
Unseasonal Rain Damage : अवकाळी पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे हातात तोंडाजवळ आलेला रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.
हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायदारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. या नुकसानीचा येत्या १० दिवसांत पंचनामा करु, असे आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी अब्दुल सत्तार यांनी कोकण विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा घेतला. यावेळी कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सहसचिव गणेश पाटील, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे आदी अधिकारी उपस्थित होते.
कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे काजू, आंबा, नारळ, फणस आणि सुपारीच्या बागाच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
आढावा बैठकीनंतर कृषीमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यातील एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना याप्रश्नी मदत जाहीर करतील, असेही सत्तार म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.