर बुचडा मानेवरी
माळला सुरंगी गजरा गं त्यावरी
प्रख्यात कवी कै. ग. दि. माडगूळकर यांच्या या लोकप्रिय गाण्यातील ओळींमध्ये सुरंगी गजऱ्याचा उल्लेख येतो. हाच तो सुगंधी सुरंगी वृक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडी या दोन तालुक्यांतील गावांमध्ये आढळतो.
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली, वडखोल सोन्सुरे, टाक, आसोली, रेडी, खानोली, फणसखोल, मोचेमाड, सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे, कोलगाव, कुणकेरी, आकेरी (ता. कुडाळ), तर फोंडा (ता. कणकवली), करूळ (ता. वैभववाडी) या गावांच्या अर्थकारणाला मोठा हातभार लावण्याचे काम याच सुरंगी झाडाने केले आहे.
सुरंगीचे महत्त्व
जिल्ह्यातील सुमारे पंधरा गावांत, तर वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टीच्या नऊ गावांत सुरंगीची झाडे दृष्टीस पडतात. बहुतांश झाडे नैसर्गिक पद्धतीनेच आलेली आहेत. त्याच्या कळ्या व फुले अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
काही वर्षांपूर्वी माळा, गजरे बनवून त्यांची विक्री व्हायची. अलीकडे व्यापारी गावांमध्ये येऊन शेतकऱ्यांकडून कळ्या, फुले खरेदी करू लागले आहेत. सुरंगीचा वापर औषधी कंपन्यांकडून तसेच काही प्रमाणात सुगंधामुळे अत्तर बनविण्यासाठी होतो.
त्यामुळे त्यास व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे. शेतकरीही त्यादृष्टीने झाडांकडे लक्ष देत आहेत.
सुरंगी विषयी ठळक बाबी
-झाडांची उंची सुमारे ३५ ते ४० फुटांपर्यंत, तर आयुष्यमान ८० ते १०० वर्षांपर्यंत.
-फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून हंगामास सुरुवात. बहर २५ ते ३० दिवसांपर्यंत राहतो. त्याच काळात काढणी, वेचणी आटपावी लागते. नर आणि मादी अशी झाडे.
-सुरंगीचा वापर, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्यप्रसाधने, सुगंधी द्रव्ये, रंग आदींसाठी.
-खते, कीडनाशके किंवा निविष्ठा वापर व त्यावरील खर्च शक्यतो नाही.
-सुरंगीत परागीकरणाची क्षमता जास्त. त्यामुळे मधमाश्यांची संख्या वाढून आंबा, काजू आदी पिकांना फायदा.
काढणीचे कौशल्यपूर्ण काम
खोडाला व उंचावर कळ्या असल्याने काढणी क्लिष्ट असते. फांद्या नाजूक असल्यामुळे कुशल मजूरच हे काम करतात. काढणीपूर्वी जुन्या साड्या जमिनीवर अंथरण्यात येतात. जेणेकरून वेचणी सोपी होते. काढणी पहाटेच्या वेळीच होते. प्रति दिन प्रति मजूर एक हजार रुपये मजुरी द्यावी लागते.
उत्पादन
प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे, तर सोन्सुरे येथील आबा टाक्कर यांच्याकडे १५ ते ४५ वर्षे वयापर्यंतची ३०० झाडे आहेत. मोठे झाड ५० ते ६० किलो, तर १५ ते २० वर्षांचे झाड १५ ते २० किलो उत्पादन देते. कळ्या काढणीचे काम अवघड असल्याने त्या चढ्या दराने म्हणजे किलोला ६०० ते ७०० रुपये दराने विकल्या जातात.
फुलांची काढणी केल्यानंतर पाच दिवस कडक उन्हात वाळवून प्लॅस्टिक बॅग व गोणपाटात भरून मालाची पाठवणी होते. व्यापारी गावात येऊन खरेदी करतात. शिरोडा, वेंगुर्ला, सावंतवाडी, रेडी, फोंडा येथेही खरेदीदार आहेत.
स्थानिक व्यापाऱ्यांमार्फत वाशी-मुंबई येथे पुढील पुरवठा होतो. दिल्ली, अहमदाबाद, उज्जैनमध्येही मागणी आहे. कळ्या आणि फुले मिश्रित मालाला किलो ५५० रुपये दर मिळतो. वेण्या, गजरे यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री होते. त्यास ३० ते ४० रुपये दर मिळतो.
कळ्यांना मिळालेला दर रु. प्रति किलो.
२०२१ – ४००
२०२२- ६०० ते ६५०
२०२३ -६५० ते ७००
श्री. वेतोबा मंदिराची सुरंगीने सजावट
आरवली (ता. वेंगुर्ला) गाव सुरंगीसाठी प्रसिद्ध आहे. येथील श्री देव वेतोबा मंदिरांची एक दिवस सजावट सुरंगीच्या फुलांनी होते. मंदिर व्यवस्थापन समितीकडून दिवस निश्चित होऊन गावकऱ्यांना कल्पना देण्यात येते. त्यानुसार सुरंगी उत्पादक वेण्या, माळा तयार करून आणतात. सजावटींमुळे मंदिराला वेगळीच शोभा व देखणेपण येते.
सुरंगी विषयी
-सुगंधित सपुष्प वनस्पती प्रकारातील झाड. मॅमिया सुरिगा असे शास्त्रीय नाव. संस्कृत नाव नागकेशर.
-पश्चिम घाट, कोकण, उत्तर कर्नाटक, मलबार, कोइमतूर आदी ठिकाणी आढळते.
-अभिवृद्धी बियाण्यांद्वारे. वेंगुर्ला फळसंशोधन केंद्राने ल्युपीन फाउंडेशनच्या सहकार्याने सुरंगीची कलमे तयार करण्याची पद्धत विकसित करून त्याची लागवड केली आहे असे येथील शास्त्रज्ञ डॉ. विजय देसाई यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.