
Nashik Farmer protest News : संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना (Farmers Issue) विविध प्रश्न भेडसावत आहेत. या प्रश्नांकडे मात्र सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. फक्त खुर्च्या टिकवण्यामध्येच सत्ताधारी व्यग्र दिसत आहेत. प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत.
या प्रश्नांकडे सत्ताधारी लक्ष देत नाहीत. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार (Government) प्रयत्न करत नाही.
या सगळ्या विषयांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता. २२) स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह राज्यभर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.
उन्हाळ्यात पाण्याची टंचाई (Water Shortage) असताना विजेअभावी शेतकऱ्यांची पिके करपून जातील व तो उद्ध्वस्त होईल, म्हणून विजेचे कनेक्शन तोडू नये तसेच कृषी संजीवनी योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देऊन ५० टक्क्यांपेक्षा कमी बिल घेऊन वीजबिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावे.
तसेच रासायनिक खतांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अनुदान देऊन या किमती नियंत्रित करायला हव्यात.
ज्या-ज्या शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी तक्रारी नोंदवल्या आहेत, त्यांच्या पीकविम्याचे पैसे तातडीने देण्याचे आदेश द्यावेत. बुलडाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनीहाय चौकशी करावी.
सोयाबीन, कपाशी, कांदा, द्राक्ष यांसारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहेत. सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा प्रमुख मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर बुधवारी रास्ता रोको आंदोलन करणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे लोकप्रतिनिधींचे लक्ष जावे यासाठी आंदोलन तीव्र स्वरूपात होणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.